पो। शके १७०२ लेखांक १७८. १७०२ पौष शु॥ ७.
पौष श्रु॥ ९ बुधवार पुणें. श्रीशंकर. २ जानेवारी १७८१.
आशिर्वाद उपरि पौष शुद्ध सप्तमी यथास्थित जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेषः- पत्र पाठविलें तें पावलें. व पागे याचें पत्र पावलें. त्यास, पागे याचा व सकारनामकाचा पेंच आहे. तस्कर आणिले आहेत. ते सकारनामक पागे याचे हवालीं करणार नाहींतसें दिसतें. पुणियास घेऊन जाऊं, ऐसा विचार दिसतो. तेव्हां पागे येथें येऊन आमचें संकट निवारण कसें होईल याचा बंदोबस्त तुह्मीं कसा केला हें नकळे. त्यास येथील रीत तुह्मांस ठाऊकच आहे. पागे येथें आल्यानंतर दोघांचा खटला पडेल. याचा विचार पुरता करून आह्मांवरील संकट निवारण होय तें करणें. होणारास उपाय नाहीं. तुह्मी दरबारी आहां. भीड खर्चून निवारण केल्याखेरीज होणार नाहीं. सविस्तर राजश्री गकारनामक सांगतां कळेल. दुसरा विचार ध्यानास न आणतां, पार पाडणें तुह्मांकडेच आहे. येथील अधिकारी यांणीं मुख्यास काय लिहिलें हें नकळे. शोध मनास आणून कर्तव्य तें करावें. सारांश, तुह्मी मुख्यस्थळीं भीड घातल्याखेरीज निवारण होत नाहीं. त्यांत तुमचे विचारास येईल तैसें करणें हे आशिर्वाद.
राजश्री गकारनामक यांस नमस्कार. तुह्मी येथून गेला. येथील सर्व अर्थ समजलेच आहेत. त्यास पत्रांतील अन्वय ध्यानांत आणून जेणेंकरून निवारण सत्वर होय तें करणें; आणि उत्तर लौकर पाठवणें. तुमचें पत्र खातरजमेंचे आल्याशिवाय चित्तवृत्ति स्थिर नाहीं. कळेल तैसें करणें. बहुत काय लिहिणें हे विनंति.
सेवेसीं साष्टांग नमस्कार विनंति. विशेषः- सर्वांचें मनोधारण मात्र रक्षून आहों. कोणासीं बोलण्याचा विचार नाहीं. येथील अधिकारी यांच्या वृत्ति आपणांस ठाऊकच आहेत. पेंच पडला तो निवारण आपणा खेरीज होत नाहीं. राईचा पर्वत जाहला आहे. परंतु हाच थोरांस बहुत आहे. यजमानाची चित्तवृत्ति येक प्रकारची. कोणी येतो, तो नवीन वार्ता सांगतो; तेव्हां संकट पडतें. राजश्री गकारनामकास सर्व ठाऊकच आहे. चित्तावर घेऊन परिहार केल्याविना परिणाम नाहीं. आह्मांसारखे बहुत येतील जातील, परंतु लौकिक रक्षणें होय, तो अर्थ आपणाकडे आहे. हे विज्ञापना.