Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

त्यांचे रुपये जमा होते ते सर्वांस दिल्हे. आणखी जबाब घेऊन एकंदर लिहून घेऊन पाठविले आहेत. गोविंदभट वझ्यांचें मात्र राहिलें आहे. व शंकर दीक्षित पटवर्धन यांचे दोहों वर्षांचे रुपये शंभर त्यांस तेथेंच देऊन जबाब घेऊन तुह्मीं त्यांस दिले असतील ते वळवून घेणें. व प्राणनाथभट गाडगीळ यांस तीनशें रुपये आहेत. त्यांस त्या उभयतांचा शोध नाहीं. त्यांचे स्त्रियेस दोनशें रुपये दिले. त्यांची मातुश्री भिन्न आहे. ती समक्ष येथें नाहीं. याजकरितां शंभर रुपये ठेविले आहेत. तर यजमानास पुसोन तिजला देववितील तर देऊं. अथवा त्यांचे स्त्रीसच द्या ह्मणाले तर देऊं. यानंतर यादवरावाकडे तगादापत्रें पाठवितों, परंतु धामधूम प्रयागीं होती. रुपये आले नाहींत. तगादा करितों आले ह्मणजे लिहोन पाठऊं. घरींच दशाश्चमेधी ब्राह्मणभोजन यथास्थित चालतें. घरीं शें सवाशें होतें. छत्रामध्यें चार पांचशें व सन्यासी चाळीस तीसपर्यंत होते. अन्न सवंग आहे. तांदूळ बारीक उत्तम, चहूं पासऱ्यांपासून सा पासऱ्यांपर्यंत मोठे तांदूळ मण सवामण. गहूं अकरा पासरी रुपयाचे. चणे बारा पासरी रुपयाचे. दाळ दीड मण. जब दोन मण. तूप तीन शेर. साखर चिनी पक्की आठा रुपयां मण. तांबडी दोहों रुपयांपर्यंत मण. खुर्दा तेवीस टक्के. हा भाव आहे. गाजीपूर, जमुनी यामध्यें पठाण होते. त्यास राजबलबंड सिंहांशी लढाई जाहली. पायउतारा होऊन लढले. भोजपुरे सुधरसहा पठाणांकडे होता त्यास मारिलें. राजाचा जय जाहला. ते लुटून घेतले, कांहीं पळाले. गाजीपुरांत याचा अंमल जाला. यानंतर सुरतेध्यें सुभ्यांशीं व किल्लेदाराशीं झगडा जाहला. किल्लेदारानें गनीमास बोलावून शहरावर मार गोळयांचा केला. तेणेंकरून घरें बहुत जळालीं. माल बहुत जळाला. हीं काल सुरतेंची लिहिलीं सावकारांच्या घरीं आलीं. चहूंकडे धूम आहे. सवद्याविषयीं केशवास सांगितलें होतें. त्यास काशी शिक्का पंधरा रुपयांनीं दिल्लीचा तर मिळतच नाहीं. पहातों. तलाशामध्यें आहों. इ० इ० इ० हे विनंति.

[३८४]                                                                    श्री.                                                           १५ मे १७५१.

पौ श्रावण शुध्द १० सोमवार शके
१६७३ प्रजापति नाम.

