Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ४८५ ]

श्री.

पौ। छ १४ रमजान.

पु॥ राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसीः--

उपरि. दिल्लीहून पातशांनी श्रीमंतास व सरदारास खिलत व बहुमान राजे देवदत्त यांजपासी देऊन पाठविले ते रीतीप्रमाणें सरदारसहित श्रीमंती घेऊन डेरियास आले. पातशाही तोफखाना आणावयाची आज्ञा श्रीमंती केली. त्यास, येथून तेथें लिहावें, अर्ज करावा, तो वकील पदरचा करितात, ऐसें अंताजीपंती सांगावें. तेणेकरून काम होणेस दिरंग पडावी. अंताजीपंताचे सांगितल्यावरी हा मजकूर व्हावासा नाहीं; परंतु अंताजीपंत सखारामपंताचे व्याही; सखारामपंत श्रीमंताचे दिवाण; श्रीमंत बज्यास्वामीच. असा प्रकार तेथें दर्शवून, अंताजीपंत बोलतील तें आमचे बोलणें समजावें; ऐसें सखारामपंतीं त्यांचे निदर्शनास आणून दिल्हें. यामुळें यारीतीनें होते. याजकारितां ते असतां आह्मांस आज्ञा न करावी. त्याजवरून त्यांणी अंताजीपंतास आणविले. आह्मांसहि आणावयाची आज्ञा केली. तेव्हां आज्ञेप्रमाणें पुरुषोत्तम माहादेव राजे देवदत्त यांस भेटावयास शहराजवळ गेले. अंताजीपंत मागें राहिले. यांणी जाऊन तोफखानियांत तयारी करून परवानगी लाविली. तो अंताजीपंत मागती माघारे गेले. हें पाहावें तो + + + ना राहावितील किंवा आपणच घेऊन आलों, हे ऐष द्यावयास सिद्ध होतील. असो. सेवकास स्वामिसेवा करणें तीर्थरूपांनी जीवच स्वामीसेवेवरी खर्च केला आहे व आह्मांसहि स्वामीच्या कल्याणावाचून दुसरें करणें नाहीं. हे निष्ठाच स्वामीचे चित्तांत येऊन सेवकाचा मजुरा दिसेल. अन्यथा दुसरियानें सांगावें ऐसे नाही. सर्व निदर्शनास येईल. ह्मणोन विस्तारें लिहिलें तें कळले. ऐसियास, तुमचे वडिलानें स्वामीकार्य करून या पदवीस आले. व तुह्मीं त्याच गोष्टीवर चित्तापासून राहोन, उमदी कामें उत्तम प्रकारें करून, चिरंजीवाची मर्जी राखोन राहिल्यानें सर्व प्रकारें तुमचे ठायीं दुसरा कार्यविचार नाहीं. तरी कळतच आहे. जाणिजे. छ.२७ रजब. बहुत काय लिहिणें ?

( लेखनसीमा. )

[ ४८४ ]

श्रीनरहरी.

पौ। छ १३ जमादिलाखर.

