Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १८४.
१७०२ फाल्गुन शु॥ २. श्री. २५ फेब्रुवारी १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या जोशी स्वामींचे सेवेसीं:-
पो। धोंडो केशव सां। नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असावें. विशेष. चिरंजीव बाळाचें लग्न फाल्गुन शु।। २ योजिलें आहे. शरीरसंबंध पुरुषोतमराव दाजी पटवर्धन यांची कन्या नेमस्त केली आहे, तरी आपण आगत्य यावें. लग्नास पंढरपुरास जावें लागतें. येथून माघ वद्य अष्टमी शुक्रवारीं निघोन जाणार. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १८३.
१७०२ फाल्गुन शु॥ १. श्री. २४ फेब्रुवारी १७८१.
यादी अपत्यें गोपालानें चरणांवर मस्तक ठेऊन सिरसां। नमस्कार विज्ञापना ता। फाल्गुन शुध १ मंदवार मु॥ लष्कर नजिकपावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण गेलिया तागाईत सातारियास पोहचलियाचें मात्र पत्र आलें. परंतु मीं येथून चार पत्रांच्या रवानग्या केल्या, परंतु येकाहि पत्राचें उत्तर न आलें. तरी ऐसें नसावें. सदैव आशिर्वादपत्र पाठवून सांभाळ केला पाहिजे. यानंतर इकडील वर्तमान तरीः
इंग्रज काल बातमी आली कीं, राजश्री तात्या व होळकर तोफा घेऊन जाऊन ज्या ठिकाणीं उभे राहून मारगिरी करीत होते, त्या ठिकाणीं घासगीस होतां तेथून दीड कोस आला. यांणीं दाटून आंगावर घेऊन कोस दीड कोस मागें आले. अद्यापि मैदानांत आला नाहीं. कोसभर झाडी तुरळक आहे ती टाकून बाहेर मात्र यावें. ह्मणजे सरदार वगैरे लोक निकड चांगली करणार. कळावें. कलम १
सरकारची सलग द्यावयाचीं तीं राजश्री लक्षुमणपंत देशमुख याजकडून पोतनिसांकडील राघोपंत यांस रुबरू बोलावून आणून ताकीद करूं त्याप्रों। घेणें ह्मणोन सांगितलें. त्याप्रों। फडशा केला. कळावें. कलम १
पुण्यांतील जाग्याविसीं भटजीनीं सांगितलें कीं, वीस हात निदान पंचवीस हातपर्यंत आपलेजवळ जितकी देवितों ह्मणोन करार जाहाला आहे. त्याप्रों। जागा देवितों ह्मणोन सांगितलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १८२.
१७०२ पौष व॥ १०. श्री. १९ जानेवारी १७८१.
यादी जनापा बिन महादापा सेवेसीं विज्ञापना ऐसिजे. सोनजी यादव याचे जामीनगतीबद्दल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १८१. १७०२ पौष शु॥ १५.
श्री. १० जानेवारी १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री मोरोपंत स्वामींचे सेवेसीं:--
पोष्य अंताजी भिकाजी सां।। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेषः- प्रा। वरघांट येथील सालमजकूरच्या रसदेचा भरणियास रुपये ३००० तीन हजार ऐवज पोते चाल, राजश्री गणेशपंत नि॥ राजश्री तात्या जोशी यांजकडून स्वामींनीं देविले, ते पुणियाचे मुकामीं मारनिल्हेपासून घेऊन रसदेच्या भरणियास दिल्हे. मिति शके १७०२ शार्वरी नाम संवत्सरे पौष शुद्ध १५. बहुत काय लिहिणें, लोभ असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। शके १७०२ लेखांक १८०. १७०२ पौष शु॥ १३.
पौष शु॥ १५ श्री. ८ जानुआरी १७८१.
