[३६५] श्री.
श्रीमत्सकल तीर्थरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें लक्ष्मीबाई आंगरे चरणावरी मस्तक ठेवून कृतानेक साष्टांग दंडवत् प्रणाम विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लेखन आशीर्वादपत्रीं सांभाळास अविस्मर असिलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाहालें. परंतु पत्र येऊन परामर्ष केला नाहीं. याजवरून अपूर्व वाटलें. आपली ममता मजवरी ऐसी नव्हती जे परामर्ष न करावा. परंतु गोष्ट कैसी घडली हें न कळे. याउपरी तरी आशीर्वादपत्र येऊन दर्शनाचा लाभ घडे तें करणार आपण समर्थ आहेत. यद्यपि आह्मांपासून अंतर पडिलें असिलें तरी क्षमा करावयास समर्थ आहेत. वरकड सविस्तर चिरंजीव राजश्री मानाजी आंगरे यांणी लिहिलें आहे. त्याजवरून विदित होईल कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. लोभाभिवृध्दि केली पाहिजे. हे विनंति.
[३६६] श्री.
पुरवणी श्रीमत् महाराज श्रीपरमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना. उदेपूरची मजमू लक्षुमण नारायण शेणवी यांस दिली होती; त्यास त्याचा धंदा दूर करून धोंडो कृष्ण यास पाठविणार; तर सनद पाठविली पाहिजे; ह्मणोन आज्ञा. त्यास धोंडो कृष्ण यास येथें पाठवावें. स्वामीचे आज्ञेप्रमाणें धंदा सांगोन चालविलें जाईल. नारो कृष्ण याचेविशी लिहिलें, तर त्याजपासून सेवा घेतच आहों. सर्वप्रकारें त्याचें चालविणें तें चालविलें जाईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.