[३६२] श्री.
पुरवणी श्रीमत्सकल तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
विनंति उपरी. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थप्रवणगोचरें संतोष जाहाला. तो पत्री काय लिहावा ! सारांश, बंधुविरोधाचा अर्थ चित्तांतून टाकून सर्वमान्यता दिसे तो विचार करणें. चिरंजीव संभूचें पत्र आलें ते आह्मांस पहावयाकरितां पाठविलें तेंहि प्रविष्ट जाहालें. सविस्तर भावगर्भ कळों आला. ऐशास जो स्वामीनें बुध्दिवाद लिहिला तो उचित मानिला. आह्मी कोणेंप्रकारें वर्ततों हें परस्पर स्वामीनीं मनास आणावें. वरकड बंधुविरोध चित्तांतून दवडावा हा अर्थ आपण आज्ञापिला. तरी आह्मांस बंधु एक आहे. पांच सात असते तरी त्यासी कटाक्ष करावा. वडिलामागें आह्मी उभयतां बंधु सौरस्यें वर्तोन वडिलांनी संपादिल्या यशकीर्तीचं संरक्षण करावें हेच इच्छा आह्मांस. दुसरा अर्थ स्वहिताचा आहे ऐसें नाहीं. साद्यंत चिरंजीव संभाजी आंगरे यांणीं कितेक ममतापूर्वक किल्ले जयगडच्या मुक्कामीं लेहून पाठविलें जे, आपण वडील आहे, आह्मापासून अंतर पडिलें असिलें तरी क्षमा करावी, आणि विजयदुर्ग प्रांतीच्या जिल्ह्याची बेगमी करून पाठवावी. त्यावरून आजीपर्यंत विरुध्दता जाली होतीं तें सर्व दूर करून सर्वप्रकारें त्यांची बेगमी करणें ते करून पाठविले आहे. त्या जिल्ह्याच्या परामृषास आह्मांपासून अंतराय होणार नाहीं. एतद्विषयी विस्तार ल्याहावा तरी स्वामी सर्व प्रकारें वडील मायबाप आहेत. हे विनंति.