पेशव्यांची शकावली
इ. स. १७६१ पर्यंत.
बाळाजी विश्वनाथाची हकीकत.
१ बाळाजी विश्वनाथ व जानो विश्वनाथ हे दोघे सख्खे बंधु, कोकणस्थ ब्राह्मण, उपनांव भट. राजपुरी प्रांतात जंजीरकर हपशीं यांचे मुलखांत श्रीवर्धन परगण्याचे हे वतनदार देशमुख. जानोजी विश्वनाथ यांस कोणे एके दिवशी हिशेबाकरितां जंजि-यांत हपशी अधिकारी यांनीं बोलावून नेऊन एकाएकी गोणत्यांत घालून समुद्रांत बुडविलें. हे वर्तमान बाळाजी विश्वनाथ यांस श्रीवर्धन गांवी कळतांच त्या दहशतीनें एकदम सहकुटुंब, दोघे पुत्र,वडील बाजीराव व धाकटे चिमाजी अप्पा, यासुध्दां सर्व घरादाराचा त्याग करून, श्रीवर्धननजीक वेळास येथे रामाजीपंत व बाळाजीपंत भानु यांच्या येथें पूर्वीच्या ओळखीनें मुक्कामास येऊन राहिले. झालेली हकीकत सांगितली. रोजगारास सातारे प्रांती जावयाचें आहे ह्मणून सांगितलें. भानूही बरोबर रोजगारास निघतो ह्मणून ह्मणाले. ईश्वरकृपेनें जी भाजीभाकर मिळेल, त्यांतील चतकोर भानूंस देण्याचें अभिवचन देऊन, बाळाजी विश्वनाथ भट साता-यास जाण्याकरितां निघून पुरंदर किल्ल्यानजीक सासवडास आले. त्या गांवचे कुळकर्णी व देशपांडे अंबाजीपंत पुरंधरे प्रसिध्द होते. त्यांचें घरी मुक्कामास उतरले. त्यांस पुरंदरे यांनी आपले घरी कांही दिवस ठेवून घेऊन काय निमित्त आला ह्मणून विचारलें. रोजगारास निघालों वगैरे हकीकत कळविली. सातारा राजधानीत धनाजी जाधवराव वगैरे मोठमोठे नामांकित सरदारांच्या आश्रयानें रोजगार लागेल असें मनांत आणून, भटांच्या बरोबर पुरंधरेही साता-यास दाखल झाले. रामाजीपंत भानु व बाळाजीपंत भानु या उभयतांची ओळख साता-यास राहणा-या महादाजी कृष्ण जोशी यांशी होती. त्यांस ते भेटले. ते व जोशी शंकराजी नारायण पंतसचिव यांजकडे कारकुनीवर राहिले. सचिव हे ताराबाईचे कारभारांत प्रमुख होते. बाळाजी विश्वनाथ व अंबाजीपंत पुरंधरे यांची विशेष ओळख कोणाची नव्हती. धनाजी जाधवराव सेनापति मोठे सरदार, यांची त्या राजधानींत मान्यता मोठी असा लौकिक ऐकिवात होता. सबब त्यांची भेट घेऊन आपली सर्व हकीकत त्यांस कळविली. त्यावरून त्यांणी यांची बोलण्याची वगैरे हुशारी पाहून आपले पदरी दौलतसंबंधी लिहिण्याचे कामावर उभयतांस ठेविले व तेहि हुशारीनें कामकाज बघत आले. यामुळे जाधवराव यांचाहि विश्वास व लोभ विशेष झाला. ही सर्व हकीकत १७०७ इसवीच्या अगोदर झाली.१ १+ १++