Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २२ रबिलाखर, लेखांक ९४. १७०२ चैत्र शु।। ८.
सन समानीन. श्री. १२ एप्रिल १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं: -
विनंति उपरी. सरकारच्या फौजा व सरदार गुजराथ-प्रांतीं जाऊन बडोद्या नजीक इंग्रजासीं गांठ घातली. नित्य घेराघेरी होऊन गोळागोळी होतच आहे. भोंवताला तमाम मुलूक मारून ताराज केला. इंग्रजाचे सैन्यांत दाण्याचा-याची मोठी तसदी. एक दोन वेळ कही ही सरदारांनीं मारली. फाल्गुन वद्य पंचमीस लढाई मोठी जाली. इंग्रजाचा आराबा पिऊन फौजा आंत धसल्या. हत्यार चालिलें. इंग्रजी लोक बहुतेक कापून काहडले. त्यांस बरीच जक दिल्ही. इतकियांत इंग्रज यांणीं संभाळून बच्याव करून हटून राहिले. गाईकवाड यांचें सूत्र पक्कें आहे. परंतु, अदियाप इंग्रजापासोन निघाले नाहींत. राजश्री गोविंदराव गाइकवाड यांस सरदारांनीं आणविलें. ते आले. पांच हजार फौजनसीं आहेत. फत्तेसिंग गाइकवाड यांस मोठें च वर्म आहे. त्याचें ही राजकारण आहे. न बनल्यास हें ही आहे. लौकर च काय ठरणें तें ठरेल. एकूण गाइकवाड बहुत करून फुटून येतील, एसें आहे. राजश्री गणेशपंत बेहरे दाहा हजार फौजनसीं तमाम सुरत-प्रांतीं जाऊन जाळून खाक केले. शेहरची बंदी केली आहे. इंग्रजांनीं सरकारचे महाल वगैरे ठाणीं घेतलीं होतीं, तें सर्व सोडऊन बंदोबस्त केला. कळावें नवाबबहादूर यांस सर्व वर्तमान सांगावें. *तुह्मीं दोन पत्रें या पूर्वीं पाठविलीं, तीं पावलीं. र छ ६ रबिलाखर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ९३.
१७०२ चैत्र शु. ८ श्री. १२ एप्रिल १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः-तुह्मीं दोन पत्रें पाठविलीं तें पावलीं. आपणाकडून करारनामे व निभावणीचीं पत्रें पावलीं. त्यांवरून नवाबबहादूर यांणीं, चेनापट्टणचे कुमसेलवाले आले होते, त्यांस रुकसत दिल्ही. फाल्गुन वद्य सप्तमीस डेरे बाहेर दिल्हे. खासाही सत्वरच डेरेदाखल होऊन चेनापट्टणाकडे जाणार. आतां कांहीं गुंता राहिला नाहीं. आह्मांसही निरोप देण्याची सर्व तर्तुद केली. लौकरच निरोप देतील, ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, इंग्रजाची मसलत भारी. सरकारच्या फौजा व सरदार जाऊन लढाया नित्य होतात. इंग्रज बतंग केले आहेत. याचा त।। अलाहिदा लिहिला आहे. नवाबबहादूर यांस याउपरी जावयास दिवसगत न लागावी. हांगामाचे दिवस हेच आहेत. लांब लांब मजलीनें दरकुच चेनापट्टण प्रांतीं नमूद व्हावें. सरंजामी कांहीं नवी होण्याची नाहीं. सर्व सिद्धता जालीच आहे. आतां ढील नसावी. चैत्र अखेर पावेतों इंग्रजास जाऊन बतंग केलें, मकानें (णें) घेतलीं, असें वर्तमान लौकर यावें. ह्मणजे केले मसलतीचें सार्थक. वारंवार हाच मजकूर काय ल्याहावा? सर्व नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहे. र।।छ ६ रबिलाखर. *बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
पै।। छ २२, रबिलाखर, सन सनानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ९२.
१७०१ फाल्गुन. श्री. मार्च १७८०.
सेवेसीं विनंती ऐसीजेः-
अलीकडे च्यार पांच वेळां दरबारास गेलों होतों. कितेक ममतेच्या गोष्टी बोलीले. कृपा बहुत करितात. इंग्रजांस तंबी करून श्रीमंतांचे स्नेहाची वृद्धी व्हावी हेच इच्छा आहे. सांडणीस्वारासमागमें नवाबसाहेब यांनीं मसुदे करून दिल्हे, ते पाठविले आहेत. त्यांतील दोन तीन कलमें कमपेष आहेत. ध्यानांत येतील. परंतु थोर मसलतीवर नजर देऊन, मर्जीस आल्यास करारनामा वे मध्यस्थाचीं पत्रें सत्वर रवाना करावीं. सावकाराकडून ऐवजाची निशा केलीयाचा मजकूर पेशजीं लिहिलाच आहे व तर्तुदही जाली आहे. सरकारचीं पत्रें यावयासच दिवसगत लागेल, ती लागो. येथे कोणें गोष्टीचा आळस किमपि नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २९ रबिलावल, लेखांक ९१. १७०१ फाल्गुन व॥ ६.
