[ ४८१ ]
श्री.
पौ। छ २१ रजब
पु॥ राजश्री बापूजीराव, राजश्री दामोदरराव स्वामीचे सेवेसीः--
विनंति उपरि. सनदेनें कार्य होतें तर आह्मी कजियांत न पडतों. जुजामुळें दोनशे घोडे लहानथोर पडले. भले माणूस पडिले. घोडे पडिले. त्याची खंडणी करून रुपये दिल्हे. ते येथें गोपाळपंत होते. याजखेरीज बक्षीचें देणें आलें. शिवबंदी फौज ठेविली. प्यादे ठेविले. बहुतच आह्मी हैराण जालों, तें लिहितां विस्तार. दुसरेयाची येथें मजाल नव्हती कीं, बकरुल्लाखान जेर होता. त्यास, ज्याप्रसंगी यावें तेथें नक्षा मिळतां मागें पुढें पाहतां न ये. आह्मांस शिवबंदी खर्च जाला. घोडी पडिलीं. परगणे लुटिले. बक्षीचें देणें लागलें. त्यास, हें लिहितां तपशील आहे. त्यास पुढें सर्व प्रकारें निर्वाह करणार आपणच आहेत. आह्मी फसलों आहोंत. बहुतच खर्चाखालें आलों. परिणाम तुह्मीच लावणार आहां. असो ! आहे वर्तमान तें लिहिलें आहे. वसूल बकरुल्लाखानाकडे गेला तो ठिकाणा लावला. पुढील ठीक करून आपण घेतलेंच. वरकड सर्वप्रकारें तुमचें आहे. आमचे गळीं मामलाह घातला. त्याप्रो। प्रयागचेंहि ठीक करून घ्यावें आणि आह्मांस लिहावें. आह्मी तरतुद करून र॥। धोंडाजी नाईक यांचा ऐवजहि तरतुद केली. याजउपरि वरचेवर हुंडी पाठवून त्याच कामांत आहे. सावकारियांत जीव राहिला नाहीं. दिवाळीं बहुतांची निघाली. याजकरितां संभाळून कार्य करणें लागेल. सत्वरच ऐवज त्यांचा भरणा करितों. आह्मांस माघ शु॥ १३. पावतों जूज पडिलें एक मास, संपूर्ण फालगून, रयत आणावयास वस्ती करावयासी लागली. जमीदार बकरुल्लानें पार नेले. ते आणितां मास लागला. एकदम सावकारी कर्जे घेऊन ऐवज पाच सा लाख पावेतों- धोंडाजी नाईक २ लाख, विठ्ठलराउ ३ लाख, किरकोळी वराते मिळोन भरणा केला. रा। धोंडाजी नाईक यास ऐवज याउपरि पावता करून. आह्मांस काळजी आहे. पातशाहा बाहिर निघाले. वजन निघाले. कोणीकडे जातात ? काय मनसबा जाला ? ते लिहिणें. येथे वर्तमान सावकारियांत आलें जें, सकुराबाद व इटावें, फाफुंद वगैरे येथील घालमेल वजीर गाजुद्दीखान करितात. कोणाकोणास-सादलखान वगैरे याजला–सनद देतात, ह्मणोन लिहिलें आले. त्यास खरें लटकें ईश्वर जाणें ! आपण प्रसंगी आहेत. आह्मांस लिहित जावें. प्रसंगी आपण आहेत. त्यास, कोणे गोष्टीची घालमेल न होय तें करावें. असें करितां कोणी आले तरी फाजित पावतील. प्ररंतु आपण मूळच खुंटून टाकावें ; घालमेल न होय तें करावें. आह्मी पदरीचें आहों. जे काम सोपाल त्याची सरबरा करून. चिंता नाहीं. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. कनवजेस, दोन वेळां कजिया जाला. एक वेळ लक्ष्मणपंताला जे आह्मी धुडावून लाविला, लुटिला. हाली मानसिंग, माधवराऊ प्रभु, सदाशिव देव यांणीं लटकी सनद आणून, आह्मी गाजीपुरास आलों हे संध पाहोन, पठाण रोहिले ठेवून, कनवजेंत रातचे जाऊन, माधवराव कमाविसदार होते ते जलालीकडे गेले होते, जागा खाली पाहोन गेले. त्यास आमची फौज जाई तों वीस पंचवीस रोज़ लागले. चिरंजीव जनार्दनपंत फौजेनिशीं कनवजेंस जाऊन, त्यांचे पारपत्य करून, त्यांजला लुटिलें. ते रात्र जाली ह्मणून जीव घेऊन पळाले. त्यांना मारून उधळून ठाणें कायम केलें. माधोराव याजला कनवजेंत बसविलें. स्वामींनी कनवजेविसीं सुचित्त असावें. याजउपरि आह्मीहि तेथील सावधानी करून. दंगा होऊं पावणार नाहीं. मारूनच टाकावयाचें होतें. परंतु, फौज दुरून धावोन गेली; रात्र जाली; गडबड जाली; पळाले. अकरासे स्वार, दोन हजार प्यादे, त्यांनी पठाण रोहिले वगैरे जमा केले होते. शहर लुटिलें. बहुत खराबी केली. परंतु सत्वर पारपत्य जालें. आह्मी जवळ न होतों ह्मणून जालें. जवळ असतों तर एकंदर कजिया होवूं न पावता. हे विनंति.
रा॥ त्रिबकपंत स्वामीस सां। नमस्कार विनंति उपरि. लिहिलें परिसीजे. सदैव आपलें कुशल वर्तमान लिहित जावें. लोभ असो दीजे. हे विनंति.