चिरंजीव राजश्री गणेशपंत यांसी प्रति सगुणाबाई जोशी आशिर्वाद उपरी येथील ता। पौष शु॥ १३ जाणोन स्वकीय कुशललेखन करीत जाणें. विशेषः-- येथील वाकनिसी राजश्री अंताजीपंत ठोसर यांजकडे आहे. ते आमचे बंधु आहेत. हें तुह्मांस ठाऊकच आहे. ऐसीयासी, वासुदेवपंत यासीं त्यांनी ठेविला आहे. तो लबाडी करितो. त्याजकरतां त्याजकडील काम काहडलें पाहिजे. तरी युक्तीनें होय तें केलें पाहिजे. त्यांस तीळ संक्रमणाचे पाठविले आहेत, ते प्रविष्ट करणें आणि हा जाबसाल राजश्री विठ्ठलपंत यासीं करावा. मुख्यत्वेंकरून अंताजीपंतच आहेत. परंतु विठ्ठलपंत याजकडून घडेल. तूर्तच हा जाबसाल न करावा. मागाहून लेहून पाठवूं त्याप्रमाणें करावें. आमच्या कामांत प्रतरणा करतो त्याजमुळें कर्तव्य त्याचा विषय बहुतसा नाहीं. परंतु हलकें जाहलें पाहिजे. राणु वाघमा-यास लवकर पाठवावा, वाडियांत माणूस नाहीं. याजकरतां पाठवणें. चिरंजीव यांचें येणे श्राद्धाकरतां होत असल्यास अगोदर लिहून पाठविणें. बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे आशिर्वाद.
सेवक आपाजी रघुनाथ सां। नमस्कार विनंति उपरी तीळसंक्रमणाची पुडी पाठविली आहे, ती चिरंजीव राजश्री तात्या राजश्री गणेशपंत यांसी भिक जोशी यांचे नमस्कार विनंति ऐसी जे. जातेसमयीं मेणवलीचे वर्णीविषयीं बोलिलों आहे. त्यास यजमानास विनंति करूं नये. वर्णीस होते किंवा काय तें लिहून पाठवावें. उत्तर पाठवावयाविषयीं अनमान न करावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। शके १७०२ लेखांक १७९. १७०२ पौष शु॥ १३.
पौष शु॥ १५ श्री. ८ जानेवारी १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गणेशपंत दाजी स्वामींचे सेवेसीं:-
सेवक धोंडोराम सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता। पौष शु॥ १३ पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण सांगितल्याप्रों। तांदुळ व मटकी घेतली. दोडके तांदुळ घेणें ऐसें सांगितलें, त्यास दोडके मिळत नाहींत. कोकणे दर चार प्रों।, कांहीं मापटें कम चार प्रमाणें ऐसे घेतले. साल बहुत नाहीं ह्मणोन घेतले. मटक्या दर साडेपांच पायली मापटे प्रमाणें दोन खंडी घेतले. दोडके तांदुळ बाजारांत मिळाले नाहींत. आणि नित्य पाहिजेत ह्मणून खंडु चिकणे व माइत यांसीं बलावून रतीबाचे कामावर पडतील ऐसेंच पाहून घेतले. दोडक्याचा पाड मात्र दर
आहेत परंतु एक थोक दाहाविसाचे मिळत नाहींत. मीठ महाग जाहलें. पुढें याहून महाग होईल. ह्मणून लोक संग्रह खर्चापुरता करीत आहेत. आह्मीं दोन पल्ले दर सव्वापांच पायली प्रों। घेतलें आहे. पुढे घ्यावयाचें असल्यास लिहून पाठवाल त्याप्रमाणें वर्तणूक करूं. गांवखेड्याचा ऐवज कोठील आला नाहीं. राजश्री विठोबा नाईक होसिंग याजकडून रुपये १०० तांदुळ घेतले. त्यास व गोपाळपंत याचे मोत्याबदल ऐसे शंभर जाहले. कळावें. गवताचा मजकूर तर डोंगररान उलगडलें. वोणवा लागतो एकदां लागला तो विझविला. आपलें गवत तों डोंगरांतच आहे. आगीचें भय नित्य. इतर बाराशें गवत येतें. पंधरा हजार अवघें आलें. बाकी येणें तैसेंच आहे. त्यास गाडे अथवा बलवार याचे बैलभाडें करून गवत आणावें किंवा काय येविषयींची आज्ञा करणें ती करावी. त्याप्रमाणें आणवूं. तांदुळ हतीचे शंभराचे जहाले. व मटकी एकशेंसत्राची आपण गेलियावर जाहाली. सोलापूरचीं पत्रें श्रीमंत यांचे नांवचीं व आपलीं ऐसीं पो। आहेत. खंडु चिकणे काल येथून गेले. पाडळीचे पन्नास रुपये आले. बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति.
तुमचा कोकणचा गडी पांडववाडीस गेला आहे. तो अद्यापि आला नाहीं. कावडीचा ब्राह्मण दररोज एक वेळ येत असतो. ब्राह्मण कावडी न्यावयाचे खोळंबले आहेत. इमारतीचे कामास मजूर लावले तितके आहेत. भिड्याचे जागेवरील माती फार काहाडावयाची. पूर्वेकडील भिंतीस पुरुषभर माती काहाडावयाची याजमुळें मजूर लागले. एकरोज आला, व याचा अवघ्याची जागा हमी आहेतच. गमूं देत नाहीं. आज्ञे प्रो। काम घेतों. आज माती निघेल. भिंत दक्षिणसज्याकडील आंगची उतरून निरोप देतों. वर्चिलोस हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। शके १७०२ लेखांक १७८. १७०२ पौष शु॥ ७.
