Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४०८] श्री. २१ सप्टेंबर १७५२.
पौ भाद्रपद शुध्द १३ गुरुवार
शके १६७४.
वो राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयकुशल लिहित असिलें पाहिजे. आपण पैठणास यावें.आह्मी पांचा साता रोजीं गंगातीरास येऊं, तेथें भेट होईल. कळावें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
[४०९] श्री. २३ सप्टेंबर १७५२.
पौ भाद्रपद वद्य ३ सोमवार शके १६७४.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. रायसधारीलाल यांचे अर्जी नबाबाचे जनाबेद पाठविली होती, ते नबाबाकडे रवाना केली. तिचा जाब आला तो इनायतनामा पाठविला आहे. प्रविष्ट करणें. यास उपरि तुमचे विचारांत जे जे अमीर असतील, त्या सर्वांस सांगून नबाबाचे मुलाजमतीस पाठवून देणें. नबाब फर्दापूरच्या घांटावर आलेयावर सर्वांही नम्र व्हावें. एकनिष्ठेनें हाजीर व्हावें. कोतवालास वगैरे, जे जे आहेत त्यांस, सांगणें सांगावें. आह्मीं चहूं दिवसां गंगातीरास येतों. तेथील अधिकारी यांणीं पुढें जाऊन भेटणें उचित. बऱ्हाणपुरकरासारखें कोपास जाईल, मग गोड करून घ्यावें, ऐसें न करावें, हें उत्तम. तुह्मीं अंतस्थें सूचना करणें. छ १४ जिल्काद. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४०७] श्री. २६ आगष्ट १७५२.
पौ श्रावण वद्य १३ बुधवार शके १६७४.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल स्वकीय लिहित गेलें पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. राजश्री सिधारीलाल याविशींचा मजकूर लिहिला तो कळला. त्यांनीं पत्र लिहिलें होतें; त्यावरूनही कळला. त्यांणीं अर्जीं लिहिलें आहे, तें आपले पत्रांत घालून जरूर गाजुदीखान यांस पावती होय तें करावें, ह्मणोन लिहिलें तें कळलें. सईद लष्करखान व जानोजी निंबाळकर आले आहेत, त्यांची हालचालीबद्दल वर्तमान आह्मांस लिहावें ह्मणजे संतोष होईल ह्मणोन तुह्मीं लिहिलें तें कळलें. गाजुदीखान अशीदीपलीकडे बोरगांवकर आले. आजला बऱ्हाणपुरास आले असतील ह्मणोन लिहिलें तें कळलें. आह्मीं पेडगांवांस काल आलों. जानबा, खान यांची भेट घेऊन, दोन रोज मजलीमुळें बोलणें झालें नाहीं. बोली झाल्यावर लिहून पाठवूं. हे येथे आले ह्मणोन सरदारांनीं केले कामास अंतर पडेल असा मजकूर नाहीं. सरदारही आजपर्यंत देखील फेरोजंग बऱ्हाणपुरास दाखल झाले असतील. आह्मांस येथें उतरावयास आठ दहा रोज लागतील. पांच सात हजार फौज जमा झाली. आठा रोजांत पंधरा हजार होईल. शहरकर गृहस्थांनीं जो आमचा विचार पहिला आहे, तोच निश्चय चित्तांत आणून फेरोजजंगास भेटावें याप्रो बोलणें. बहुत काय लिहिणें. सधारीलालाचे पत्राचें उत्तर पाठविलें आहे, हें देऊन बहुत समाधान करणें. आपली तयारी करावी. बुऱ्हाणपुराआलीकडे आलियास जाऊन मुलाजमत करावी. सरदारास व फेरोजंगास आपलीं पत्रें व त्याची अर्जी रवाना केली. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४०६] श्रीशंकर. १७ आगष्ट १७५२.