तीर्थस्वरूप दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें बाळकृष्ण दीक्षित पाटणकर यांचे शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम ज्येष्ठ वदि २ देशचा जाणोन वडिलांच्या आशीर्वादें समस्त सुखरूप असों. विशेष. वडिलांचे पत्र भवानी दर्जी याजबरोबर पाठविलें. पावोन बहुत समाधान जाहालें. त्या उपरांत आपलें पत्र येत नाहीं. तर वरचेवर पत्र पाठवीत जाणें. व रुपये लोकांचे पाठविले होते त्याप्रमाणें ज्यांचे त्यांस देऊन जबाब घेऊन पाठविले. पावलेच असतील. वेदमूर्ति रामकृष्ण दीक्षित गोडसे ज्येष्ठ शुध्द एकादशीस घरास आले. आमचे घरास आले. बहुत शिष्टाचार केला. आह्मीं, केशव त्यांचे घरास गेलों होतों. वारंवार तुमची स्तूत करीत होते. खरगोष्टपर्यंत मला पोहोंचवून दिलें. कित्येक शिष्टाचाराच्याच गोष्टी केल्या. यानंतर या प्रांतींचें वर्तामान :- गोविंदभट वझा अद्याप तसाच आहे. प्रायश्चित्त घेतसें नाहीं. घरांत बसोन राहिला आहे. गोविंद नाईक आल्यावर उद्योग करावा असा हेत दिसतो. पाहावें. मल्हारजी फरुकाबादेकडे आहेत. जबाब शिष्टाचार बहुत करितो. पठाणांस मारिलें, फत्ते जाहाली. मोठें यश आलें. रोहिलेयांशीं नबाबाशीं सख्य करून द्यावें. मध्यस्थ पडले आहेत. हावे. छावणी अंतर्वेदींत करावी असें नबाब ह्मणतो. हे अनमान करीत आहेत. परंतु बहुधा छावणी होईल ऐसें दिसतें. लूट हत्ती तीस, घोडीं, उंटें, तोफा सर्व हरिभक्तांहीं घेतलीं. तोफा कालपीस पाठविल्या. गोविंदपंत, नारो शंकर, लक्ष्मण शंकर सर्व सांगातेच आहेत. हे स्थळाची बोली घातली आहे. हेंही आपणाकडे करून घेतील ऐसें दिसतें. यानंतर वर्षासनें ब्राह्मणांचीं पौषमासीं दिलीं. यंदांचे रुपये अद्याप आले नाहींत. आल्यावर देऊं. जबाब व याददास्त, रामचंद्रपंत भट जनार्दनपंताची यात्रा घेऊन आले होते, त्यांजबरोबर साता वर्षांचा पाठविला आहे. सवासातशें रुपये अधिक लागले. ते आपणांजवळून दिले आहेत. याखेरीज हल्लीं वराता श्रीमंतांहीं देविले. वीरेश्वरभट केळकर ५०, आत्मारामभट २५, सदाशिवभट काळे ५०, कृष्णराव धनुर्धारी याचे पुतणीस २५ हा ऐवज आणिक पाहिजे. व परभूकडे ब्राह्मण होते त्यांणीं प्रायश्चित्तें केलीं.

[३८३]A                                                                    श्रीपांडुरंग.                                                           १२ मे १७५१.

सुभेदार

श्रीमत्ममहाराज राजश्री वासुदेवभट दीक्षित मु॥ कायगांव सेवेसी :-
सेवक सैद हसन मु॥ लष्कर दंडवत विनंति येथील क्षेम त॥ वैशाख वदि १३ पर्यंत जाणोन स्वकीय क्षेम लिहून सांभाळ केला पाहिजे. विशेष. मौजे जामगांव येथील कामकाजाविषयीं भाई सैदलष्करखान यांसी व भाई मुरादखान व तुह्मांस ऐसे तिघाजणांस,पत्रें श्रीमत्साहेब यांनीं लिहिलीं आहेत. तर आपण मौजे मजकुरास येऊन, ज्यांशीं त्यांशीं पत्रें प्रविष्ट करून, वडीलपणें गांवाचा निर्गम केला पाहिजे. खंडणी गुदस्ताप्रमाणें करून वसूल देविला पाहिजे. जाजती तोशिस न लागेल तें करावें. अशानशी न ऐकतील तर आह्मी आलियावर सर्व गोष्टींचें पारपत्य होईल. येथील वर्तमान तर:- मनसूरअल्ली वजीर यासी मदत होऊन पठाणावर चढाई केली. मग यमुनापार होऊन भागीरथीचे तीरीं पठाणांची गांठ पडली. मग खळयांमधून झुंज देऊं लागला. दाणापाणी पलीकडून येत असे. यास्तव दिरंग लागला. मग भागीरथीस पूल बांधून रा. गंगाधर यशवंत यांजबरोबर फौज देऊन पलीकडे गेलों. उभयता श्रीमंत अलीकडे पठाण होता त्याजवर राहिले. मग ईश्वरकृपेकरून पलीकडील फौज मोडून तारांगण केलें. ईश्वरें यश दिल्हें. अलीकडीलही मोडला. सदरहू पठाणाची फौज बुडविली. खासा ती राउतांनसीं पळोन गेला. ईश्वरें आपल्यास यश दिलें. आतां देशाकडे ढाला दिल्या. मनसूरअल्लीनें काशीची व प्रयागची क्रमणा केली. यंदा लष्करें देशास येतील. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दिजे. हे विनंति.

