Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ११४.
१७०२ वैशाख शु।।१२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. राजश्री नारो सिवदेव यांची रवानगी पाटीलबावांकडे पत्राकरितां होत आहे. अलिकडे पत्र आल्यास उत्तमच जालें. कदाचित् न आल्यास मशारनिले गेल्यावर येईलच, यांत गुंता नाहीं. परंतु हे पोंहचून पत्र येण्यास दीड महिना लागेल. तोंपावेतों मसलत राहूं नये. नवाबबहादूर यांणीं नमूद व्हावें. तुह्मीं करारप्रमाणें गुंते उगवून जलद यावें. तुह्मी आलियावर रावरास्ते यांजकडील फौज व मातबर रवाना करण्यांत येईल. सारांश, याउपरीं नवाबांनीं राहूं नये. जलद निघावें. ह्मणजे नवाबनिजामअली-खांबहादूरही सिकाकोलीकडे जातील. कदाचित् बरसात आली ह्मणोन, त्यांणीं अनमान केला तरी नवाबबहादूर........................नवाबाचें ह्मणणें एकच कीं, नवाबबहादूर यांचें जाणें चेनापट्टणाकडे जाल्यावर आमचा गुंता किमपि नाहीं, ऐसें आहे. यास्तव नवाबबहादूर यांणीं फार सत्वर निघावें. वारंवार काय ल्याहावें ? सर्व पल्ले व मसलती नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहेत र॥ छ १० जमादिलावल हे विनंति.
पै छ २६ जमादिलावल, सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २६ जमादिलावल, लेखांक ११३. १७०२ वैशाख शु. १२.
सन समानीन. श्री. १५ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। हरी बल्लाल सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं चैत्र वद्य १ पत्रें पाठविलीं, तें पावून मजकूर समजला. नवाबबहादर वद्य त्रयोदसीस डेरेदाखल होणार. आमचे रवानगीचीही सर्व तयारी जाली. रावसिंदे यांचें पत्र लौकर यावें ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, इंग्रजास सजा चांगली चहूंकडून एकदांच व्हावयांत कामें फार आहेत, नफेही आहेत, ऐसें जाणून नवाबबहादूर यांसीं पक्की दोस्ती जाली. इंग्रजांची तंबी करणें ही मसलत लहान नाहीं. दिवस तों झाडून निघोन गेले. सरकारच्या फौजांची लढाई शुरूं. अशांत चेनापट्टणाकडे ताण बसल्यानें सार्थक. कितेक लढे होते, तेही सर्व सोडून, नवाबबहादूर यांचे दोस्तीवर नजर देऊन, श्रीमंतांनीं खातरखा करून दिल्ह्या. एक सिंदे यांचे पत्र येणें राहिलें आहे. त्यांजकडे सांडणीस्वार व जासूद पाठविले. पैकीं कांहीं मारले गेले, कांहीं लुटले गेले ते सडे आले, यास्तव हालीं राजश्री नारो शिवदेव यांची रवानगी सिंदे यांजकडे होत आहे. हे गेल्यावर पत्र येईल. त्यास, पत्रासाठींच मसलतीवर जाणें तटवणें हें ठीक नाहीं. पत्र आलियावर पोहचावीत असों. नवाबबहादूर यांणीं कूच करून चेनापट्टणाकडे जावें. तुह्मीं गुंते उगवून सत्वर यावें. सरकारचा तहनामा जाला व मदारुलमाहाम यांचीं पत्रें पाठविलीं. मग सिंदे यांचेंही पत्र येईल. इतकियावर संशय घेऊन रहाणें योग्य नाहीं. मसलतीवर नजर असावी. सर्व नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहे. इकडील वर्तमान सविस्तर श्रीमंत राजश्री नानांनीं लिहिलें यावरून कळेल. *सारांश गोष्ट, राजश्री पाटीलबावांचें पत्र आगेंमागें येईल. परंतु, मसलतीचे दिवस निघून जातात; हें पुढें येणार नाहीं. याकरितां जलदी करून चिनापट्टणाकडे जावें, हें नेक सलाह आहे. र॥ छ १० जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ११२.
