लेखांक १०५.
१७०२ चैत्र व. ७ श्री. २५ एप्रिल १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. सरदार गुजराथ प्रांतीं इंग्रजावर सरंजामसुधां गेले. तिकडून इंग्रजही आले. बडोद्याचे तालुकियांत यांची त्यांची समीपता जाली. एक दोन लढाया गोळागोळीच्या जाल्या. नित्य घेराघेरी होत असतां, दोन वेळ इंग्रजाची कही मारून लुटली. मैदानांत आपला परिणाम होणार नाहीं, ऐसें जाणून आडचणीची जागा पाहून, पाणी धरून राहिले. आणि छापा सरदारांवर घालावा ऐसा मनसबा करून, भारी सरंजामनसीं रात्रौ चालून आले. सरदारही सावध होते. तयार होऊन गोटाबाहेर येऊन उभे राहिले. लढाई चांगली जाली. गोळागोळी राहून हत्यार चालिलें. इकडील वीस पंचवीस माणूस ठार व चाळीस पन्नास जखमी जालें. इंग्रजाकडीलही चाळीस पन्नास ठार व से दीडसें जखमी जालीं. करनेल गाडर याचा भाचा व तोफखान्याचा दारोगा व एक कोशलदार ऐसे तिघे मातबर त्याजकडील ठार जाले. सेवटी इंग्रज हाटऊन गोटांत नेऊन घालविले. त्याचे दुसरे रोजीं सरदारांनीं, आपलें पेंढार माळव्यांतून आणविलें होते, तें बारा तेरा हजार आलें. त्यांचा बहुमान करून, त्यांस इंग्रजाभोंवतीं नेहमीं घेराघेरी करावयाचें काम सांगितलें. त्यांणीं जाऊन प्रथम तोफखान्याचे बैल व उंटें तट्टें ऐसीं वळून आणिलीं. बडोद्याहून पांच सातसें बैल रसद भरून येत होती, ते ही लुटून आणिली. पेंढारी आल्यापासोन केवळच बंदी इंग्रजाची जाली. सरदार फौजसह नित्य तयार होऊन चालून जातात. आडचणीची जागा आहे ते त्यांणीं सोडून मैदानांत यावें, हे इच्छा आहे. यांस त्यांस फासळा तीन कोसांचा आहे. येणेंप्रमाणें वर्तमान आलें. पुढें येईल तें लिहिले जाईल. सर्व मजकूर तुह्मीं नवाबबहादूर यांस सांगावें. सुरत आठाविशींत राजश्री गणेशपंत बेहरे यांणीं हांगामा केला आहे. शेहरची बंदी केली. दर्यांत आरमाराची लढाई हामेश होत आहे. एकून तीन लढाया इंग्रजांसीं सरकारांतून चालल्या आहेत. सिवाय किरकोळी हें निराळेंच. भोंसल्याची फौज बंगाल्याचे सरहद्देस पोहचली असेल. नवाबबहादूर यांचें जाणें चेनापट्टण प्रांतीं जलद व्हावें, ह्मणजे नवाबनिजामअलीखाबहादूरही सिकाकोलीकडे जातील. चहूंकडील ताण खूब बसल्यानंतर इंग्रजासही पक्कें समजून सजा चांगली होईल. सारांष याउपरी नवाबबहादूर यांचे जाण्यास ढील न व्हावी. दरकूच जाणें घडावें. *इंग्रेजाचीं सवासें उंटें व हजार बैल तोफांचे सरदाराकडील फौजेनें आणिले. नित्य चाललेंच आहे. रा। छ १९ रबिलाखर. हे विनंति. येथूनही राजश्री पाटीलबावांकडे हुजरातची फौज तयार करून मदतीस पाठवीत असों. हे विनंति.