शिष्टाचाराच्याच गोष्टी करून आणीक चर्चा केली नाहीं. खर्चास नाहीं. खर्चाकरितां श्रमी आहे. कर्ज धुंडितो आहे. यानंतर येथें सर्वांनीं क्षौरपूर्वक प्रायश्चित्तें केलीं. गोविंदभट वझा एकलाच राहिला आहे. कराडे पांच सात आहेत. तेही आठा पंधरा दिवसांत उतरतील. बहुत फजित जाहले. बाळंभट वझे आदिकरून ज्यांहीं प्रायश्चित्तें केलीं, त्यांचे सर्वांचे रुपये वर्षासनाचे दिल्हे. साता वर्षांचा हिशेब कुल करून, पेशव्यांकडून जनोबाची यात्रा घेऊन रामचंद्रपंत आला होता तें सर्व दानधर्म आमच्याच विद्यमानें जाहाला. पेशव्यांहीं पत्र आह्मांस लिहिलें होतें. त्यांसही सांगितलें होतें, जें करणें तें दीक्षितांच्या विद्यमानें करणें. तेणेंप्रमाणेंच केलें. ते आठा चहूं दिवशीं अमृतरायाबरोबर देशास जातील. त्यांस वर्षासनाचा साता वर्षांचा हिशेब पाठविला आहे, समजाऊन दिल्हा. त्यामध्यें नानांहीं नवीं वर्षासनें केलीं व पेशव्यांहीं सनदा नव्या केल्या व गतकुलें जाहालीं. हें सर्व लिहोन पाठविलें आहे. त्यामध्यें आपले पदरचे रुपये ७२५ जाजती दिल्हे आहेत. त्याच्या हिशेबाची नक्कल करून मागून तुह्माकडे व कबजें ब्राह्मणाचीं पाठवितों व वर्षासनाचा ऐवज गोविंदपंत पाठवीत नाहीं. मागील राहिलें होतें तें दोन चार पत्रें पाठविलीं तेव्हां आलें. आतां माघमाशीं दोन वर्षें होतील. चार वेळा गोविंदपंतास लिहिलें, परंतु ऐवज येत नाहीं. ऐवज येईल तेव्हां द्यावें. त्याहीनंतर जशी आज्ञा येईल तसें करूं. यानंतर प्राणनाथभट गाडगिळांचा तर कोठें शोध नाहीं. त्यांस तीन शत रुपये वर्षासन आहे. त्यांध्यें यंदा दोनशे रुपये त्याचे स्त्रियेस दिल्हे. शंभर बाकी आहेत. त्यांस त्यांची मातु:श्रीस उपोषणें पडतात. तिजला कपर्दिक देत नाहीं. यास्तव पेशव्यास पुसावें. जंव मातु:श्री आहे तंव तिजला शत रुपये देऊं. दोन शत प्राणनाथभटाचे स्त्रियेस देऊं. जशी आज्ञा करतील तसें करूं. याखेरीज पेशव्यांहीं यंदा वराता दिल्या आहेत. कृष्णराव धनुर्धारी याची पुतणी २५, गणेश दीक्षित ओक ५०, आत्मारामभट २५, वीरेश्वरभट केळकर ५० एकूण शंभराच्या सनदा घेऊन आले आहेत. येकूण सवा आठशे जाजती रुपये लागले. हे मजुरा घेणें. याचा ऐवज साल दरसाल गोविंदपंतावर घेणें. यात्रा यंदा मोहनसराईस आली. तेथें रात्रौ डाका पडला. सदाशिवभट इंगळे व नारो महादेव मुळे पारोळेकर मारले गेले. बाकी घायाळ बहुत जाहले. लुटले गेले. ऐसे कधीं न जाहलें तसें यंदा जाहलें. हें पूर्वी बापूजीपंतास सविस्तर लिहिलें आहे. हें पत्र त्वरेनें लिहिलें. मागाहून हरबाजी नाईक नवाळे यांचा काशीद दोहों चहूं दिवशीं निघणार त्याबरोबर वर्षासनाची ब्राह्मणांची कबजे व हिशेब पाठवून देऊं. वरकड हें पत्र त्वरेनें लिहिलें आहे. मागाहून सविस्तर लिहों. सुज्ञाप्रति बहुत काय लिहिणें. लोभ असो देणें. हे विनंति. मिति ज्येष्ठ वदि ८ मंगळवार, संवत् १८०८.*