श्रीतीर्थराज वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
स्नेहांकित लालासधारीलाल कृतानेक नमस्कार. आज तापीपुरीहून वर्तमान आलें कीं, छ ५ पेशखाना छ ५ खजाना व कारखाने आणखी कुलनवाबसाहेबांचे मोहननालियावर पार येऊन उतरले व आपणही छ ७ दाखल पेशखाने जाले असतील. वर्तमान कुशाचें आलें नाहीं. रामसिंग व बखतसिंग, अजेतसिंगाचे लेक शहराजवळ आले. भेटी होणारी होती. नालियावर दाखल होतील व सैद लस्करखां व राव प्रधान छ ५ जिल्कादपावेतों पेडगांवींच आहेत. परंतु रावसाहेबांचा विचार धारुराकडे येयाचा आहे. हैदराबादकर सेनापति तेथेंच आहेत. नवाब गाजुदीखानांनीं ख्वाजमकुलीखानास आपले समागमें घेण्याचें केलें त्यांचाही डेरा बाहेर आला. कळलें पाहिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४०५] श्री. २७ जुलै १७५२.
पौ। आषाढ श्रावण शुध्द ११ शके १६७४.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराऊ प्रधान कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. येथील क्षेम ता आषाढ वद्य त्रयोदशी पावेतों यथास्थित असों. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. दरगाहाकुलीखान याजविशीं कितेक प्रकारें लिहिलें व गाजुद्दीखान व राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री जयाजी शिंदे यांस पत्रें लिहून पाठवावीं ह्मणून लिहिलें, तरी येविशीं आपण पूर्वीं पत्र लिहून पाठविलें होतें. त्यावरून पूर्वींच पत्रें लिहून पाठविलीं आहेत. + तुह्मींही गुप्त प्रकारें सरदारांस पत्र लिहिणें. जे जे ये प्रसंगीं चाकरी करून दाखवतील, त्यांचें बरेंच होईल यांत संशय नाहीं. आपण याअन्वयें निशा करावी. भागानगराकडील आपण वर्तमान लिहिलें. पुढेंही जरूर तिकडील अंतरबाह्य ठिकाणीं लावून, त्वरेनें पावे तें करावें. हे दिवस कामाचे फार आहेत व नर्मदा गाजुदीखान उतरले किंवा नाहीं हेंही जलद लिहावें. कोण इकडे तिकडें हें मनास आणून लिहित असावें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४०४] श्री. ११ जुलै १७५२.
पै॥ आषाढ वद्य ११ शनवार शके १६७४.
वेदमूर्ति राजश्री वासदेवभट दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष. पहिलें पत्र खानास तुमचे मार्फतीनें पाठविलें होतें, तें त्यांस प्रविष्ट होऊन त्याचें उत्तर आलें. वर्तमान अवगत जालें. प्रस्तुतही आणीक तुह्मीं पहिल्याअन्वयें त्यास लिहून जाब आणूनआह्मांकडे पाठविणें. वरकड हकीकत वर्तमानें माहितगिरी राखून वरचेवर लिहून पाठवीत जाणें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४०२] श्री. ५ मे १७५२.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री आपली अप्पाजी गणेश व गोपाळ गोविंद स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण दीक्षित हे श्रीमंत आहेत. त्यांस मोगलाई अम्मल तिहा, तेव्हांपासून सर्व यांचे आज्ञेप्रमाणें वर्तून, त्यांस मान्यता देत गेले. सांप्रत तो आमचा अम्मल जाहला. तेव्हां हें तुह्मांस सांगतील तें यांचे विचारें करीत जाणें. यांसी किमपि दुसरा विचार न दाखवितां विशेष पहिल्यापेक्षां चाले ते गोष्ट करणें. जरूर जरूर याप्रमाणें करणें. छ १ रज्जब. हे विनंति, शके १६७४.
[४०३] श्री. ४ जुलई १७५२.
वेदशास्त्रसंपन्न वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी विसाजी दादाजी साष्टांग नमस्कार विनंति. येथील कुशल ता आषाढ शुध्द ४ मु॥ पुणें जाणून स्वकीयलेखन करावयाची आज्ञा केली पाहिजे. विशेष. आपण श्रीहून आल्यावरी आशीर्वादपत्र येऊन वर्तमान कळलें नाहीं. तरी सदैव पत्रीं सांभाळ करावा. वरकड वर्तमान श्रीमंतांनी लिहिलें आहे त्यावरून विदित होईल. श्रीमध्यें तीर्थरूप मातुश्री आहेत व दादा आहेत. त्यांचें वर्तमान लिहिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४००] श्री. नोव्हेंबर १७५१.
