पौ। छ २६ जमादिलावल. लेखांक १११. १७०२ वैशाख शु।।११.
सन समानीन. श्री. १४ मे १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः–अलिकडे तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास हामेश लिहित जावें. तिकडील मजकूर समजला. नवाबबहादर चैत्र वद्य त्रयोदसीस डेरेदाखल होणार. आमचे रवानगीची तयारी सर्व जाली. एक राव सिंदे यांचे खातरजमेचें पत्र येण्याचे गुंता ह्मणोन लिहिलें होतें. ऐसियास, सिंदे यांचें पत्र आणवयाविसीं इकडून जासूद व सांडणीस्वार फार रवाना जाले. परंतु, वाटेमुळें जासूद बहुत मारले गेले. निभाऊन येतात ते लुटले यतात. जबानीं वर्तमान ऐकावें ऐसें आहे, याजमुळें दिक्कत. त्यास, हालीं सेंदोनसें स्वार देऊन राजश्री नारो सिवदेव यांची रवानगी होत आहे. ते जाऊन पोंहचल्यानंतर पत्र घेऊन, मुजरद कारकून स्वार देऊन, रवानगी करतील. यास एक मास सवा मास लागेल. इतके दिवस मसलत तटून राखणें उचित नाहीं. इंग्रजास सजा करणें काम मोठें. दिवस कांहींच नाहींत. यास्तव त्रयोदसीस डेरेदाखल जाले असतीलच. पुढें दरकुच जावें. तुह्मीं गुंते करारप्रमाणें उगवून यावें. सरकारचा करारनामा व मदारुलमाहाम यांचीं वगैरे पत्रें पाठविलीं असतां, आतां सिंदे यांचे पत्राकरितांच तटून रहाणें काय ? हीं पत्रें जालीं, तेव्हां तेंही पत्र आघेंमाघें येईल. आलियानंतर जलद पावतें होईल. इकडील सविस्तर राजश्री नाना यांणीं लिहिल्यावरून कळेल. नवाबबहादूर यांसही पत्रें पाठविलीं, पोंहचतीं करावीं.* र॥ छ ९ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दिजे हे विनंति.