तीर्थस्वरूप राजश्री दादा व तथा आपा व बाबा वडिलांचे सेवेसी :-

आपत्य बजाबानें चरणावर मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना ता। छ १ सफर मु॥ नजिक हरिद्वार येथें असो. विशेष. वडिलांकडून बहूत. दिवस आशीर्वाद पत्र येऊन सांभाळ होत नाहीं. तस्मात् , आमचेच दैव विपरीत आले ! इकडील वर्तमान तरः तीर्थरूपजीस पाणिपतच्या गावावर गोळी लागून आश्विन वा। १० स देवाज्ञा जाली. तीर्थस्वरूप माईंनीं सहगमन केलें. एक मातोश्रींनी पूर्वीच वनांत टाकलें. तिर्थरूपास नऊ महिने झाले. सरकारांतून पैसा एक मिळत नाहीं. उठोन यावें तर, मामलतीमुळें वगैरे साता आठा हजारांचा पेच आहे. तिकडे आल्यावर वारणार नाही. इकडे धनी कोणी नाहीं. मुलुक ठीक नाही. सर्वांस घेऊन थोरल्या लष्करांत जावे, तर सावकार जाऊं देत नाहींत, आण येथें भक्षावयास मिळत नाही. सर्वास टाकून एकटेंच जावें तर, मुलकाचा भरंवसा नाहीं. घटकेंत आह्मीच हुकुम कारितों, आण मागती त्यांच्याच पायां पडावें लागतें. मुलकाची चाल याप्रों।. सर्वांस टाकल्यानंतर यांची आशा सोडावाशी होती. ऐशा पेंचात बहुत आहोंत. प्रस्तुत ती॥ राजश्री बाळाभाऊ गबंधे याप्रांती कामकाजामुळें आले. त्यांचे गळां पडून तूर्त मुलेंमाणसें त्यांजवळ ठेवून, पुढें यावेसें आहे. इकडील खर्च भारी ; पैसा पुरवठ्या येत नाहीं. भाऊकडे एक माहाल मात्र आहे; त्याजकडेहि विशेष कामकाज नाहीं ; तेहि पेंचांतच आहेत. घोडीं, उंट, चिजवस्त मोडून दोन अडीच हजार वारले. आतां जवळ वस्त अथवा घोडी मिळोन ऐवज शंभराचादेखील नाही. सरकारांतून ४० रुपये महालमजकुरी लावून देत जाणे, परंतु प्रस्तुत तहशलीचे दिवस नाहींत. दरमाहेचा दरमाहा मिळणें कठिणच आहे. परंतु मागावयास जागा जाली. दरमाहा दिढाशांचा खर्च पदरी आहे. ईश्वर काय करील तें पाहावें. ईश्वरें इकडे वनांत आणून टाकिलें. मागती सर्वांची भेट होणें कठिण आहे. त्याची इच्छा मात्र नकळे. कुसाजीचा दारकू आह्मांजवळच आहे. खुशाल आहे. बहूत काय लिहिणें ? हे विज्ञापना. सर्व मंडळींस शिरसाष्टांग नमस्कार प्रविष्ट करावा. दाजीबा तासगावी आहेत ह्मणून ऐकिलें. त्यांची काय सोह आहे हें लिहावें. हे विज्ञप्ति.

[ ४८३ ]

श्री.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदरपंत दादा स्वामीचे सेवेसीः----