श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
आज्ञाधारक बगाजी यादव सा ना विनंति उपर. उभयतां सैन्य विक्षेपयुक्त नगरप्रांतास आलें. ईश्वरकृपेनें श्रीमंताचा पुण्यप्रताप विशेष आहे. सर्व उत्तम होईल. आमचे घरी सुखसमाचार अगत्यरूप पावता कीजे. आत्या व चिरंजीव मनोहरपंत सुखें असतात.
सो विद्यार्थी मनोहर सा नमस्कार. आमचा सुखसमाचार घरीं पावता करावा. येथील प्रसंग श्रीकृपेनें दिवसोदिवस श्रीमंतांचा ऊर्जित आहे.. हे विनंति.
[४०१] श्री. फेब्रुवारी-मार्च १७५२.
चरणरज भगवंत भैरव सा नमस्कार विज्ञापना. चिरंजीव माधोबानें काल वर्तमान सांगितलें होतें, त्याजवरून मसोदा करून पाठविला आहे. त्याप्रों पत्र रा बाळाजी नारायण यांस लिहून जरूर पाठवावें. लाखोटा आह्मीं करून देऊं. राजकीय वर्तमान:- पुण्यांत गडबड फार झाली. मातबर तमाम पळोन गेले. मालमालियत कुलसिंहगडावर गेली. रा दमाजी गायकवाड सेनापतीस घेऊन सप्तऋषीस गेले. बापूजी बाजीराव पांच सात कोशीं मागें आहेत. दुसरी ताजी खबर आल्यावर लिहून पाठवूं. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३९९] श्री. जानेवारी १७५१.
विनंति उपरि आपण सांडणीस्वारासमागमें पत्रोत्तर पाठविलें तें प्रविष्ट जालें. खानाचा आशय दहा पांचांची जागीर द्यावी. वरकड आमच्यानें कांहीं होवत नाहीं. ह्मणून लिहिलें ऐसीयास:-
नवाब थोरले यांची कृपा खानावर आपली इतबारी ऐशी होती; परंतु नवाब कृपण. उत्तमप्रकारें खानास जागीर मनसब देऊन न वाढविलें. नासरजंगाची तों याजवर अवकृपाच होती. हे मात्र रंग राखोन होते. काळगतीनें नासरजंग मेले. आतां फेरोजंगामध्यें सामर्थ्य मजला दिसत नाहीं. त्यास मनसूर अलीखानांशीं बरें येतां कठीण. येथें नासरजंगाचा पुत्र असला अगर भाऊ असला तर उभा करावा. आह्मांस मातबर ऐवज द्यावा. सामील करून घ्यावें. फेरोजंगास ल्याहावें कीं, खामखां तुह्मांस जोर असला तर येणें. आह्मींही जमा होतों. नाना आह्मास रफीक जाले आहेत. फिरोन कडपेकर, नोलकर यांस मारोन घेतों. आले तर बरें. नाहीं तर आह्मीं येकले श्रीकृपेनें पारपत्यास समर्थ आहों. खजाना जमा करावा. तूर्त पंचवीस तीस आह्मांस द्यावा. आपण बाहीर निघावें. आह्मांस भेटावें. वरकडही या देशचे सर्व मोगल जमा करावे. हिदायत मोहिदीखानाचा काय मजकूर आहे ? तिकडे पठाण मातले. लटकी वजीरी करावयापावेतों पातशाहाशीं खुशामत करितात. वजीरी केलिया पातशाहात गेली ऐसी समजावी. इकडे हे पठाण मातले. कोणी वर्षामध्यें आटोपणार नाहीं. रोग नवा आहे तोंच दूर करावा. खानास योग्यता मोठी. आह्मीं जाणतों कीं, नासरजंग मेले तर फेरोजंगाचें नांव घ्यावें. आह्मांस त्यास एक विचार करावें. आमचें कार्य मातबर करावें, आणि हिदायत मोहिदीखान व पठाणास तंबी करावी. पठाण वाढतील, यांनीं दिल्लीस पळत जावें. तेथें यांस कोण पुसतो ? स्थलभ्रष्टता जाहलिया योग्य नाहीं. आमचें कर्ज फेडावें, ह्मणजे सरदार बोलावितों. सर्व एकत्र होऊन पठाणास तंबी करितों. जर न करीत तर मग आहे तें जाऊन उफराटें पठाणाच्या घरी वेरझारा कराव्या लागतील. प्रथम कामापुरतें जवळ या, जवळ या ऐसा बहूमान करितील. पुढें निर्माल्य होतील. आमचें कांहीं जात नाहीं.