१७०२ वैशाख शु.१२ श्री. १५ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पे।। बाळाजी जनार्दन सां।। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं चैत्र वद्य १ पत्रें पाठविलीं, तें वद्य त्रयोदशीस पावलीं. दोन चार पत्रें पाठविलीं उत्तर येत नाहीं; नवाबसाहेब हमेश विचारितात, यास्तव पत्रें वरचेवर येत असावीं. नवाबसाहेब यांणीं ऐवज सावकाराचे पदरीं घातला. आपण खासा शुद्धपक्षीं निघणार होते; परंतु चिरागांचे दिवस, सबब वद्य त्रयोदशीस निघावयाचा नेम केला आहे. इंग्रजांचे तंबीचा शोक मोठा. श्रीमंताकडील लक्ष मनःपूर्वक आहे. एक वेळ वचन केलें, इथःपर लोक नानाप्रकारें समजावितात, परंतु खातरेस आणीत नाहींत. आपले वचनाचे कायमीवर श्रीमंताचे दौलतीची तरकी व्हावी, दुषमानास नसीयत घडावी हेच अपेक्षा आहे. राव सिंदे यांजकडील पत्र जलद येऊन पावलें ह्मणजे आमची रवानगी करून नवाबसाहेब मसलतीवर नमूद होतील, ह्मणोन लिहिलें. ऐसीयास तुमचीं पत्रें आलीं, त्यांचीं झाडून उत्तरें व इकडील मजकूर नवाबबहादर यांस कळावा ह्मणोन पेशजींच पत्रांचे जाब देऊन रवानगी केली, तें पत्रें अलिकडे तुह्मांस पावलीं असतील. सावकाराचे पदरीं ऐवज घातला, फार चांगलें. नवाब बहादूर बो(ल)ल्याप्रमाणें निभावतील, ही खातरजमा आहे. शुद्धपक्षीं निघोन मसलतीवर जाणें होतें ह्मणजे फार ठीक पडतें. इंग्रजांस ताण बसता. त्यास चिरागामुळें राहणें जालें. असो. वद्य त्रयोदशीस निघाले असतील. कदाचित् नसले निघाले तरी, याउपरीं त-ही जलद दरमजल चेनापट्टण तालुकियांत जाणें घडावें. सरदार व सरकारच्या फौजा जाऊन लढाई दररोज शुरूं आहे. भोंसले कटकच्या सुमारास गेले. इंग्रजाचे तालुकियांत शिरले असतील. अशांत नवाबबहादूर यांजकडून जकड बसावी. सालअखेर जालें. दिवस कांहींच राहिले नाहींत. याजकरितां जलदीचें काम आहे. कदाचित् नवाबबहादूर ह्मणतील, साल झालें, बरसात आली तरी काय मुजाका आहे ? बरसातींतच आह्मीं लाई शुरू करूं. त्यास, हलीं झाडून लढाई गुजराथेंत पडली. चेनापटणचे लोक मदतीस दर्याचे मार्गानें सुरतेस उतरतात. तिकडे नवाबाकडून ताण बसता, तरी लोक मदतीस येऊन पावते. तसेंच गुजराथेंत बरसातींत लढाई चालणार नाहीं. छावणी होईल. ते समईं नवाबबहादराकडील शुरूं जाली, तरी इकडील लोक तिकडे मदत जातील. जळमार्ग मोकळा आहे. यास्तव इकडे लढाई भारी पडली. अशांत नवाबबहादूर यांचे. जाणें जलद होतें, ह्मणजे चहूंकडून एकदांच लढाई पडून आयास येते. सजा पक्की होईल. यास्तव नवाबबहादूर यांणीं फार लौकर जावें, ह्मणजे केल्या कराराचें सार्थक आहे. आणि इंग्रजाचे तंबीचा शोक आहे तो शेवटास जाईल. श्रीमंताचे स्नेहाची तरकी दिनबदिन ज्यादा आहे आणि यांतच नफेही आहेत. राजश्री राव सिंदे यांचें पत्र लौकर यावें ह्मणोन लिहिलें. त्यास, पत्राविशीं फार वेळ सिंदे यांस लिहिलें. इकडून पत्रें त्यांस पावलीं. परंतु तिकडून कागदापत्राचा निभाव होईना. कांहीं जोड्या मारल्या गेल्या. कांहीं हरकारे येतात, ते लुटून सडे येतात. ऐशा अडचणी आहेत. शेवटीं कागदपत्रांकरितां राजश्री नारो शिवदेव यांस बराबर स्वार देऊन पाठवावयाची तर्तूद केली. मशारनिले