पोष्य गोविंद बल्लाळ कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। जेष्ठ वा। १३ जाणोन स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपला निरोप घेऊन लष्करीहून स्वार जालों, तें इटावेजवळ येऊन मुक्काम केला. चौधरीस रुपयांविसी सांगून पाठविलें. त्यास तो इटावेहून उठोन बेहेडांत खुरावलीचे गढींत जाऊन राहिला ! मोठा हरामजादा ! रा॥ शिवराम देवजी आपणाकडील गृहस्थ आले. त्यांणीही वर्तमान सांगितले. त्यावरून चौधरीकडे भलें माणूस पाठविलें. आह्मीं त्यास लिहिलें की, उखास तिळमात्र न करणें, राजश्री दादाचे रुपये तुह्माकडे आहेत त्याची मात्र वाट करून देणें; आह्मीं उठून जाऊं; वरकड आमचा गुंता नाही. कदाचित् पुढें जाऊन मुकाम करा ह्मणाल तर पुढें जाऊन मुकाम करूं; तुह्मांसी दुसरा विचार नाही. ह्मणून कितेक विचारें लिहिलें. भलें माणूस पाठविलें त्यांणींहि उत्तम प्रकारें सांगितलें. परंतु हृदयांत खाऊन राहिला. पैशाची वाटही करून येईना; आणि गढी सोडून बाहिरहि येईना. आह्मीं कजिया करावा तर गावगनाची खराबी होईल. वजिराकडील आठ नव लाख रुपये त्याजकडे यावे. त्यांचे वसूलास जगतनारायण आहे. अद्यापि दोन लाख रुपये पावले नाहींत. आह्मीं च्यार रोज राहून त्यासी कजिया करावा, तर त्यांचा विचार ऐसा पाहिला जे, निमित्य मात्र परगणा खराब केलियाचें आह्मावर द्यावें. यास्तव, आह्मीं कूच करून पुढें येऊन राहिलें आहों. मागती त्याजकडे भला माणूस पाठवितों. कदाचित् तो आपणांस कांहीं लिहील तर, चित्तास न आणावें. आपल्या कार्यास तिळमात्र अंतर करणार नाही. मोठा हरामजादा ! बेइमान ! आह्मांसी रदबदली केली की, मी रुपये देणें ते मुद्दल दिल्हे. त्यास, आह्मी त्याजला साफ सांगितले की, तुमचे हातीची टिपणें आहेत त्यांप्रमाणें रुपये उत्तम प्रकारें घेऊन; तूं आमचे काबूत आहेस; सभोंवते आह्मी आहों. त्यास ते आपणांस लिहितील की, उजाड केला तर मार्गाने आलों; दोन मुकाम केले; ताकीददार होवून उत्तम प्रकारे ताकीद केली. त्यास, रुपये त्यांजकडे आहेत. त्याची फिकीर नाहीं. रुपये घेऊन. आमचें नांव आइकतांच इटावेयाहून पळून गेला. त्यास, तुर्त त्याची वजिराची तहशील मध्यें आह्मीं राहिलियानें त्याजला बाहाना होईल. याजकरितां महुयावर आलों. त्यास, आह्मीं शिवरामपंतांस पष्ट सांगितले कीं, रुपये देतील तर घेऊन येणें, न देत तर तुह्मीं उठोंन येणें. आह्मांसी तो सलुख न करी. रुपये दादाचे न देतां त्याचा अमल चालोन. त्यास शिवरामपंत उठोन आले नाहीं. त्याजकडे माणूस पाठविलें आहे. रुपये त्यांणीं दिल्हे तर उत्तम जालें. नाहींतर, शिवरामपंतास उठून आणून, रुपये उत्तम प्रकारें त्याजपासून घेऊन. फिकीर नाहीं. तूर्त तो पळाला. आणि परगणेयांत फिसात करावी तर निमित्त आह्मांवर देणार. त्याजला रुपये वजिरास देणें नाहीं. त्याणे परगणेयाची तहशील खाऊन सुखरूप बसला. असो. तुह्मीं सांगाल, सनद पाठवाल, तरी दोनी परगणेयाची कच्ची तहशील करून, रुपये ठिकाणीं लावून देऊन. बरें ! जे तुह्मीं सांगाल, लिहाल तें करून. तुमचें लिहिलेशिवाय करणें नाहीं. आह्मीं आपले असो. सदैव पत्रीं सांभाळ करावा. दिल्लीस गेलियावर साद्यंत लिहावें. कनवजेस स्वार पाठविले. तेथील फिकीर न करावी. बहुत काय लिहिणें ! कृपालोभ असो दीजे. हे विनंति.

रा॥ त्रिंबकपंतांस साष्टांग नमस्कार. सोभ असो दीजे. हे विनंति.

रा॥ पुरुषोत्तमपंतबाजींस साष्टांग नमस्कार. लि॥ परिसीजे. कृपालोभ असो दीजे. हे विनंति.

