पै।। छ ५ जमादिलावल, लेखांक १०६. १७०२ चत्रै व।। ७।२
सन समानीन. श्री. २६ एप्रिल १७८०.
पु।। राराजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल, ता। छ १८ माहे रबिलाखर, जाणून वर्तमान यथास्थित असे. विशेषः-तुह्मीं छ २० माहे रबिलावरचें पत्र पाठविलें तें पावलें. सविस्तर मजकूर समजला. अलीकडे राजश्री नानी यांस पत्रें आलीं. त्यांत राजश्री पाटीलबाबा यांजकडील पत्राचा आक्षेप लिहिला. त्यास, इकडून मसविदा व पत्रें पाटीलबावांकडे रवाना केलीं. तें त्यांस पोहचलीं. सडे स्वारींत होत. तेथून जाब आले कीं, उदईक मसविद्याप्रमाणें पत्र रवाना करतों. ऐसीं आलीं. एका दों दिवसीं पत्र आलियावर तुह्मांकडे रवानगी होईल. सारांष, पत्र येण्याची दिक्कत नाहीं. च्यार रोज अधिकउणे ते वाटेमुळें काय लागतील ते लागोत. यासाठींच मसलत तटून राखावी, हे ठीक नाहीं. तुह्मीं व राजश्री नरसिंगराव मिळोन नवाबबहादर याची खातरजमा करावी आणि मसलतीवर यांचें जाणें अति सत्वर घडावें. तुह्मीं कार्यभाग उरकोन जलद यावें. पत्र आलें ऐसें समजोन नवाबबहादरांनीं जावें. येतांच त्यांजकडे पोंहचावितील. सविस्तर राजश्री नानांनीं लिहिलें त्यांवरून कळेल. र॥ छ २०, रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे, हे विनंति.
स्वामींचे सेवेसीं:- गोविंद भगवंत सां। नमस्कार विनंति जे, फार पत्रें आलीं. माझें स्मरण न जालें. हें आपणापासोन दूर असावें. हामेशा पत्रीं संतोषवावें. सविस्तर श्रीमंत नानांनीं लिहिल्याप्रमाणें घडोन सत्वर यावें. लोभ कीजे हे विनंति.