सन समानीन. श्रीशंकर प्रसन्न. २६ मार्च १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीः-
पो। आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असावें. विशेषः-अलिकडे आपणांकडून पत्र येऊन कुशळतेचें वर्तमान कळत नाहीं. तरी, सदैव पत्र पाठऊन संतोषवीत असावें. यानंतर इकडील सर्व मजकूर राजश्री गोविंदराव नारायण व गणपतराव केशव यांचे पत्रीं लिहिला आहे, त्याजवरून कळेल. *निरंतर पत्रीं आनंदवीत जावें. रवाना छ १९ रबिलावल. बहुत काय लिहिणें? लोभ करीत जावा. हे विनंतिः
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २९ रबिलावल, सन समानीन. लेखांक ९०. १७०१ फाल्गुन व॥ ६
मयावआलफ ऊर्फ फा।। मास. श्री. २६ मार्च १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णाराव बल्लाळ सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल त॥ छ १९ माहे रबिलावल जाणून वर्तमान यथास्थित असे. विशेषः-- तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. नवाबसाहेब यांणीं मसविदे पाठविले त्याप्रमाणें तहनामा व मध्येस्ताचीं पत्रें आहादशर्तीनसीं आलीं ह्मणजे, ऐवजासहित आमची रवानगी करून, आपण चेनापट्टणाकडे जाणार. सर्व तयारी जाली आहे. पत्राची मात्र प्रतीक्ष्या. नवाबसाहेब यांचा आपला पुरातन स्नेह, सबब सरकारांत तोड जोड समजाऊन यांचे मनोदयानरूप घडे तें करावें, ह्मणोन लिहिलें. ऐसियांस, तुह्मांकडील पत्र व मसविदे आले, तेच समईं विचार केला. करारांत तों अंतर आहे. सरकारची नुकसानी होती. परंतु, नवाबबहादूर यांचे दोस्तीवर व इंग्रजाचे तंबीचे मसलतीवर नजर ठेऊन मसविद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें छ २१ माहे सफरीं रवाना केलीं, तें पावलीं असतील. इकडील गुंता राहिला नाहीं. एक राजश्री पाटीलबाबा यांचें निभावणीचें पत्र येणें तें आणविलें आहे. लौकरच येईल. उपरांतीक रवाना होईल. गुजराथ पल्ला लांब, वाटेंत नाना प्रकारें दिक्कती जाल्या, याजमुळें दिवसगत लागली आहे. आलियावर पाठवण्यांत येईल. त्यासाठींच अडून राहाण्याचें कारण नाहीं. मोहीमचे दिवस फार थोडे राहिले, याजकरितां सत्वर नवाबांनीं निघोन चेनापट्टण प्रांतीं नमूद व्हावें. इंग्रजास तंबी करावी. कुमशेलवाले आले ते कांबूची बहुतां प्रकारें बजीदी करतील, लालूच दाखवितील, त्यांची जात मकरी, ह्मणोन नवाबबाहदूर च लिहित आहेत. तेव्हां त्यास खूब चाल वाकफ आहे. सारांष, त्यांस ठेवणें सलाह नाहीं. चेनापट्टणाकडे त्यांस नवाबबहादूर यांणीं सत्वर जाऊन करारप्रमाणें गुंते उगऊन तुह्मीं मंडळीसहित लौकर यावें. इकडील लढा कोणेविशीं राहिला नाहीं. सर्व गोष्टी त्यांचे मनोदयानुरूप करून दिल्ह्या. अदवानीकरास मुसा लाली यांचे तलबे ब॥ तगादा आहे, ह्मणोन ऐकितों. त्यास, मुसा लाली यांचे तलबेचा तगादा न व्हावा. मिरजकर वगैरे सरकारी जरूरीचीं कामें उगऊन घेऊन यावीं. सर्व राजश्री नाना यांचे पत्रावरून कळतच असेल.
र।। छ माहे रबिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति.
स्वामींचे सेवेसीं गोविंद भगवंत सं॥ नमस्कार. आपलीं पत्रें फार आलीं. परंतु माझें स्मरणच न जालें, ऐसें नसावें. हामेश ममतेनें व कृपेनें पत्रीं संतोषवीत जावें. सविस्तर इकडील श्रीमंत राजश्री नानांचे पत्रावरून कळतच असेल. यश पुर्ते घेऊन कार्यें उगऊन लौकर यावें. लोभ कीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ८९.