[ ४८२ ]

श्री

पौ। छ ८ रा।खर

श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यांप्रति

बापूजी माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ ५ माहे रा।खर मु॥ इंद्रप्रस्थ जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष. पेशजी तुह्मांस अजुरदार जोडियासमागमें पत्रें रा॥ केली, त्याजवरून सविस्तर कळलें असेल. सांप्रत वर्तमान ऐकिणेंत आलें जे, रा॥ उभयथा सरदार मावठाणाचे मुकामीहून कूच करून. बुंदी *  + + + + +

[ ४८१ ]

श्री.
पौ। छ २१ रजब

पु॥ राजश्री बापूजीराव, राजश्री दामोदरराव स्वामीचे सेवेसीः--
विनंति उपरि. सनदेनें कार्य होतें तर आह्मी कजियांत न पडतों. जुजामुळें दोनशे घोडे लहानथोर पडले. भले माणूस पडिले. घोडे पडिले. त्याची खंडणी करून रुपये दिल्हे. ते येथें गोपाळपंत होते. याजखेरीज बक्षीचें देणें आलें. शिवबंदी फौज ठेविली. प्यादे ठेविले. बहुतच आह्मी हैराण जालों, तें लिहितां विस्तार. दुसरेयाची येथें मजाल नव्हती कीं, बकरुल्लाखान जेर होता. त्यास, ज्याप्रसंगी यावें तेथें नक्षा मिळतां मागें पुढें पाहतां न ये. आह्मांस शिवबंदी खर्च जाला. घोडी पडिलीं. परगणे लुटिले. बक्षीचें देणें लागलें. त्यास, हें लिहितां तपशील आहे. त्यास पुढें सर्व प्रकारें निर्वाह करणार आपणच आहेत. आह्मी फसलों आहोंत. बहुतच खर्चाखालें आलों. परिणाम तुह्मीच लावणार आहां. असो ! आहे वर्तमान तें लिहिलें आहे. वसूल बकरुल्लाखानाकडे गेला तो ठिकाणा लावला. पुढील ठीक करून आपण घेतलेंच. वरकड सर्वप्रकारें तुमचें आहे. आमचे गळीं मामलाह घातला. त्याप्रो। प्रयागचेंहि ठीक करून घ्यावें आणि आह्मांस लिहावें. आह्मी तरतुद करून र॥। धोंडाजी नाईक यांचा ऐवजहि तरतुद केली. याजउपरि वरचेवर हुंडी पाठवून त्याच कामांत आहे. सावकारियांत जीव राहिला नाहीं. दिवाळीं बहुतांची निघाली. याजकरितां संभाळून कार्य करणें लागेल. सत्वरच ऐवज त्यांचा भरणा करितों. आह्मांस माघ शु॥ १३. पावतों जूज पडिलें एक मास, संपूर्ण फालगून, रयत आणावयास वस्ती करावयासी लागली. जमीदार बकरुल्लानें पार नेले. ते आणितां मास लागला. एकदम सावकारी कर्जे घेऊन ऐवज पाच सा लाख पावेतों- धोंडाजी नाईक २ लाख, विठ्ठलराउ ३ लाख, किरकोळी वराते मिळोन भरणा केला. रा। धोंडाजी नाईक यास ऐवज याउपरि पावता करून. आह्मांस काळजी आहे. पातशाहा बाहिर निघाले. वजन निघाले. कोणीकडे जातात ? काय मनसबा जाला ? ते लिहिणें. येथे वर्तमान सावकारियांत आलें जें, सकुराबाद व इटावें, फाफुंद वगैरे येथील घालमेल वजीर गाजुद्दीखान करितात. कोणाकोणास-सादलखान वगैरे याजला–सनद देतात, ह्मणोन लिहिलें आले. त्यास खरें लटकें ईश्वर जाणें ! आपण प्रसंगी आहेत. आह्मांस लिहित जावें. प्रसंगी आपण आहेत. त्यास, कोणे गोष्टीची घालमेल न होय तें करावें. असें करितां कोणी आले तरी फाजित पावतील. प्ररंतु आपण मूळच खुंटून टाकावें ; घालमेल न होय तें करावें. आह्मी पदरीचें आहों. जे काम सोपाल त्याची सरबरा करून. चिंता नाहीं. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. कनवजेस, दोन वेळां कजिया जाला. एक वेळ लक्ष्मणपंताला जे आह्मी धुडावून लाविला, लुटिला. हाली मानसिंग, माधवराऊ प्रभु, सदाशिव देव यांणीं लटकी सनद आणून, आह्मी गाजीपुरास आलों हे संध पाहोन, पठाण रोहिले ठेवून, कनवजेंत रातचे जाऊन, माधवराव कमाविसदार होते ते जलालीकडे गेले होते, जागा खाली पाहोन गेले. त्यास आमची फौज जाई तों वीस पंचवीस रोज़ लागले. चिरंजीव जनार्दनपंत फौजेनिशीं कनवजेंस जाऊन, त्यांचे पारपत्य करून, त्यांजला लुटिलें. ते रात्र जाली ह्मणून जीव घेऊन पळाले. त्यांना मारून उधळून ठाणें कायम केलें. माधोराव याजला कनवजेंत बसविलें. स्वामींनी कनवजेविसीं सुचित्त असावें. याजउपरि आह्मीहि तेथील सावधानी करून. दंगा होऊं पावणार नाहीं. मारूनच टाकावयाचें होतें. परंतु, फौज दुरून धावोन गेली; रात्र जाली; गडबड जाली; पळाले. अकरासे स्वार, दोन हजार प्यादे, त्यांनी पठाण रोहिले वगैरे जमा केले होते. शहर लुटिलें. बहुत खराबी केली. परंतु सत्वर पारपत्य जालें. आह्मी जवळ न होतों ह्मणून जालें. जवळ असतों तर एकंदर कजिया होवूं न पावता. हे विनंति.