यांचे घरीं मुंज आहे. दो चौ रोजीं वाईंतून येतील. वैशाख वद्य प्रतिपदेस त्यांची रवानगी. मशारनिले पोंहचतांच पत्र येईल. त्यास अलबत्ता महिना दीड महिना लागेल. पत्र येतांच नवाबबहादूर यांजकडे पोंहचावीत असों. येविशीं खातरजमा असावी. हें पत्र येण्यास दिवसगत लागेल, तोंपावेतों नवाबबहादूर यांणीं तटून न राहतां, जलद मसलतीवर नमूद व्हावें. मोठे मसलतीवर नजर असावी. हे सर्व दरजे त्यांचे खातरेंत आहेत. ल्याहावें ऐसें नाहीं. *मसलतीचे दिवस निघोन गेले. लिहिण्या पुसण्याचखालीं गेले ! एक साल फौजेची सिबंदी सरकारांत चढली. तहनामा जलद मसलतीवर जाणें घडावें ह्मणोन लौकर पाठविला, कीं चोहूंकडून इंग्रेजांस ताण चांगला बसून मसलत चांगली व्हावी. याकरितां गुदस्ताचा ऐवज सोडून मसुद्याप्रमाणें तहनामे पाठविले. त्यास साडेतीन महिने जाले. शेवटीं अखेर साल जहालें. इकडे तर तीन महिने इंग्रजांची व उभयतां सरदारांची लढाई लागल्यास जहाले; व सुरतेकडे वे पणवेलीकडे इंग्रेजांच्या लढाया होऊन इंग्रेज मारले व आरमारची लढाई याप्रमाणें चालल्या आहेत. सिंद्यांचेच पत्राकरितां विलंब लागतो असें असतें, तर यांचें पत्र आल्यावर तहनामे पाठविले असते. असो, याउपर तरी लौकर जाणें घडावें, हें उत्तम. र॥ छ १० जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
पे॥ छ २६ जमादिलावल. सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पौ। छ २६ जमादिलावल. लेखांक १११. १७०२ वैशाख शु।।११.
सन समानीन. श्री. १४ मे १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः–अलिकडे तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास हामेश लिहित जावें. तिकडील मजकूर समजला. नवाबबहादर चैत्र वद्य त्रयोदसीस डेरेदाखल होणार. आमचे रवानगीची तयारी सर्व जाली. एक राव सिंदे यांचे खातरजमेचें पत्र येण्याचे गुंता ह्मणोन लिहिलें होतें. ऐसियास, सिंदे यांचें पत्र आणवयाविसीं इकडून जासूद व सांडणीस्वार फार रवाना जाले. परंतु, वाटेमुळें जासूद बहुत मारले गेले. निभाऊन येतात ते लुटले यतात. जबानीं वर्तमान ऐकावें ऐसें आहे, याजमुळें दिक्कत. त्यास, हालीं सेंदोनसें स्वार देऊन राजश्री नारो सिवदेव यांची रवानगी होत आहे. ते जाऊन पोंहचल्यानंतर पत्र घेऊन, मुजरद कारकून स्वार देऊन, रवानगी करतील. यास एक मास सवा मास लागेल. इतके दिवस मसलत तटून राखणें उचित नाहीं. इंग्रजास सजा करणें काम मोठें. दिवस कांहींच नाहींत. यास्तव त्रयोदसीस डेरेदाखल जाले असतीलच. पुढें दरकुच जावें. तुह्मीं गुंते करारप्रमाणें उगवून यावें. सरकारचा करारनामा व मदारुलमाहाम यांचीं वगैरे पत्रें पाठविलीं असतां, आतां सिंदे यांचे पत्राकरितांच तटून रहाणें काय ? हीं पत्रें जालीं, तेव्हां तेंही पत्र आघेंमाघें येईल. आलियानंतर जलद पावतें होईल. इकडील सविस्तर राजश्री नाना यांणीं लिहिल्यावरून कळेल. नवाबबहादूर यांसही पत्रें पाठविलीं, पोंहचतीं करावीं.* र॥ छ ९ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दिजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
र॥ छ ९ जमादिलावल. लेखांक ११०. १७०२ वैशाख शु।।११.