१७०१ फाल्गुन वद्य ५ श्री. २५ मार्च १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. राजश्री मोरोबादादा आमदानगराहून निघोन गेले, ह्मणोन बाजारू वर्तमान उठलें आहे. त्यास, खबर बातल ऐसें नवाबबहादूर बोलिले, ह्मणोन लिहिलें. त्यास, बाजारू खबरी मनस्वी सर्वां ठिकाणीं उठतात. त्याजवर प्रमाण काय आहे ? नवाबबहादूर बोलिले ते समजोन बोलिले. अशा गोष्टी कशा घडतील ? बंदोबस्त चांगला आहे. रा। छ १८ रा।।वल. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ८८.
१७०१ फाल्गुन व॥ ५ श्री. २५ मार्च १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः-तुह्मीं छ १७ व छ २२ माहे सफरचीं व छ १ माहे रबिलावलचीं पत्रें पाठविलीं, तें पाऊन सविस्तर अर्थ ध्यानांत आले. त्यांचीं उत्तरें अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिलीं, त्यावरून कळेल. छ १८ रविलोवल, बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
पो। छ २९ रबिलोवल सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ८७.
१७०१ फाल्गुन व।। ४ श्री. २४ मार्च १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. नवाबबाहदूर यांचें मनोगत सर्व प्रकारें श्रीमंतांसीं स्नेह करावा हेंच आहे. दोन जाबसाल कंपेश. येविशीं कल्पना न आणावी. मसविद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें यावीं. यांचीं सर्व सरंजामी जाली. तिकडील पत्राची मात्र गुंता. मीर रजाआलीखां इंग्रजाचे तालुकियांत जाऊन हांगामा शुरु केला. नित्य बातनी येती. आपणांकडील पत्रें सत्वर यावीं ह्मणोन फार ता। लिहिलें. ऐसियास, श्रीमंतांसी दोस्ती करावी हें नवाबबहादूर यांचे दिलापासोन. याचप्रमाणें इकडून ही कीं, नवाबासीं स्नेह पक्का व्हावा. उभयपक्षीं आगत्यच जाणोन व इंग्रजास तंबी करावी यांत सर्व दौलतदार यांचें कल्याण आणि नफे ही बहुत होतील, ऐसें समजोन, नवाबबाहदर यांचे मर्जीनरूप मसविद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें छ २१ माहे सफरीं रवाना केलीं, तें पोहचलीं असतील. आतां इकडील गुंता नाहीं. एक राजश्री माहादजी सिंदे यांचें निभावणीचें पत्र येणें, तें आलियानंतर रवाना होईल. मशारनिले गुजराथ प्रांतीं गेले. मुलूक जाळून मारून ताराज जाला; गांवच्या वस्त्या मोडल्या; यांजकरितां वाटेची घालमेल जाली. सरळ वाट चालत नाहीं. याजकरितां पत्र येण्यास दिवसगत लागली. लौकरच आल्यानंतर रवाना होईल. याउपरीं नवाबबहादूर यांणीं सरंजामसुद्धां इंग्रजावर जलद नमूद व्हावें. कुमशेलवाले आले. त्यांसीं साफ बोलून त्यांस घालवावें. ठेऊं नयेत. त्यांच्या हारामजाद्या व मकरे सर्व नवाबबहादूर यांचे ध्यानांत. इकडून ल्याहावें ऐसें नाहीं. तुह्मीं करारप्रमाणें कामें उगऊन सत्वर यावें. नबाबहादूर यांचे मनोदयानरूप इकडून सर्व घडलें. सरकारचीं अगत्याचीं कामें मिरजकर वगैरे पेशजीं लिहिल्याप्रा। उगऊन घ्यावीं. नवाबबहादूरही समजोन करून देतील. सारांष, आतां विलंब न लावितां इंग्रजास ताण बसवावा. दिवसगत न लागावी. त्यांचे मर्जीनरूप इकडून सर्व कामें उगवलीं. तुह्मांकडील पत्रें येण्याचा गुंता, आह्मांकडे कांहीं उसीर नाहीं, ऐसें उफराटें नवाबबहादुर तुह्मांस ह्मणत होते. ते कांहीं इकडे आतां राहिले नाहीं. याउपरीं दिवस घालऊं नयेत. *र॥ छ १७ रबिलावल. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ८६.
१७०१ फाल्गुन व।। ४ श्री. २१ मार्च १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:---
विनंति उपरी- संस्थान नरगुंद येथें नवाबबहादर यांजकडील अमीलाचा उपसर्ग भारी लागला आहे. येविशीं तुह्मीं नवाबबहादर यांसीं बोलोन, तेथील उपद्रव मना होय तें करावें *र।। छ १७ रबिलावल. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ८५.
१७०१ फा। व।। ४ श्री. २१ मार्च १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी- राजश्री सकारामपंत व मोरोबा यांजकडील संसर्गीक लोक यांजवर तसदी न करितां कृपा केली होती. त्यांणीं वाड्यांत थोडासा फितूर केला. तो समजतांच विष्णो नरहर वगैरे च्यार लुच्चे होते, त्यांस धरून पक्का बंदोबस्त केला. याउपरीं पारपत्येंही चांगलींच होतील. छ १७ रबिलोवल हे विनंति.