पो। शके १७०२ लेखांक १७९. १७०२ पौष शु॥ १३.
पौष शु॥ १५ श्री. ८ जानेवारी १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गणेशपंत दाजी स्वामींचे सेवेसीं:-
सेवक धोंडोराम सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता। पौष शु॥ १३ पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण सांगितल्याप्रों। तांदुळ व मटकी घेतली. दोडके तांदुळ घेणें ऐसें सांगितलें, त्यास दोडके मिळत नाहींत. कोकणे दर चार प्रों।, कांहीं मापटें कम चार प्रमाणें ऐसे घेतले. साल बहुत नाहीं ह्मणोन घेतले. मटक्या दर साडेपांच पायली मापटे प्रमाणें दोन खंडी घेतले. दोडके तांदुळ बाजारांत मिळाले नाहींत. आणि नित्य पाहिजेत ह्मणून खंडु चिकणे व माइत यांसीं बलावून रतीबाचे कामावर पडतील ऐसेंच पाहून घेतले. दोडक्याचा पाड मात्र दर
आहेत परंतु एक थोक दाहाविसाचे मिळत नाहींत. मीठ महाग जाहलें. पुढें याहून महाग होईल. ह्मणून लोक संग्रह खर्चापुरता करीत आहेत. आह्मीं दोन पल्ले दर सव्वापांच पायली प्रों। घेतलें आहे. पुढे घ्यावयाचें असल्यास लिहून पाठवाल त्याप्रमाणें वर्तणूक करूं. गांवखेड्याचा ऐवज कोठील आला नाहीं. राजश्री विठोबा नाईक होसिंग याजकडून रुपये १०० तांदुळ घेतले. त्यास व गोपाळपंत याचे मोत्याबदल ऐसे शंभर जाहले. कळावें. गवताचा मजकूर तर डोंगररान उलगडलें. वोणवा लागतो एकदां लागला तो विझविला. आपलें गवत तों डोंगरांतच आहे. आगीचें भय नित्य. इतर बाराशें गवत येतें. पंधरा हजार अवघें आलें. बाकी येणें तैसेंच आहे. त्यास गाडे अथवा बलवार याचे बैलभाडें करून गवत आणावें किंवा काय येविषयींची आज्ञा करणें ती करावी. त्याप्रमाणें आणवूं. तांदुळ हतीचे शंभराचे जहाले. व मटकी एकशेंसत्राची आपण गेलियावर जाहाली. सोलापूरचीं पत्रें श्रीमंत यांचे नांवचीं व आपलीं ऐसीं पो। आहेत. खंडु चिकणे काल येथून गेले. पाडळीचे पन्नास रुपये आले. बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति.
तुमचा कोकणचा गडी पांडववाडीस गेला आहे. तो अद्यापि आला नाहीं. कावडीचा ब्राह्मण दररोज एक वेळ येत असतो. ब्राह्मण कावडी न्यावयाचे खोळंबले आहेत. इमारतीचे कामास मजूर लावले तितके आहेत. भिड्याचे जागेवरील माती फार काहाडावयाची. पूर्वेकडील भिंतीस पुरुषभर माती काहाडावयाची याजमुळें मजूर लागले. एकरोज आला, व याचा अवघ्याची जागा हमी आहेतच. गमूं देत नाहीं. आज्ञे प्रो। काम घेतों. आज माती निघेल. भिंत दक्षिणसज्याकडील आंगची उतरून निरोप देतों. वर्चिलोस हे विनंति.