आह्मीं तों जप्ती केली. हिदायत मोहिदीखानाबर कमर बांधिली. श्रीकृपेनें प्रसंग पडलियास नवाबाशीं लढाईत वडील वडील न चुकले. आह्मीं हा नव्याचा हिसाब धरीत नाहीं. तेव्हां खान येऊन मिळतील. त्यांत मजा नाहीं व मैत्रीची शान राहात नाहीं. नवाबाचे कबिले सर्व शहरांत ठेवावे. आह्मांस ऐवज मात्र कांहीं शहरावर लोकांपासून तूर्त कांहीं खजीन्यांतून द्यावा. गंगातीरावर येऊन भेटावें. तेच पूर्वेचे सुमारें चालत जावें. शहर आबाद मागें राहील तरच सलाबत पडेल. सुलातानजीचा लेंक हाताखाली घ्यावा. तेथील मराठेही आमचे विचारांत येतीलच. सर्व संवृध्दीची आशा आहे. जर खान हे न करीत तर जे होणें तें तों बरें वायटानें होईलच; परंतु शब्द त्यांवर राहील ऐसें न करावें. तिळमात्र दोष पदरी येत नसतां दिल्ली, लाहोर, मुलतान पावेतों लौकीक खानाचा होईल कीं, खानांनीं, प्रधानास मेळऊन घेऊन नवाबाचे दौलतेचें नांव राखिलें. ऐसें न करितां जोर ज्याचा पोंहचेल त्यास जाऊन भेटल्यास आखर वक्र जाऊन काम कांहीं सज्ज होणें नाहीं. बहुतां दिवसांची त्यांची आमची मैत्री. त्यांचें बरें व्हावें; आमचे कार्य व्हावें. नवाबाचा वंश मुख्य असेल, त्यांचें नांव दक्षिणेंत राहावें. यास्तव लिहिलें असतां कोणता दोष त्यांनीं या मनसब्यास ठेविला ? जर नवाबाचा तोरा कोणी तेथें नसला, व गाजुदीखानांनीं गांडींत शेपूट घातलें, यांणीं आमचेंही न आयकिलें, ह्मणजे येऊन शहर वेढील. त्याचे हवालां करून भेटावें, निरोप घेऊन दिल्लीस जावें, अथवा मक्केस जावें. ऐसें करावें, यांत काय फळ आहे ? जो जवां मर्द आहे त्यानें दोष येत नाहीं. ऐसा समय पाहून, आपलें कार्य व मित्रकार्य संपादून कीर्तीस पात्र व्हावें. उचित असे. १
हें पत्र खानास येकांतीं वाचून दाखविणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३९८] श्री. १ अक्टोबर १७५२.
पुरवणी राजश्री दादास्वामीस विनंति.
