[३६९] श्री.
पुरवणी श्रीमत् महाराज श्रीस्वामीचे सेवेशी :-
विज्ञापना. मुडागडाचा उल्लेख लेख करून कोण्हाचा विश्वास न धरावा, व मुलकास कौल देऊन आबाद करावा, प्रजा सुखें नांदे, आशीर्वाद देई, तें करावें. येविशीं श्रीदाशरथीचें विशेषण देऊन, जाहल्या प्रसंगाचा अर्थ उच्चार पुरस्सर लेख करून, आज्ञा केली, ते सर्व अवगत जाहालें. स्वामीनी आज्ञापिलें तें उचितच; परंतु सर्व कर्तव्य स्वामीचें आशीर्वादाचें. स्वामीचा आशीर्वाद आमच्या मस्तकी. तत्प्रभावेंकरून दुर्वृत्ताचा नि:पात जाहला. एरवी होणें विदितच आहे ! स्वामी ईश्वररूप आहेत. स्वामीचे चरणारविंदावीतरीक्त दुसरें दैवत नाहीं. कोण्हाचा विश्वास न धरावा. मुलकास कौल देऊन आबाद करावा ह्मणोन तर स्वामीचे आज्ञेप्रमाणेंच वर्तणुक करून. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.