Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७२]A श्री. २६ डिसेंबर १७५०.
पै॥ पौष शुध्द ९ बुधवार.
शके १६७२.
वेदमूर्ती राजश्री वासुदेव दीक्षित स्वामी गोसावी यांसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. येथें वर्तमान सावनु राहून लिहिलें आलें आहे कीं, नासरजंगास पठाण व फिरंगी यांनीं लढाईचे गडबडीत दंगा करून मारिलें. दोहों चहूं दिवसांत तहकीक वर्तमानहि येईल. जर हें वर्तमान तहकीक तेथें आलें असेल तर याचा विचार आमचे मनांत येणेंप्रमाणें आहे. तुह्मासी सैदलष्करखानासी निखालसता असली तरी एकांती जाऊन बोलावें कीं, खानाची आमची मैत्रिकी, येप्रसंगी खानांनीं सर्व प्रकारे आमचे पदरी पडावें, अवरंगाबाद व बऱ्हाणपूर दोन्ही सुभे आमचे हवाली करावे, शहरांतील खजाना सर्व आमचे हवाली करून कर्जपरिहार होय तें करावें, आपले सर्व प्रकारें जागीर मनसब घेऊन आमचे हातून आपलें बरें करून घ्यावें, हा उत्तम पक्ष. दुसरा प्रकार : नासरजंग याचे लोक अथवा भाऊ यांस उभे करून आह्मांस कर्जपरिहारार्थ व फौजेचे एक वर्षाचे बेगमीस ऐवज देऊन आह्मांस सामील करून घ्यावें. वराड वगैरे जागांची जे फौज, तोफखाना जमा करून आह्मांसमागमें चलावें. आह्मी चाळीस हजार फौजेनिशी सिध्द आहों. दाभाडयाकडील कारभार तहरह पडिला कीं, निमे प्रांत आह्मांस द्यावा व निमे त्यांनी खावा. अद्याप कागदपत्र आला नाहीं. होईल. आठा दिवसांनी हा कारभार उरकून, नीट हिदायतमोहिदीनखानावर चल देतों. येणेंप्रमाणें ऐकिलियास यांचें आमचे मित्रत्वाचें सार्थक, त्यांचेंही ऊर्जित. यांत काही बेमानी त्यांचे पदरी येत नाहीं. इतकेंहि न करीत, तर मग आह्मांस ईश्वर बुध्दि देईल तें आह्मीं करूं. त्यांची आमची मैत्री मात्र व्यर्थ होईल. जर यांचा डौल पहिल्यापासून हिदायत मोहिदिनखानाकडे अंतस्तें असला तर मात्र हे येणेंप्रमाणें करणार नाहीत. जर हे उदासपणें हिदायतमोहिदीन खानाकडे राजकारण न करतां असले आणि नासरजंग स्वर्ग पावले असले, तर हें करतील. दुसरे मनसब आहे जसा प्रसंग जाणावा तसा करावा. ये प्रसंगी आमचे कार्य व आपले ऊर्जित करून घ्यावयाचा समय आहे. तुमचे ठायी विश्वास व आमचे ठायी निष्ठा असली आणि हें वर्तमान तहकीक आलें असलें, तर येणेंप्रमाणें अगत्य करणें. खानाची आमची क्रिया आहे कीं, हरएक प्रसंगी आमचे कार्यास त्यांनी न चुकावें व आह्मीं त्यांचे बरें करावयास न चुकावें असे आहे. नासरजंग असतां हरएक मनसुबा आह्मी करावा, खानांनी साहित्य करावें. तर बेमानी पदरास येते तें केलें असेल तर यांजकडे दोष तिळमात्र न येतां, आमचें कार्य होऊन यांचे ऊर्जित होतें. एकांती साफ बोलणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७२] श्री. २९ आक्टोबर १७४८.