समानीन. श्री. १४ मे १७८०.
बहुत दिवस गुजरले, आमेहरबांकडून खत येऊन खुसी होत नाहीं. त्यास दोस्तीचें अलमांत ऐसें नसावें. हामेश खत-किताबतीचा सिलसिला ज्यारी असोन, आपली खैर खुसी कळवीत जावी, हें यखलासास लाजम आहे. आमेहेरबांचें जाणें ताहाल चेनापट्टणप्रांतीं होत नाहीं. आजपावेतों इंग्रेजास चहूंकडून ताण बसोन आयास यावे. भोंसले मातबर फौजनसीं कटकाच्या जिल्ह्यांत पोहचले. बलकी इंग्रेजाचे तालुक्यांत हांगामा सुरू केला असेल. सरकारच्या फौजा व सरदार यांची व कर्नेल गाडद याची दररोज लढाई होत आहे. घेराघेरीमुळें इंग्रेज बतंग केले. चालून आले, तेथें निभाव होईना व सरदारांपुढें मुकाबिल्यास कायम न रहावें, व गिराणीही न्याहायत जाली, सबब इंग्रेज माघारें सरून बडोद्याचे आश्रयास गेले. बिलफैल आमेहरबांकडून ताण बसावा, इतकाच तवकुफ. त्यास, मसलहतीवर नजर देऊन, जूद चेनापट्टण तालुकियांत जाणें होय तें घडावें. राव सिंदे यांचे पत्राची अटकाव असलिया तेंही जलदच येईल. पत्राविसीं रावसिंदे यांजकडे बहुत वेळ कलमीं केलें. लेकिन, राहाच्या खलशामुळें निभाव होत नाहीं. हमेश हारकारे लुटले जाऊन सडे येतात. त्यास, मोठी मसलत तटून रहाणें मुनासब नाहीं. रावसिंदे यांचें पत्र येतांच आमेहरबांकडे पोंहचावीत असों. ये बाब खातरजमा असावी. इंग्रेजाचे तंबीची मसलत उमदी हरवख्त तदबीर होऊन नमुदांत यावी. हे सलाह नेक, यांजकरितां मसलहतीस मदनजर राहून, चेनापट्टणच्या जिल्ह्यांत सरंजाम सुधां (द्धां) जूद पोंहचून, तालुका ताख्त व ताराज करावा. सर्व दरजे वरातम आसाहेबाचे दिलनिसीन आहेत. कलमीं करावें ऐसें नाहीं. ममईकर इंग्रजांनीं कोंकणच्या सरहदेंत शोखी केली. सबब सरकारची जमीयत जाऊन त्यांस तंबी करून कतल केलें. जरबा पांच चार होत्या, त्या लुटून आणिल्या. मुफसल कृष्णराव नारायण यांस लिहिलें आहे, ते जाहीर करतील. ह्मणोन हैदरअल्लीखान यांस नानांचें नांवें पत्र.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २० जमादिलाखर. लेखांक १०९. १७०२ वैशाख शु।।६.