रा॥ त्रिबकपंत स्वामीस सां। नमस्कार विनंति उपरि. लिहिलें परिसीजे. सदैव आपलें कुशल वर्तमान लिहित जावें. लोभ असो दीजे. हे विनंति.

[ ४८० ]

श्री

पु॥ श्रीमंत राजश्री ------------ सुभेदारसाहेब
गोसावी यासी:-

विज्ञप्ति ऐसीजे. नजीबखान सरहदेस अगोघरच गेला होता. त्यास, शाहा सडेस्वारीनशी शिखामागें आला. त्याच वेळेस नजीबखान सडेस्वारीनशी शाहाचे मुलाजमतीस गेला. मुलाजमत केली. पाहावें; काय ठराव ठरेल तो. मागाहून विनंति लिहूं. आह्मांस तीन चार पत्रें शाहाचीं बोलावयासी आली; व जिनतमहल, व याकुबअलीखान यासी, व तीर्थरूप राजश्री बापूजी महादेव यासी वरचेवर आलीं कीं, फलाणीयासी पाठविणें. तो विस्तार पूर्वी साहेबास विनंति लिहिली आहे. त्यास आज्ञेशिवाय न जावें, यास्तव दोन महिने मार्ग लक्षिला. विनंति पत्रोतरी आज्ञा आली न कळे. मार्गामुळें पत्रें न पावलीं किंवा दिरंगानें पावली ? पूर्वी पत्रोत्तरीं आज्ञी आली की, ते प्रांतीं स्वामी आलियावर तुह्मांस लिहूं, तेव्हां याकुबअलीखानास घेऊन येणें. त्यास, अबदालचि ++++ सत्वर साहेबाकडे जाणें. त्यास घेऊन न येऊं तरी तो अजूर्दा; व यावें तर आज्ञा नाही. यास्तव त्यांस येथें लावून ठेवून त्याचा एक भला मनुष्य घेऊन येत होतों. येथून एक मजल मथुरेकडे निघालों इतकियांत, वर्तमान ऐकिलें की, आपण माघारा फिरून उजिनीस गेलेत. मार्ग दुस्तर जाला. यास्तव लाइलाज राहिलों. तों शाहाची पत्रें वरचेवर आली कीं, सत्वर येणें. आज्ञेशिवाय न जावें यास्तव पाच सात पत्रें सेवेसी लिहिलीं, व दोन महिने उत्तराची मार्गप्रतीक्षा केली; परंतु उत्तर न आलें. तिकडे जावे तर इकडील हिंदुस्थानी पातशाहासुद्धां बेइमान जाले. त्याजकडे गेल्याने त्यासी व साहेबासी एकोपियाची शोहरत होईल व हे बेइमान बेइमानी करणार नाहींत व आपण या पातशाहास पातशाहा केले असतां बदनियत जाली. येविशईहि तिकडील बनेल तर आपले करावे. तेहि बोलावितात. काय मानस ? व किती फौज ? व काय विचार मनास आणून आपणाकडे. यावया + + + + + + + + + + + रवाना जालों तो शामलीस पावलों. पुढेंहि साहेबाचे प्रतापें जातों. शाहास व अश्रफुल उमरा शाहाबलाखान यासी पत्रें शिष्टाचाराचीं पाठविणार आपण समर्थ आहेत. सुरक्षित पावून हजर येऊन श्रीकृपेनें साहेबांचे दर्शण घेऊं तो सुदिन ! खर्चावेचाविषयी पूर्वी विनति लिहिली ते मान्य करून कृपा करणार आपण समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे हे विनंति.

