पो। छ २० जमादिलाखर. लेखांक १०९. १७०२ वैशाख शु।।६.
मु।। निलवंगल. श्री. १० मे १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः- नवाबबहादूर यांसी व सरकारांसी पकी दोस्ती जाली. तेव्हां, तिकडील मजकूर इकडे समजावा, इकडील तिकडे समजावा, सबब तुम्हीं निरोप घेऊन याल ते समईं, राजश्री गणेशपंत नि॥ राव रास्ते यांस नवाबबहादूर यांजपासीं ठेऊन यावें, ऐसें लिहिलें होतें. त्याचें उत्तर तुम्हीं लिहिलें कीं, गणेशपंत राहावयास गुंता नाहीं; परंतु नवाबबहादूर यांचें ह्मणे (णें) किं, हे सर्व विषईं माहीत गोविंदराव होते, ते नाहींत. त्यापक्षीं गणेशपंत तुह्मांबराबर येतील. रावरास्ते यांस इकडील सर्व समजावितील, ऐसें लिहिलें. त्यावरून हालीं राजश्री रवळोपंत नि॥ राव रास्ते यांस पाठविले आहेत. त्यास, तुम्हीं निरोप घेऊन, येतेसमईं मशारनिले यांस नवाबबहादूर यांजपासीं ठेऊन यावें. ह्मणजे नवाबबहादर सांगतील त्याप्रमाणें इकडे लिहित जातील. र॥ छ ५ जमादिलोवल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.