मु।। निलवंगल. श्री. १० मे १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः- नवाबबहादूर यांसी व सरकारांसी पकी दोस्ती जाली. तेव्हां, तिकडील मजकूर इकडे समजावा, इकडील तिकडे समजावा, सबब तुम्हीं निरोप घेऊन याल ते समईं, राजश्री गणेशपंत नि॥ राव रास्ते यांस नवाबबहादूर यांजपासीं ठेऊन यावें, ऐसें लिहिलें होतें. त्याचें उत्तर तुम्हीं लिहिलें कीं, गणेशपंत राहावयास गुंता नाहीं; परंतु नवाबबहादूर यांचें ह्मणे (णें) किं, हे सर्व विषईं माहीत गोविंदराव होते, ते नाहींत. त्यापक्षीं गणेशपंत तुह्मांबराबर येतील. रावरास्ते यांस इकडील सर्व समजावितील, ऐसें लिहिलें. त्यावरून हालीं राजश्री रवळोपंत नि॥ राव रास्ते यांस पाठविले आहेत. त्यास, तुम्हीं निरोप घेऊन, येतेसमईं मशारनिले यांस नवाबबहादूर यांजपासीं ठेऊन यावें. ह्मणजे नवाबबहादर सांगतील त्याप्रमाणें इकडे लिहित जातील. र॥ छ ५ जमादिलोवल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ २२, रबिलाखर, लेखांक १०८. पो। १७०२ चैत्र व॥ ९
सन समानीन. श्री. २८ एप्रिल १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णरावजी तात्या यांसीं :-
प्रति गोविंदभट निदसुरे आसीर्वाद विनंति. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असलें पाहिजे. विशेष. आपण दोन पत्रें पाठविलीं तीं पावलीं. पत्रीं लिहिलें कीं, "नवाबसाहेब आमची रवानगी करून सत्वरच इंग्रजाचे मसलतीस जाणार. आमचे ठांई नवाबसाहेब बहुत ममता करितात.” ह्मणोन विस्तारेंकरून लिहिलें, तें कळलें. ऐसियास, नवाबसाहेब थोर आहेत. आपणावर ममता करितात, हें उचितच आहे. श्रीमंत राजश्री नाना यांचे आज्ञेप्रमाणें तेथील कामकाज उरकोन लवकर आलें पाहिजे. सविस्तर x अर्थ x श्रीमंतांचे पत्रावरून विदित होईल. सदैव पत्र पाठऊन राजकीय स्वकीयार्थ कळवीत असावें. *भेट होईल तो सुदिन. बहुत काय लिहिणें लोभ करावा, हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ ५ जमादिलावल, लेखांक १०७. १७०२ चत्रै व।। ८
सन समानीन. श्रीशंकर प्रसन्न. २७ एप्रिल १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य आनंदराव भिकाजी कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल ता। चैत्र वद्य ७ सप्तमी पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण छ २० रबिलावलचें पत्र पों। तें पावलें. लेखनार्थ कळला. असेंच सदैव पत्र पाठऊन संतोषवीत असावें. इकडील सविस्तर मजकूर राजश्री गणेश केशव यांस लिहिला आहे. त्याजवरून व राजश्री नाना यांणीं आपणांस लिहिलें आहे त्याजवरून कळों येईल. *रवाना छ २१ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ ५ जमादिलावल, लेखांक १०६. १७०२ चत्रै व।। ७।२
सन समानीन. श्री. २६ एप्रिल १७८०.
पु।। राराजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल, ता। छ १८ माहे रबिलाखर, जाणून वर्तमान यथास्थित असे. विशेषः-तुह्मीं छ २० माहे रबिलावरचें पत्र पाठविलें तें पावलें. सविस्तर मजकूर समजला. अलीकडे राजश्री नानी यांस पत्रें आलीं. त्यांत राजश्री पाटीलबाबा यांजकडील पत्राचा आक्षेप लिहिला. त्यास, इकडून मसविदा व पत्रें पाटीलबावांकडे रवाना केलीं. तें त्यांस पोहचलीं. सडे स्वारींत होत. तेथून जाब आले कीं, उदईक मसविद्याप्रमाणें पत्र रवाना करतों. ऐसीं आलीं. एका दों दिवसीं पत्र आलियावर तुह्मांकडे रवानगी होईल. सारांष, पत्र येण्याची दिक्कत नाहीं. च्यार रोज अधिकउणे ते वाटेमुळें काय लागतील ते लागोत. यासाठींच मसलत तटून राखावी, हे ठीक नाहीं. तुह्मीं व राजश्री नरसिंगराव मिळोन नवाबबहादर याची खातरजमा करावी आणि मसलतीवर यांचें जाणें अति सत्वर घडावें. तुह्मीं कार्यभाग उरकोन जलद यावें. पत्र आलें ऐसें समजोन नवाबबहादरांनीं जावें. येतांच त्यांजकडे पोंहचावितील. सविस्तर राजश्री नानांनीं लिहिलें त्यांवरून कळेल. र॥ छ २०, रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे, हे विनंति.
