लेखांक १८३.
१७०२ फाल्गुन शु॥ १. श्री. २४ फेब्रुवारी १७८१.
यादी अपत्यें गोपालानें चरणांवर मस्तक ठेऊन सिरसां। नमस्कार विज्ञापना ता। फाल्गुन शुध १ मंदवार मु॥ लष्कर नजिकपावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण गेलिया तागाईत सातारियास पोहचलियाचें मात्र पत्र आलें. परंतु मीं येथून चार पत्रांच्या रवानग्या केल्या, परंतु येकाहि पत्राचें उत्तर न आलें. तरी ऐसें नसावें. सदैव आशिर्वादपत्र पाठवून सांभाळ केला पाहिजे. यानंतर इकडील वर्तमान तरीः
इंग्रज काल बातमी आली कीं, राजश्री तात्या व होळकर तोफा घेऊन जाऊन ज्या ठिकाणीं उभे राहून मारगिरी करीत होते, त्या ठिकाणीं घासगीस होतां तेथून दीड कोस आला. यांणीं दाटून आंगावर घेऊन कोस दीड कोस मागें आले. अद्यापि मैदानांत आला नाहीं. कोसभर झाडी तुरळक आहे ती टाकून बाहेर मात्र यावें. ह्मणजे सरदार वगैरे लोक निकड चांगली करणार. कळावें. कलम १
सरकारची सलग द्यावयाचीं तीं राजश्री लक्षुमणपंत देशमुख याजकडून पोतनिसांकडील राघोपंत यांस रुबरू बोलावून आणून ताकीद करूं त्याप्रों। घेणें ह्मणोन सांगितलें. त्याप्रों। फडशा केला. कळावें. कलम १
पुण्यांतील जाग्याविसीं भटजीनीं सांगितलें कीं, वीस हात निदान पंचवीस हातपर्यंत आपलेजवळ जितकी देवितों ह्मणोन करार जाहाला आहे. त्याप्रों। जागा देवितों ह्मणोन सांगितलें.