पौष श्रु॥ ९ बुधवार पुणें. श्रीशंकर. २ जानेवारी १७८१.
आशिर्वाद उपरि पौष शुद्ध सप्तमी यथास्थित जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेषः- पत्र पाठविलें तें पावलें. व पागे याचें पत्र पावलें. त्यास, पागे याचा व सकारनामकाचा पेंच आहे. तस्कर आणिले आहेत. ते सकारनामक पागे याचे हवालीं करणार नाहींतसें दिसतें. पुणियास घेऊन जाऊं, ऐसा विचार दिसतो. तेव्हां पागे येथें येऊन आमचें संकट निवारण कसें होईल याचा बंदोबस्त तुह्मीं कसा केला हें नकळे. त्यास येथील रीत तुह्मांस ठाऊकच आहे. पागे येथें आल्यानंतर दोघांचा खटला पडेल. याचा विचार पुरता करून आह्मांवरील संकट निवारण होय तें करणें. होणारास उपाय नाहीं. तुह्मी दरबारी आहां. भीड खर्चून निवारण केल्याखेरीज होणार नाहीं. सविस्तर राजश्री गकारनामक सांगतां कळेल. दुसरा विचार ध्यानास न आणतां, पार पाडणें तुह्मांकडेच आहे. येथील अधिकारी यांणीं मुख्यास काय लिहिलें हें नकळे. शोध मनास आणून कर्तव्य तें करावें. सारांश, तुह्मी मुख्यस्थळीं भीड घातल्याखेरीज निवारण होत नाहीं. त्यांत तुमचे विचारास येईल तैसें करणें हे आशिर्वाद.
राजश्री गकारनामक यांस नमस्कार. तुह्मी येथून गेला. येथील सर्व अर्थ समजलेच आहेत. त्यास पत्रांतील अन्वय ध्यानांत आणून जेणेंकरून निवारण सत्वर होय तें करणें; आणि उत्तर लौकर पाठवणें. तुमचें पत्र खातरजमेंचे आल्याशिवाय चित्तवृत्ति स्थिर नाहीं. कळेल तैसें करणें. बहुत काय लिहिणें हे विनंति.
सेवेसीं साष्टांग नमस्कार विनंति. विशेषः- सर्वांचें मनोधारण मात्र रक्षून आहों. कोणासीं बोलण्याचा विचार नाहीं. येथील अधिकारी यांच्या वृत्ति आपणांस ठाऊकच आहेत. पेंच पडला तो निवारण आपणा खेरीज होत नाहीं. राईचा पर्वत जाहला आहे. परंतु हाच थोरांस बहुत आहे. यजमानाची चित्तवृत्ति येक प्रकारची. कोणी येतो, तो नवीन वार्ता सांगतो; तेव्हां संकट पडतें. राजश्री गकारनामकास सर्व ठाऊकच आहे. चित्तावर घेऊन परिहार केल्याविना परिणाम नाहीं. आह्मांसारखे बहुत येतील जातील, परंतु लौकिक रक्षणें होय, तो अर्थ आपणाकडे आहे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ रमजान लेखांक १७७. १७०२ भाद्रपद शु॥ ५.
सन इहिदे समानीन. श्री. ३ सप्टेंबर १७८०.
राव अजम कृष्णराव नारायणजी दाममो।हू मोहिबान पन्हा मखलीसान दस्तगा. येथील खुषी जाणून आपली शादमानी हमेषा कलमीं करीत यावें दीगर. आह्मी घांट उतरून मखालिफाचे तमाम तालुका ताख्तताराज करून कितेक गडकिल्लेहि घेतल्या पेषजीं मफसल लिहिलें आहे. हालीं रावतनेरळचा गड व चेतपटचा किलाहि घेऊन अरणीचे किलेस मोहसरा केला आहे. दोन तीन रोजांत अरणीहि घेऊन आरकाडाकडे कूच करून जात असो. इकडून तो कराराप्रों। अमलांत येत जात आहे. मदारुलमहामहि कराराप्रों। इंग्रजांचे तंबीचे कामावरीच पका खंबीर असीजेस वरचेवर सांगत जावा. हमेषा आपली बादमानी कलमी करीत आलें पाहिजे. जियादा लिहिणें काय असे ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो॥ छ १८ साबान लेखांक १७६. पो॥ १७०२ श्रावण व॥ ४.