पै॥ कार्तिक व॥ ४ शनिवार
शके १६७० विभव.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. सांप्रत आपणाकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं, ऐसें नसावें. सदैव नवल विशेष लिहीत असावें. येथील वर्तमान तरी :-
यवनाकडील किल्ला हुजूरची आज्ञा नसतां मावळयांनी गडगडा घेतला. त्यास, सांप्रत यवनापासून अंतर नसतां आपण स्थल घेणें उचित नाही, यास्तव माघारा घ्यावा ऐसा विचार केला असतां, मावळयांनी जीवधन घेतला. याजमुळें कलहचसा दिसोन आला. आमचे मनांत नसतां ईश्वरइच्छेनें या प्रकारें कलहावर गोष्ट पडली. असो. याउपरी नासरजंग विरुध्द न दाखवितां स्नेहाचें बोलणें बोलतील चालतील तर आह्मांस त्यांचे स्नेहापेक्षां कांही अधिक नाही. जर विचार न करितां, त्वरा करून, या रोखें कूच केले, तर लौकिक एक प्रकारचा होऊन काम इरेस पडणार. मग किल्ले दिल्हियानें आह्मांस लोक भिऊन दिल्हे असें ह्मणूं लागतील. असो. ईश्वरी इच्छा प्रमाण! तेथें आमचा उपाय काय ? उगेंच वर्तमान तुह्मांस कळावें ह्मणून लिहिलें असे. या दिवसांत तेथील फौजेचे व तोफखानियाचे वगैरे जें वर्तमान आढळेल तें त्वरेनें काशिदास अजुरा देऊन, अगत्य तहकीक करून सविस्तर लिहित असो. हे दिवस संधीचे आहेत. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. सर्व संकटें अंतर्बाह्य स्वामीचे कृपाप्रतापें दूर होतील. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७१] श्रीशंकर. ता. २३ मार्च १७४६.
श्रीकृष्ण.
पै॥ वैशाख व॥ ८
गुरुवार शके १६६८
क्षयनाम संवत्सरे;
वनमाळी दासाचें दुकानीं.
श्रियासह चिरंजीव विजयीभव राजश्री वासुदेव दीक्षित यांसी प्रती श्रीहून नारायण दीक्षित कृतानेक आशीर्वाद उपरि येथील क्षेम चैत्र शुध्द १२ परियंत श्रींत सुखरूप असो. ++++ राजकीय वर्तमान :- पेशव्यांचे व बाबूजी नाइकाचें व राजद्वारचें सविस्तर लिहीत जाणें. होळकर वगैरे फौज छत्रपुरास आल्या. ++++ हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७०] कारकीर्द जाहगीरदार संस्थान कायगांव.
(१) नारायण दीक्षित बिन गोविंद दीक्षित, कारकीर्द वर्षे ५४, इ॥ शके १६१६ ता॥कार्तिक शु॥ १४ शके १६७०.
(२) वासुदेव दीक्षित बिन नारायण दीक्षित, कारकीर्द वर्षे १२, इ॥ शके १६७० ता॥ श्रावण व॥ १२।१३ शके १६८२.
(३) बाळकृष्ण दीक्षित बिन नारायण दीक्षित, कारकीर्द वर्षे १०, इ॥ शके १६८२ त॥ चैत्र शु॥ ३ शके १६९२.
(४) लक्ष्मीनारायण दीक्षित बिन बाळकृष्ण दीक्षित, कारकीर्द वर्षे ४०, इ॥ शके १६९२ त॥ आश्विन शु॥ ८ शके १७३२.
(५) मैनाबाई भ्रतार लक्ष्मीनारायण दीक्षित, कारकीर्द वर्षे ८, इ॥ शके १७३२ त॥ वैशाख १७४०.
(६) बाळकृष्ण दीक्षित बिन लक्ष्मीनारायण दीक्षित, कारकीर्द वर्षे ३२, इ॥ शके १७४० त॥ ज्येष्ठ शु॥ ४ गुरुवार शके १७७२.
(७) यज्ञेश्वर दीक्षित बिन बाळकृष्ण दीक्षित, कारकीर्द वर्षे भुक्त ४२, इ॥ शके १७७२ त॥.
