पो। शके १७०२ लेखांक १८०. १७०२ पौष शु॥ १३.
पौष शु॥ १५ श्री. ८ जानुआरी १७८१.
चिरंजीव राजश्री गणेशपंत यांसी प्रति सगुणाबाई जोशी आशिर्वाद उपरी येथील ता। पौष शु॥ १३ जाणोन स्वकीय कुशललेखन करीत जाणें. विशेषः-- येथील वाकनिसी राजश्री अंताजीपंत ठोसर यांजकडे आहे. ते आमचे बंधु आहेत. हें तुह्मांस ठाऊकच आहे. ऐसीयासी, वासुदेवपंत यासीं त्यांनी ठेविला आहे. तो लबाडी करितो. त्याजकरतां त्याजकडील काम काहडलें पाहिजे. तरी युक्तीनें होय तें केलें पाहिजे. त्यांस तीळ संक्रमणाचे पाठविले आहेत, ते प्रविष्ट करणें आणि हा जाबसाल राजश्री विठ्ठलपंत यासीं करावा. मुख्यत्वेंकरून अंताजीपंतच आहेत. परंतु विठ्ठलपंत याजकडून घडेल. तूर्तच हा जाबसाल न करावा. मागाहून लेहून पाठवूं त्याप्रमाणें करावें. आमच्या कामांत प्रतरणा करतो त्याजमुळें कर्तव्य त्याचा विषय बहुतसा नाहीं. परंतु हलकें जाहलें पाहिजे. राणु वाघमा-यास लवकर पाठवावा, वाडियांत माणूस नाहीं. याजकरतां पाठवणें. चिरंजीव यांचें येणे श्राद्धाकरतां होत असल्यास अगोदर लिहून पाठविणें. बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे आशिर्वाद.
सेवक आपाजी रघुनाथ सां। नमस्कार विनंति उपरी तीळसंक्रमणाची पुडी पाठविली आहे, ती चिरंजीव राजश्री तात्या राजश्री गणेशपंत यांसी भिक जोशी यांचे नमस्कार विनंति ऐसी जे. जातेसमयीं मेणवलीचे वर्णीविषयीं बोलिलों आहे. त्यास यजमानास विनंति करूं नये. वर्णीस होते किंवा काय तें लिहून पाठवावें. उत्तर पाठवावयाविषयीं अनमान न करावा हे विनंति.