[३८३]                                                                       श्री.                                                             ७ मे १७५१.

पै॥ ज्येष्ठ वद्य ३० बुधवार
शके १६७३ प्रजापतिनाम.

तीर्थस्वरूप दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें बाळकृष्ण दीक्षित शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम वडिलांचे आशीर्वादें समस्त सुखरूप असों. विशेष. वडिलांचीं पत्रें माघ शुध्द ११ व एक फाल्गुन शुध्द १ शुक्रवारचीं पाठविलीं तीं पावोन बहुत संतोष जाहला. यानंतर या प्रांतींचें वर्तमान :- आह्मीं गयेस गेलों होतों. तीर्थरूपांचें गयावर्जन उत्तम रीतीनें केलें. दोन सहस्र रुपये लागले. ब्राह्मण गयावळ यज्ञोपवीत होते. सर्वांस भोजन घातलें. दीड सहस्र पात्र जाहलें. तीन मास तेथें होतों. गयावळांस दक्षणा साशत रुपये दिल्हे. वरकड ब्राह्मणभोजन, वाटखर्च सर्व दोन सहस्र लागले. परंतु उत्तम नांवाप्रमाणें करावें लागलें. परंतु रागास न येणें. जातेसमयीं वाटेस दाऊद नगरी उतरलों होतों. तेथें अकस्मात् निळोपंत वैशंपायन यांचे फक्त स्वार तीन चारशें येऊन दाऊद नगरचा गंज मारिला. चहूं लक्षांची मालमत्ता घेऊन गेले. आह्मांवरही हात फिरविला. वस्त्रेपात्रें व एक साखळी बारा तोळयांची गेली. सरदार कोणी नव्हता. मानाजी भागवत ह्मणऊन होता, तो ह्मणों लागला जें, मुकाम होते तर वस्तभाव येती. मग गयेस गेलों. निळोपंत व रघूजीचा पुत्र हे रामगडाकडे होते. या प्रांतीं येते तर भेट होती. परंतु तेथूनच फिरोन गेले. गयेमध्यें होतों येव्हढयामध्यें प्रयागीं पठाण रोहिले आले. प्रयागचें शहर मारिलें, हें काशीमध्यें लोकांहीं आयकिलें. तसे येथें भयाभीत लोक जाहले. राजानेंही लिहिलें जें ज्यास जिकडे सुभीता होईल तिकडे जाणें. त्यावरून सर्व लोक बहुत गडबड जाहली. सर्व लोक ज्यास जिकडे वाट फावली तिकडे गेले. दोन दिवस मनुष्य नाहीं. बाजारचें नहर उघडिलें असें कधीं जाहलें नव्हतें ऐसें धैर्य लोकांचें गेलें. राजा जाऊन प्रयागी पठाणास भेटला. साता लक्षांवर मामला करून आला. कोतवाल पठाणांचा येथें येऊन बसला. मग स्वस्थ जाहले. प्रयागच्या किल्ल्याशी भांडत होते. इतकियामध्यें नवाब मनसूरअल्ली मल्हारजीस घेऊन फरुकाबादेस आले. हें वर्तमान आयकोन पठाण प्रयागींहून फिरोन गेले. फरुकाबादेजवळ युध्द मोठें जाहलें. मल्हारजी व गंगोबा यांहीं दोन प्रहर युध्द केलें. पठाण व रोहिलें कापून काढिले. दहा पंधरा सहस्र खेत आलें. मुख्य सरदार अहमतखान पळोन गेला. लूट सर्व गनीमास देविली. हस्ती, घोडे, तोफखाना, वस्तभाव सर्व मल्हारजीचें. कोणास माफ केली. नवाब बहुत मेहेरबान जाहले. लोकोत्तर यश मल्हारजीस आलें. तीन क्रोडी द्रव्य देऊं केलें व पंचवीस लक्षी मुलूख अंतर्वेदीमध्यें देऊं केला आहे. वैशाख शुध्द ५ युध्द जाहलें. कालच पत्रें आलीं. मल्हारजी ग्रहणाकारणें प्रयागास येणार ऐसें आहे. पहावें. प्रयाग, काशी होणार ऐसें वर्तामान आहे. पहावें. अमृतराव काशीस आला आहे. येथें आमच्या घरी आला होता.