(८) गोविंद दीक्षित बिन वासुदेव दीक्षित हे भाद्रपद व॥ ७ शके १७०९ मृत्यु पावले.
(९) रामचंद्र दीक्षित बिन वासुदेव दीक्षित, शके १७३५ भाद्रपद शु॥ २ मृत्यु पावले.
(१०) जगन्नाथ दीक्षित बिन रामचंद्र दीक्षित, इ॥ शके १७३५ त॥ शके १७४०.
मूळ पुरुष नारायण दीक्षित बिन गोविंद दीक्षित ह्यांचा अत्यंत जुना उल्लेख त्यांच्या नाशिक येथील उपाध्यायाच्या खतावणीत शके १५७२ सालचा सांपडतो. ह्यावरून नारायण दीक्षित मृत्युसमयीं निदान १२० वर्षांचे असावेत असें ठरतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३६९] श्री.
पुरवणी श्रीमत् महाराज श्रीस्वामीचे सेवेशी :-
विज्ञापना. मुडागडाचा उल्लेख लेख करून कोण्हाचा विश्वास न धरावा, व मुलकास कौल देऊन आबाद करावा, प्रजा सुखें नांदे, आशीर्वाद देई, तें करावें. येविशीं श्रीदाशरथीचें विशेषण देऊन, जाहल्या प्रसंगाचा अर्थ उच्चार पुरस्सर लेख करून, आज्ञा केली, ते सर्व अवगत जाहालें. स्वामीनी आज्ञापिलें तें उचितच; परंतु सर्व कर्तव्य स्वामीचें आशीर्वादाचें. स्वामीचा आशीर्वाद आमच्या मस्तकी. तत्प्रभावेंकरून दुर्वृत्ताचा नि:पात जाहला. एरवी होणें विदितच आहे ! स्वामी ईश्वररूप आहेत. स्वामीचे चरणारविंदावीतरीक्त दुसरें दैवत नाहीं. कोण्हाचा विश्वास न धरावा. मुलकास कौल देऊन आबाद करावा ह्मणोन तर स्वामीचे आज्ञेप्रमाणेंच वर्तणुक करून. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३६७] श्री.
श्रीमत्परमहंस श्री स्वामीचे सेवेसी :-
चरणरज बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना. येथील कुशल श्रीकृपें त॥ श्रावण वद्य त्रयोदशी यथास्थित असे. विशेष. श्रीकारणें व स्वामीकारणें वस्त्रें पाठविली आहेत.बि॥
दुपट्टे कुसुंबी, दुपट्टा चांदणी, दुलई.
२ १ १
येणेंप्रमाणें पाठविली असेत. प्रविष्ट जाहाल्याचें उत्तर पाठविलें पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
[३६८] श्री.
श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें विसाजीराम चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना. स्वामीचे कृपेकरून वर्तमान कुशल असे. विशेष. स्वामीचे सेवेसी निगडेल वजन खरें विकत घेऊन पाठविलें आहे. घेतलें पाहिजे. आपण स्वामीचा चरणरज आहे. जे होणें जाणें ते स्वामीचे आशीर्वादें होईल. सर्व कारभार मनसबा स्वामीचा आहे. सर्वदां आशीर्वाद देऊन कल्याण करणार श्रीचा व आपला आशीर्वाद आहे. बहुत ल्याहावें तों स्वामी सर्वज्ञ आहेत. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३६५] श्री.