[ ४७९ ]

श्री.

पौ। छ २६ माहे जिल्हेज.

राजश्रियाविराजित राजश्री यादोपंत स्वामी गोसावी यांसीः--

सेवक बापूजी माहादेव व पुरुषोत्तम माहादेव साष्टांग नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल छ २६ जिल्काद जाणून तुह्मीं आपलें कुशल हरघडी लिहीत असलें पाहिजे. विशेष. रा। अंताजी माणकेश्वर याच्या हवाल्याचे रुपये लाख देणें. त्याची वरात राजश्री जनार्दन बाजीराव याची एका महिन्याच्या वाईद्याची केली आहे. त्यासी रा। धोंडाजी नाईकांनी पत्र रघुनाथ नाईकास लिहिलें आहे. व आह्मींही रघुनाथ नाईकास पत्र लिहिलें आहे. त्यासी प्रमाण करून लाखा रुपयांची तजवीज करून देणें. मागून रा। बाळाजी शामराज याजकडोन ५०००० पन्नास हजाराची रु॥ हुंडी येईल ते तुह्माकडे पाठवून देतों. परंतु हरतजवीज करोन वरातदारास रुपये पावून त्याची रजावंती होय तें करणें. जे गोष्टींत लौकिक न होय तें करणें. तुह्मी खातरजमेनें काम करीत जाणें. भरंवसा तुमचा आहे. आह्मीं तुमच्या भरंवशावर बेफिकीर आहों. भेट होय तो सुदिन. हे विनंति.

[ ४७८ ]

श्री.