स्वामींचे सेवेसीं:- गोविंद भगवंत सां। नमस्कार विनंति जे, फार पत्रें आलीं. माझें स्मरण न जालें. हें आपणापासोन दूर असावें. हामेशा पत्रीं संतोषवावें. सविस्तर श्रीमंत नानांनीं लिहिल्याप्रमाणें घडोन सत्वर यावें. लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १०५.
१७०२ चैत्र व. ७ श्री. २५ एप्रिल १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. सरदार गुजराथ प्रांतीं इंग्रजावर सरंजामसुधां गेले. तिकडून इंग्रजही आले. बडोद्याचे तालुकियांत यांची त्यांची समीपता जाली. एक दोन लढाया गोळागोळीच्या जाल्या. नित्य घेराघेरी होत असतां, दोन वेळ इंग्रजाची कही मारून लुटली. मैदानांत आपला परिणाम होणार नाहीं, ऐसें जाणून आडचणीची जागा पाहून, पाणी धरून राहिले. आणि छापा सरदारांवर घालावा ऐसा मनसबा करून, भारी सरंजामनसीं रात्रौ चालून आले. सरदारही सावध होते. तयार होऊन गोटाबाहेर येऊन उभे राहिले. लढाई चांगली जाली. गोळागोळी राहून हत्यार चालिलें. इकडील वीस पंचवीस माणूस ठार व चाळीस पन्नास जखमी जालें. इंग्रजाकडीलही चाळीस पन्नास ठार व से दीडसें जखमी जालीं. करनेल गाडर याचा भाचा व तोफखान्याचा दारोगा व एक कोशलदार ऐसे तिघे मातबर त्याजकडील ठार जाले. सेवटी इंग्रज हाटऊन गोटांत नेऊन घालविले. त्याचे दुसरे रोजीं सरदारांनीं, आपलें पेंढार माळव्यांतून आणविलें होते, तें बारा तेरा हजार आलें. त्यांचा बहुमान करून, त्यांस इंग्रजाभोंवतीं नेहमीं घेराघेरी करावयाचें काम सांगितलें. त्यांणीं जाऊन प्रथम तोफखान्याचे बैल व उंटें तट्टें ऐसीं वळून आणिलीं. बडोद्याहून पांच सातसें बैल रसद भरून येत होती, ते ही लुटून आणिली. पेंढारी आल्यापासोन केवळच बंदी इंग्रजाची जाली. सरदार फौजसह नित्य तयार होऊन चालून जातात. आडचणीची जागा आहे ते त्यांणीं सोडून मैदानांत यावें, हे इच्छा आहे. यांस त्यांस फासळा तीन कोसांचा आहे. येणेंप्रमाणें वर्तमान आलें. पुढें येईल तें लिहिले जाईल. सर्व मजकूर तुह्मीं नवाबबहादूर यांस सांगावें. सुरत आठाविशींत राजश्री गणेशपंत बेहरे यांणीं हांगामा केला आहे. शेहरची बंदी केली. दर्यांत आरमाराची लढाई हामेश होत आहे. एकून तीन लढाया इंग्रजांसीं सरकारांतून चालल्या आहेत. सिवाय किरकोळी हें निराळेंच. भोंसल्याची फौज बंगाल्याचे सरहद्देस पोहचली असेल. नवाबबहादूर यांचें जाणें चेनापट्टण प्रांतीं जलद व्हावें, ह्मणजे नवाबनिजामअलीखाबहादूरही सिकाकोलीकडे जातील. चहूंकडील ताण खूब बसल्यानंतर इंग्रजासही पक्कें समजून सजा चांगली होईल. सारांष याउपरी नवाबबहादूर यांचे जाण्यास ढील न व्हावी. दरकूच जाणें घडावें. *इंग्रेजाचीं सवासें उंटें व हजार बैल तोफांचे सरदाराकडील फौजेनें आणिले. नित्य चाललेंच आहे. रा। छ १९ रबिलाखर. हे विनंति. येथूनही राजश्री पाटीलबावांकडे हुजरातची फौज तयार करून मदतीस पाठवीत असों. हे विनंति.