श्रीमत्सकल तीर्थरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें लक्ष्मीबाई आंगरे चरणावरी मस्तक ठेवून कृतानेक साष्टांग दंडवत् प्रणाम विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लेखन आशीर्वादपत्रीं सांभाळास अविस्मर असिलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाहालें. परंतु पत्र येऊन परामर्ष केला नाहीं. याजवरून अपूर्व वाटलें. आपली ममता मजवरी ऐसी नव्हती जे परामर्ष न करावा. परंतु गोष्ट कैसी घडली हें न कळे. याउपरी तरी आशीर्वादपत्र येऊन दर्शनाचा लाभ घडे तें करणार आपण समर्थ आहेत. यद्यपि आह्मांपासून अंतर पडिलें असिलें तरी क्षमा करावयास समर्थ आहेत. वरकड सविस्तर चिरंजीव राजश्री मानाजी आंगरे यांणी लिहिलें आहे. त्याजवरून विदित होईल कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. लोभाभिवृध्दि केली पाहिजे. हे विनंति.
[३६६] श्री.
पुरवणी श्रीमत् महाराज श्रीपरमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना. उदेपूरची मजमू लक्षुमण नारायण शेणवी यांस दिली होती; त्यास त्याचा धंदा दूर करून धोंडो कृष्ण यास पाठविणार; तर सनद पाठविली पाहिजे; ह्मणोन आज्ञा. त्यास धोंडो कृष्ण यास येथें पाठवावें. स्वामीचे आज्ञेप्रमाणें धंदा सांगोन चालविलें जाईल. नारो कृष्ण याचेविशी लिहिलें, तर त्याजपासून सेवा घेतच आहों. सर्वप्रकारें त्याचें चालविणें तें चालविलें जाईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३६४] श्री.
पुरवणी श्रीमद्भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरी. आपणाकारणें जिन्नस पाठविला आहे :-
एकूण तीन मण पाठविले आहेत. घेतले पाहिजे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३६३] श्री.
पु॥ श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरी. स्वामीस वस्त्रें बराबरी धोंडजी राठवळ सनगें :-
१ तापता
१ किमखाब
१ शालाजोडी २
---
३
एकूण सनगें तीन पाठविली आहेत. प्रविष्ट जाहाल्याचें प्रत्योत्तर पाठविलें पाहिजे. सेवेसी विदित जालें पाहिजे. हे विज्ञापना + हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३६२] श्री.
पुरवणी श्रीमत्सकल तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
विनंति उपरी. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थप्रवणगोचरें संतोष जाहाला. तो पत्री काय लिहावा ! सारांश, बंधुविरोधाचा अर्थ चित्तांतून टाकून सर्वमान्यता दिसे तो विचार करणें. चिरंजीव संभूचें पत्र आलें ते आह्मांस पहावयाकरितां पाठविलें तेंहि प्रविष्ट जाहालें. सविस्तर भावगर्भ कळों आला. ऐशास जो स्वामीनें बुध्दिवाद लिहिला तो उचित मानिला. आह्मी कोणेंप्रकारें वर्ततों हें परस्पर स्वामीनीं मनास आणावें. वरकड बंधुविरोध चित्तांतून दवडावा हा अर्थ आपण आज्ञापिला. तरी आह्मांस बंधु एक आहे. पांच सात असते तरी त्यासी कटाक्ष करावा. वडिलामागें आह्मी उभयतां बंधु सौरस्यें वर्तोन वडिलांनी संपादिल्या यशकीर्तीचं संरक्षण करावें हेच इच्छा आह्मांस. दुसरा अर्थ स्वहिताचा आहे ऐसें नाहीं. साद्यंत चिरंजीव संभाजी आंगरे यांणीं कितेक ममतापूर्वक किल्ले जयगडच्या मुक्कामीं लेहून पाठविलें जे, आपण वडील आहे, आह्मापासून अंतर पडिलें असिलें तरी क्षमा करावी, आणि विजयदुर्ग प्रांतीच्या जिल्ह्याची बेगमी करून पाठवावी. त्यावरून आजीपर्यंत विरुध्दता जाली होतीं तें सर्व दूर करून सर्वप्रकारें त्यांची बेगमी करणें ते करून पाठविले आहे. त्या जिल्ह्याच्या परामृषास आह्मांपासून अंतराय होणार नाहीं. एतद्विषयी विस्तार ल्याहावा तरी स्वामी सर्व प्रकारें वडील मायबाप आहेत. हे विनंति.