राजे यांचे मतलब लिहिले ते खरेच ! आपण यश घेतील. सारांश, काशींत आपली फौज राहील तोपावेतों भय नाहीं. फौज गेली ह्मणजे चरणाडीचा किल्ला काशीच्या उरावर नवाबाचा आहे. मोठें भय आहे. रा दिनानाथ गेटे येतील. आपण साह्यता करूं, राजे यानें श्रीमंतास व वडिलांस लिहिलें आहे. व गोपाळराव याचा व राजे यांचा करारमदार जाला, लिहिलीं परस्परे जालीं. त्यांची नक्कल पाठविली आहे. ब्राह्मणांस वांचवून आपलें होईल तर उत्तम आहे. सर्व नदर राजे यांची सर्वां गोष्टींनीं आह्मांवर आहे. त्यांचे कारभारी यांसी पत्र लिहिलें. कळलें पाहिजे. बहूत काय लिहिणें. कृपालोभ असो दीजे. इटावेयांत नव लक्ष रुपये सावकार वगैरे लाविले. तमाम बंद धरिले आहेत. काय ल्याहावें ? वजिराचा परामृष करतील तरी वजीर काशीस लुटूं पहातो. परंतु राजा आहे ह्मणून वांचलों आहों. हे कितीक नानाप्रकारचे उपद्रव करणार. ह्मणून सूचनार्थ अगत्य करून लिहिणें. येथें संकट जाणोन लिहिलें. अयोध्येचेकडे श्रीमंतांच्या फौजा उतरल्यानें सर्वही कामें होतील. राजा बळवंतसिंघही भेटेल. विशेष ह्या कामास अंतर पडलें तरी लक्ष ब्राह्मण मरतील. ह्यास अन्यथा नाहीं. मोगल समवेत उगेच आहेत. यश दहा सहस्र ब्राह्मण वांचविल्याचें पुण्य लागेल. यशही मोठें होईल. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असो दीजे. हे विनंति. मिति आश्विन शुध्द १३ शुक्रवार. हे विनंति.
चरणरज बापूजी महादेव स॥ नमस्कार विनंति. र॥ बाबानें लिहिलें त्याजवरून घोर न करणें. यश घेणें येईल तरी अगत्य घेणें. श्रीमंतांस राजे यांनीं पत्र लिहिलें त्याची नक्कल व गोपाळपंताचें पत्र, करारनामा लिहून घेतले होते तरी, त्याची नक्कल पाठविली आहे. वाचून पहाणें. चित्तास येईल तरी श्रीमंतांस दाखवणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३९७] श्री. २७ जून १७४२.
पुरवणी राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी:-
+++++++ मल्हारजीनें छावणी अंतर्वेदीत केली. राजश्री राम दीक्षित तिलक सैन्यांत आहेत. गोविंद नाईक आले त्यांनीं सांगितलें व पत्रें साहूकारांचीं येतात. मल्हारजीचे चित्तांत कीं, मशीद, विश्वेश्वराची ज्ञानवापीजवळी ते, पाडून देवालय करावें. परंतु पंचद्राविडी ब्राह्मण चिंता करितात कीं, हे मशीद प्रसिध्द आहे. पातशहाचा हुकूम नसतां पाटील देऊळ करील. एखादा पातशहा दुष्ट जाला ह्मणजे ब्राह्मणांस मरण येईल. जीवच घेईल. यवन प्रबळ या प्रांतीं विशेष आहेत. सर्वांचे चित्तास येत नाहीं. दुसरे जागा बांधिलें तरी बरें आहे. ब्राह्मण चिंता करितात. ++++++++ ब्राह्मणांची तरी दुर्दशा होईल. गंगा समर्थ. काशींत ब्राह्मण चिंता करितात. मना करीसा कोणी नाहीं. मना करावें तरी पाप कीं, देवाची स्थापना मना करावी हा दोष. परंतु ब्राह्मणां संकट न पडे तें करावें हें पुण्य विशेष. याजवर विश्वेश्वराचे चित्तांत येईल तें करील. चिंता करून काय होणे ? याजवर मशीद पाडूं लागतील तेव्हां सर्व ब्राह्मण मिळतील, आणि श्रीमंतांस विनंतिपत्र पाठवितील. ऐसा विचार जाला आहे. वर्तमान श्रवण केलें तें सेवेसीं लिहिलें. इ० इ० इ० मिति आषाढ शुध्द ६. हे विज्ञापना.