पौ॥ फाल्गून वद्य १०

श्रियासह चिरंजीव राजश्री देवराव यांसीः--

दामोदर महादेव व पुरुषोत्तम महादेव आशिर्वाद उपरि येथी कुशल फागूण वद्य ७ मु॥ कलासूर जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. इंद्रमणासमागमें पत्र पा। तें पावलें. श्रीमंतांचे पत्र पाठविलें तें पावलें. त्याचें उत्तर पाठविलें आहे, तें पाहून लाखोटा करून श्रीमंताकडे रवाना करणें. त्याचें उत्तर येईल त्याप्रमाणें वर्तणूक करणें. ते मोहराच घेतील. कदाचित् मोहरा न घेतल्या तर पनासा हजाराच्या मोहरा विकून रु॥ देणें, व पनास हजार रु॥ धोंडाजी नाईकाकडून देवणें, मोहरा ठेवणें, व तुह्मीं श्रीमंतास पत्र लिहिणें कीं ज्याप्रमाणें स्वामी लिहितील ते करूं व रामाजी चिटनीस यास कलमदान पाठविलें तें कासदापासीं देणें. गिरधराचे इजाफीयाविशीं लिहिलें. त्यास, तुमच्या लिहिल्यापूर्वीच तुह्मांस गिरधराचे व लक्षमणाचे इजाफीयाविशीं लिहिलें आहे, त्याप्रमाणें देणे. व त्रिंबक रंगनाथाचे मुलाचे व्रतबंधासही देविलें तें देणें. घरीं बहुत सावध असणें. लिहित जाणें. खेळत जाऊं नका. मातोश्री काकू व आक्काचे आज्ञेंत असणें. चिरंजीव गणोबाची निगा करणें. बाहेर जाऊं न देणें. हवेलीचें काम त्वरेनें करवणें. दिवाणखानियाचें काम अभंग करवणें. बहुत काय लिहिणें ? हे आशिर्वाद.

रा। यादो रंगनाथ यांसी नमस्कार विनंति उपर. तुह्मीं हिसेब दिल्हा. परंतु धोंडाजी नाईक व शंकराजी ना। रेघे याजकडे व्याज काय जाहलें तें कांहींच न लिहिलें. तर मित्तीवार हिसेब करून किती रुपये जाहले ते लिहिणें. वरकड हिसेब राहिला असिला तोही करणें. व्याजाचाही
राहिला असेल तो पाठवणें. हे विनंति.

रा। धोंडाजी नाईक स्वामीस नमस्कार विनंति उपर लि॥ परिसीजे. आह्मी उदईक शहरास जातों. तेथील काम दो चो दिवशीं उगवून पुढें जाऊं. कळलें पाहिजे. हे विनंति.

मातोश्री काकू व मातोश्री अक्का वडिलांचे सेवेसी सा। नमस्कार विनंति उपर. मी व नाना खुशाल आहों. चिंता न करणें.

पौ। फाल्गुन वद्य १०

[ ४७७ ]

श्री.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजीपंत यांसी :-

प्रति सदाशिव दिक्षित मु॥ दिगेरी आशिर्वाद उपरी. तुह्माकडे मौजे पोव्याधागूर आहे. त्यास, पा। मजकुरी रो। जगजीवन पवार यांची खंडणी पडली आहे. त्यास पे॥ बारबस्त वाटणी मौजे मजकुरावर बसली आहे. तो ऐवज पेशजीच घ्यावा. त्यास, न दिल्हा. हल्लीं या ऐवजाविषयीं आपल्यास सरकारचें पत्र आहे. त्याची नकल आपल्याकडे पा। त्याजवरून ध्यानास येईल. बहुत काय लिहिणें ! हे विनंति.

[ ४७६ ]

श्री.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजीपंत व पुरुषोत्तमपंत स्वामीचे सेवेसी :-

सेवक गंगाधर यशवंत सा। नमस्कार विनंति उपरि कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जावें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें. कितेक तपसिले अर्थ लिहिला तो श्रवण होऊन सर्व कळों आला. इकडील वर्तमान राजश्री सुभेदारांनी लिहिलें आहे त्यावरून कळों येईल. तिकडील वर्तमान पैदरपै लिहित जावें. तुमच्या लिहिल्याप्रमाणें श्रीमंतसुद्धां मजल दरमजल प्रस्तुत कछवियाचें पारिपत्य करीत असों. तिकडील सविस्तर वृत्त कळवीत जावें. लोभ असो दाजे. हे विनंति.

सेवेसी विनायक बाजीराव व कृष्णराव गंगाधर सा। नमस्कार विनंति लि॥ परिसीजे. सदैव कृपाकरून पत्रीं सांभाल करीत जावा. वरकड वर्तमान यजमानांच्या पत्रावरून कळों येईल. लोभाची वृधी कीजे. हे विनंति.