[३६७] श्री.
श्रीमत्परमहंस श्री स्वामीचे सेवेसी :-
चरणरज बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना. येथील कुशल श्रीकृपें त॥ श्रावण वद्य त्रयोदशी यथास्थित असे. विशेष. श्रीकारणें व स्वामीकारणें वस्त्रें पाठविली आहेत.बि॥
दुपट्टे कुसुंबी, दुपट्टा चांदणी, दुलई.
२ १ १
येणेंप्रमाणें पाठविली असेत. प्रविष्ट जाहाल्याचें उत्तर पाठविलें पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
[३६८] श्री.
श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें विसाजीराम चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना. स्वामीचे कृपेकरून वर्तमान कुशल असे. विशेष. स्वामीचे सेवेसी निगडेल वजन खरें विकत घेऊन पाठविलें आहे. घेतलें पाहिजे. आपण स्वामीचा चरणरज आहे. जे होणें जाणें ते स्वामीचे आशीर्वादें होईल. सर्व कारभार मनसबा स्वामीचा आहे. सर्वदां आशीर्वाद देऊन कल्याण करणार श्रीचा व आपला आशीर्वाद आहे. बहुत ल्याहावें तों स्वामी सर्वज्ञ आहेत. हे विज्ञापना.