[३८२]A                                                                       श्री.                                                        ९ एप्रिल १७५१.

सेवेसी नरसिंगराऊ सा नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता छ ३ रोज शुक्रवार जाणोन आपलें कुशल आनंद लिहीत असिलें पाहिजे. विशेष. इंद्रप्रस्थाहून अग्निहोत्री यजमानस्वामींचें पत्र डाकेमध्यें ता छ १७ जमादिलावल माझे नांवें आलें. त्यांत लिहिलें आहे कीं, येथून विप्राचे नांवें, वडील पुत्राचे मुद्रेनशीं, कृपापत्रें दोन पाठविलीं कीं सत्वर हजूर येणें. त्यास, बहुधा ते तेथून तापीपुरास आले असतील. तर तुह्मीं शोध करून त्याजला लौकर इकडे पाठवून देणें. कितीक कामें त्यांचे आल्यावर मवकूफ आहेत. यास्तव सेवेसी विनंति केली जाती कीं, वर्तमान कोणे प्रकारचें आहे यांसी बरें विचारलें पाहिजे. कितीक स्थळीं शोधास मनुष्यें पाठवून गोष्ट ठिकाणीं लावली पाहिजे. ऐसें न होय कीं ते सुरक्षित चालले जात. जर भुलावा देऊन गेले तर मोठा उपद्व्याप करतील. या कार्यानिमित्य एकांतीं, प्रगट तर न होय. अंतस्थ मनुष्यें लावून पत्तेवार गोष्ट लिहिली पाहिजे कीं, कोठें आहेत, काय विचार करितात. येविशीं निश्चित न राहावें. जधीपासून हें वर्तमान ऐकिलें, चैन नाहीं. आह्मींही शोधांत आहोंत. कळलें पाहिजे. लष्कर भागानगरास आलें. तेथून स्वार जालें ह्मणजे आह्मीं येथून स्वार होऊन येऊं. तुह्मीं सातारियाचे कामासाठीं लिहिलें. त्यासी, जर ते लौकरीच येतात, तर समक्षच लागू होऊन करून घेतों. जर न आले तर जें लिहिणे तें पूर्वीं लिहिलें आहे. आतांही लिहिलें जाईल. चिंता न करावी. आपले कार्यांत अंतराय करणार नाहीं. हें पत्र वाचून फाडून टाकावें. राजश्री गोपाळपंतासही सूचना करावी. हे विनंति.

[३८२]                                                                       श्री.                                                        ९ एप्रिल १७५१.

