[३७२]A श्री. २६ डिसेंबर १७५०.
पै॥ पौष शुध्द ९ बुधवार.
शके १६७२.
वेदमूर्ती राजश्री वासुदेव दीक्षित स्वामी गोसावी यांसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. येथें वर्तमान सावनु राहून लिहिलें आलें आहे कीं, नासरजंगास पठाण व फिरंगी यांनीं लढाईचे गडबडीत दंगा करून मारिलें. दोहों चहूं दिवसांत तहकीक वर्तमानहि येईल. जर हें वर्तमान तहकीक तेथें आलें असेल तर याचा विचार आमचे मनांत येणेंप्रमाणें आहे. तुह्मासी सैदलष्करखानासी निखालसता असली तरी एकांती जाऊन बोलावें कीं, खानाची आमची मैत्रिकी, येप्रसंगी खानांनीं सर्व प्रकारे आमचे पदरी पडावें, अवरंगाबाद व बऱ्हाणपूर दोन्ही सुभे आमचे हवाली करावे, शहरांतील खजाना सर्व आमचे हवाली करून कर्जपरिहार होय तें करावें, आपले सर्व प्रकारें जागीर मनसब घेऊन आमचे हातून आपलें बरें करून घ्यावें, हा उत्तम पक्ष. दुसरा प्रकार : नासरजंग याचे लोक अथवा भाऊ यांस उभे करून आह्मांस कर्जपरिहारार्थ व फौजेचे एक वर्षाचे बेगमीस ऐवज देऊन आह्मांस सामील करून घ्यावें. वराड वगैरे जागांची जे फौज, तोफखाना जमा करून आह्मांसमागमें चलावें. आह्मी चाळीस हजार फौजेनिशी सिध्द आहों. दाभाडयाकडील कारभार तहरह पडिला कीं, निमे प्रांत आह्मांस द्यावा व निमे त्यांनी खावा. अद्याप कागदपत्र आला नाहीं. होईल. आठा दिवसांनी हा कारभार उरकून, नीट हिदायतमोहिदीनखानावर चल देतों. येणेंप्रमाणें ऐकिलियास यांचें आमचे मित्रत्वाचें सार्थक, त्यांचेंही ऊर्जित. यांत काही बेमानी त्यांचे पदरी येत नाहीं. इतकेंहि न करीत, तर मग आह्मांस ईश्वर बुध्दि देईल तें आह्मीं करूं. त्यांची आमची मैत्री मात्र व्यर्थ होईल. जर यांचा डौल पहिल्यापासून हिदायत मोहिदिनखानाकडे अंतस्तें असला तर मात्र हे येणेंप्रमाणें करणार नाहीत. जर हे उदासपणें हिदायतमोहिदीन खानाकडे राजकारण न करतां असले आणि नासरजंग स्वर्ग पावले असले, तर हें करतील. दुसरे मनसब आहे जसा प्रसंग जाणावा तसा करावा. ये प्रसंगी आमचे कार्य व आपले ऊर्जित करून घ्यावयाचा समय आहे. तुमचे ठायी विश्वास व आमचे ठायी निष्ठा असली आणि हें वर्तमान तहकीक आलें असलें, तर येणेंप्रमाणें अगत्य करणें. खानाची आमची क्रिया आहे कीं, हरएक प्रसंगी आमचे कार्यास त्यांनी न चुकावें व आह्मीं त्यांचे बरें करावयास न चुकावें असे आहे. नासरजंग असतां हरएक मनसुबा आह्मी करावा, खानांनी साहित्य करावें. तर बेमानी पदरास येते तें केलें असेल तर यांजकडे दोष तिळमात्र न येतां, आमचें कार्य होऊन यांचे ऊर्जित होतें. एकांती साफ बोलणें. हे विनंति.