सन इहिदे समानीन. श्री. १९ आगस्ट १७८०.
राव अजम कृष्णरावजी दाममो।हू मोहीबान पन्हा
मखलीसान दस्तगा :--
येथील खुषी जाणून आपली षादमानी हमेशा कलमी करीत यावें. दीगर, थैली मदारुलमहाम यांची व निभावणीचें खत राव सिंदे यांची पाठविलें तें पोंहचून मफसल हकीकत मालूम जाहला. हालीं मदारुलमहाम यांस थैलीचा जवाब व राव सिंदे यांसहि जवाबाची थैली पाठविला आहे. बदामीचा किलेदार व अमलदारांनीं केरूरचे तालुकेकरितां दिकत केल्याचा मजकूर लिहिला होता. तर, हालीं बदामीचा किलेदार व अमलदाराचे नांवें केरूरचा तालुका ठाणेंसहित रावरास्ते यांचे सुपूर्द करितेस जारे ताकीद पाठविला आहे. इतक्यावर बिलाउजूर केरूरचे तालुका बमय ठाणें हवालीं करितील. हमेषा आपली खैरीया कलमी करीत यावें. जास्त लिहिणें काय असे ? ताजाकलम- मदारुलमहाम वगैरेनीं आपणास लिहिलें खत पाठविलें तें परतोन पाठविले आहे. पोंहचले. तहरीर तारीख छ २ शाबान. ताजाकलम बिलफैल चेतपट नामें किल्लेस माहसरा केला आहे. तेहि मकान घेऊन चेनापटणाकडे कूच करून जात असों. मालूम जाहलें पाहिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो॥ छ १७ साबान लेखांक १७५. पो॥ १७०२ श्रावण शु॥ १३.
सन इहिदे समानीन. अलीफ. १२ आगष्ट १७८०.
राव अजम कृष्णरावजी दाममोहूः--
मोहीबान पन्हा मखलीसान दस्तगाः येथील खुषी जाणून आपली बादमानी हमेषा कलमी करीत आला पाहिजे. दरींविला आपण र।। होऊन गेल्याबाद व पुणीयास पावल्याची खबर आली नाहीं. जलद खैरीयतेनें जाऊन पोंहचल्या मजकुरास कलमी करावें. आपणांस र।। करून पाठवून आह्मीं बेंगळुराहून कूच केलें. ते घांट उतरून फिरंगी याचे तालुक चेंगम व कळसपाक व पोळूर व तिमरायगड व सुलभगड वगैरे मकानेस ठाणा घातले. सदरहू मकानेहून येक हजार बारचे जवान व तुरकसवार फिरंगीचे दोनशें घोडे पाडाव केले. यासिवाय चेनापटण व आरकाड व वेळूर व त्रिचनापली व मा। बंदर व देवणापटण वगैरे तमाम तालुकेंतहि स्वारी पाठवून बहुताद लोकांस गारत केलें. मछलीबंदराहून फिरंगी याची जमीयत बदल आरकाड व चेनापटणास कुमक जाणें बदल गुंठुरचे राहेनें येत असतां, इकडून दहा हजार फौज पाठवून त्या जमीयतेस घेराघेरी व मारामारी करवीत आहे. चहूंकडून त्याचा तालुका ताख्तताराज करवीत आहे. फिरंगी यांनीं इकडे चेनापटणाकडे षह लागला ह्मणून सिकाकोल, राजबंदर, व मछलीबंदर वगैरे जागेजागेची फौज तमाम आणवून जमा करीत आहेत. त्यांनीं मोकाबिलेस येतील तर खुदाचे फजलेकडून जे काय तंबी होईल ते जहुरांत येईल. निजामअलीखानांनीं मछलीबंदराकडे जाणेचा करार होता. त्यांनीं अजीलग हैदराबाद सोडून निघाले नाहीं. त्याची चेलन वगैरे यावरूनच पहावा. इकडे चेनापटणवालेस खूब ताण बसला आहे. याकरितां फिरंगी यांनीं सलूकाचा पैगाम मदारुलमहाम यांसीं खातिरखाः लावितील. तरी दोन साल तीन साल लागलियाहि त्याच्या तंबीचे कामावरीच खंबीर असिजेस. मदारुलमहाम यांस सांगत जावें. हमेषा आपली बादमानी कलमीं करीत यावें. जियादा लिहिणें काय असे ?