से ॥ विद्यार्थी नरसिंगराऊ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम चैत्र वदि ९ जाणोन स्वामींहीं स्वानंदवैभव लिहित असिलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाले कीं, आशीर्वादपत्रें सांभाळ न केला. हें कृपादृष्टीपासून दूर आहे. सदैव पत्रद्वारें परामर्श करीत असिलें पाहिजे. आमचें वर्तमान तर:- आपले आशीर्वादेकरून लेकरेंबाळें समस्त मंडळी सुखरूप आहेत. राजश्री राजा रघुनाथदासजीची कृपा आह्मावर बहुत. या उर्जित दशेमध्यें आह्माशीं स्नेह केला ऐसा कोण्हाशीं केला नसेल. त्याचे थोरीस अंतर नाहीं. पेषकारी पातशाही व मुतसदीगिरीं, बुऱ्हाणपूर दोन्ही चिरंजीव उत्तम राऊजीचे नांवें व मुशरफी व खजानचिगिरी, वकीली दडारीपरसाई, हे चिरंजीव अच्युतरायाचे नांवें करून दोन इनायतनामे पाठवून दिले. दखलकार जालों. लौकिकांत भूषणास कारण जालें. सुभेदार वगैरे सर्व, त्यांची कृपा आह्मावर जाणोन खुषामत करतात. ईश्वर त्यांजला बहुसाल करो ! सैन्यांतही सर्वांशीं स्नेह व कृपा संपादिली, याजमुळें लोक राजी व यजमानाची कृपा विशेष. आह्मांस बहुताप्रकारें लिहिलें कीं, तुह्मीं सत्वर येणें येविशीं कृपापत्रें यजमानांचीं येतात, व दोन सहस्र रुपये वाटखर्चासही पाठविले. इतकें कोणास अगत्य आलें आहे ! वैकुंठवासीमागें आजीपावेतों विप्राचे प्राबल्यामुळें श्रमतच राहिलों. आतां भगवान् या गृहस्थास कांहीं दिवस विराजित ठेवो कीं आमचे श्रमाचा परिहार करतील. सैन्य भागानगराहून चालिलें ह्मणजे औरंगाबादेस येईल, ह्मणजे मीही तेथें येईन. भेटीचा लाभ होईल. बहुता दिवसांपासून इच्छा आहे कीं दर्शनाचा लाभ व्हावा. वरकड सर्व खुशाल असे. हे विनंति.

[३८१]                                                                       श्री.                                                      २ एप्रिल १७५१.

पौ वैशाख शुध्द ९ मंगळवार
शके १६७२.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
पोष्य विनायक दीक्षित पटवर्धन साष्टांग नमस्कार इ.इ.इ. इकडील वर्तमान तर सर्व स्वस्थ आहे. गायकवाड संकटांतच आहेत. श्रीमंतांची फौज वीस हजार भोंवती आहे. पाणी नाहीं व दाणावैरण जाऊं देत नाहीं. सातारा व वाई वगैरेभोवतें सर्व श्रीमंतांचेच फौजेनें उध्वस्त जालें. गायकवाडास कोणाची कुमक पोहोंचत नाहीं व आईसाहेबही वरचेवरच गोष्टी सांगतात. आणून फसविलें ऐसें जालें ! कळावें ह्मणून लिहिलें असे. भागानगराकडील वर्तमान सविस्तर लिहिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. हे विनंति. मिति चैत्र वदि ३ शके १६७३ प्रजापतिनाम संवत्सर.

[३८०]                                                                       श्री.                                                      २३ मार्च १७५१.

वेदशास्त्रादिसंपन्न श्रीमंत राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति. सेवक देवजी नागनाथ साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल त॥ चैत्र शुध्द ८ जाणोन स्वकीय निजानंद लेखनाज्ञा कीजे. विशेष. श्रीमंत पंतप्रधान स्वामी फौजेसह वर्तमान रघुजी भोसले व र॥ फत्तेसिंग भोसले यांचे फौजेसुध्दां हैदराबादपुढें सात मजला ताम्राचे फौजेसंनिध सात कोशीचे तजावजीनें पानगळानजीक मुक्काम केला. पांच सात रोज मुक्काम होते. ताम्रासमागमेंही वीस हजार फौज फिरंगीसुध्दां आहेत. सेवेसी जानोजी निंबाळकर दरम्यान येऊन सतरा लक्षांवर मुकदमा चुकला. पैकी दोन लक्ष नक्त दिल्हे, तीन लक्षांची वरात भागानगरावर, बाकीची वरात औरंगाबाद व बऱ्हाणपूर यांजवर देविली आहे. जफ्ती खानदेश वगैरे कुल मोकळी करावी ऐसा निश्चय जाला. स्वामीस श्रुत होय. ताम्रही भागानगरास आज उद्यां कूच करून जाणार. श्रीमंतही कृष्णातीर धरून सप्तऋषीस जाणार. कुच छ ६ अगर छ ७ जमादिलावली होणारसें मुकरर आहे. ते प्रांतीं दमाजी गायकवाड गेला ह्मणोन वर्तमान श्रीमंतांस विदित जालें आहे, यामुळे जातात. मागें एक दोन पत्रें लिहिली; परंतु उत्तर न आलें. तरी येणारासमागमें पत्र पाठवून सेवकाचा परामर्ष करीत असिलें पाहिजे. मी सेवक पदरचा आहे. मजवर कृपा करीत जाणें. बहुत काय लिहूं हे विनंति.

