पै॥ छ २६ जमादिलावल, लेखांक ११३. १७०२ वैशाख शु. १२.
सन समानीन. श्री. १५ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। हरी बल्लाल सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं चैत्र वद्य १ पत्रें पाठविलीं, तें पावून मजकूर समजला. नवाबबहादर वद्य त्रयोदसीस डेरेदाखल होणार. आमचे रवानगीचीही सर्व तयारी जाली. रावसिंदे यांचें पत्र लौकर यावें ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, इंग्रजास सजा चांगली चहूंकडून एकदांच व्हावयांत कामें फार आहेत, नफेही आहेत, ऐसें जाणून नवाबबहादूर यांसीं पक्की दोस्ती जाली. इंग्रजांची तंबी करणें ही मसलत लहान नाहीं. दिवस तों झाडून निघोन गेले. सरकारच्या फौजांची लढाई शुरूं. अशांत चेनापट्टणाकडे ताण बसल्यानें सार्थक. कितेक लढे होते, तेही सर्व सोडून, नवाबबहादूर यांचे दोस्तीवर नजर देऊन, श्रीमंतांनीं खातरखा करून दिल्ह्या. एक सिंदे यांचे पत्र येणें राहिलें आहे. त्यांजकडे सांडणीस्वार व जासूद पाठविले. पैकीं कांहीं मारले गेले, कांहीं लुटले गेले ते सडे आले, यास्तव हालीं राजश्री नारो शिवदेव यांची रवानगी सिंदे यांजकडे होत आहे. हे गेल्यावर पत्र येईल. त्यास, पत्रासाठींच मसलतीवर जाणें तटवणें हें ठीक नाहीं. पत्र आलियावर पोहचावीत असों. नवाबबहादूर यांणीं कूच करून चेनापट्टणाकडे जावें. तुह्मीं गुंते उगवून सत्वर यावें. सरकारचा तहनामा जाला व मदारुलमाहाम यांचीं पत्रें पाठविलीं. मग सिंदे यांचेंही पत्र येईल. इतकियावर संशय घेऊन रहाणें योग्य नाहीं. मसलतीवर नजर असावी. सर्व नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहे. इकडील वर्तमान सविस्तर श्रीमंत राजश्री नानांनीं लिहिलें यावरून कळेल. *सारांश गोष्ट, राजश्री पाटीलबावांचें पत्र आगेंमागें येईल. परंतु, मसलतीचे दिवस निघून जातात; हें पुढें येणार नाहीं. याकरितां जलदी करून चिनापट्टणाकडे जावें, हें नेक सलाह आहे. र॥ छ १० जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.