पु॥ विनंति उपरि राजश्री रामदासपंताशीं व श्रीमंताशी भेट जाली. श्रीमंतांनी एक हत्ती व एक घोडा व मोत्यांचा चवकडा आणीक वस्त्रें त्यांस दिधली. कळलें पाहिजे. हे विनंति.

[३७९]                                                                       श्री.                                                      १७ मार्च १७५१.

पै॥ चैत्र शुध्द ११ मंगळवार,
शके १६७३ प्रजापति नाम संवत्सरे
हुंडीपत्र मित्ती मजकुरी रवाना
केलें, ब॥ सकवारजी जासूद.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी त्रिंबकराव विश्वनाथ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल त॥ चैत्र शुध्द १ प्रतिपदापर्यंत स्वामीचे आशीर्वादेंकरून सुखरूप असो. विशेष. काल सातारियाहून पत्र राजश्री नाना पुरंधरे यांचें आलें. तेथें लिहिलें कीं, गायकवाड फौजेसह वर्तमान सातारियास जाऊन, वेणेवर जाऊन मुक्काम केला. आह्मी जाऊन कृष्णेवर दुसरे दिवशीं मुक्काम करणार. त्यास, गायकवाड फौज तयार करून, वेणा उतरून आले. आह्मीही कृष्णा उतरोन पलीकडे गेलों. त्यांचें आमचें शुक्रवारी झुंज प्रहरभर जालें. त्यांचा मोड जाला. ते पळून चालिले, तेव्हां सातारापर्यंत आह्मी पाठलाग केला. यांचा गोट लुटून फस्त केला. पालख्या, उंटें, घोडी घेतली. स्वामीचे आशीर्वादें यश श्रीमंतांचे फौजेस आले. वर्तमान संतोषाचें कळावें ह्मणून लि॥ असे. याउपरही नवल विशेष होईल तें लिहून प॥. मौजे साकूर, प्रांत नाशिक येथील मात्र एक कार्य स्वामीस करावयाविशी विनंति केली. तेही स्वामीनें कबूल केली, ह्मणून वारंवार स्मरणार्थ लिहितों. खानही थोर आहेत. त्यांनी एकदां दिल्हें तयास हरकोणाचे लि॥ वरून संदेहांत पडावें ऐसें नाहीं. X X X X न स्वामी आहेत. त्याचा आह्मास वारंवार संशय होईल न होईल, होतों हेंच अपूर्व आहे ! आह्मी आपले स्वकीय कार्याविशी इतके ल्याहावें, मग स्वामीनी भीड खर्चून करावें, हेंच उचित दिसत असेल तर लिहीत जाऊं. परंतु याउपर तरी हे पत्र बहुत पत्रांचे जागा मानून हें कार्य सर्व प्रकारें भीड खर्चून अगत्यरूप करून घेतलें पाहिजे. तुह्माखेरीज आह्मी आणीक कोणास ल्याहावें ? जेव्हा सुलभ होतें तेव्हांच आह्मीं ह्मणत होतों. तेव्हां स्वामी बोलिले कीं, हें कार्य आमचे जिम्मे, मग आह्मी काय ह्मणावें ? तर याउपरि लौकर लि॥ प्र॥ निखालस करणें. नवा आमील गेला, त्यास व जमीनदारास व गांवकरी यांस ऐशी पत्रें घेऊन पाठविली पाहिजेत. बहुत काय लिहिणें हे विनंति.