[ ४८३ ]
श्री.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदरपंत दादा स्वामीचे सेवेसीः----
पोष्य गोविंद बल्लाळ कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। जेष्ठ वा। १३ जाणोन स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपला निरोप घेऊन लष्करीहून स्वार जालों, तें इटावेजवळ येऊन मुक्काम केला. चौधरीस रुपयांविसी सांगून पाठविलें. त्यास तो इटावेहून उठोन बेहेडांत खुरावलीचे गढींत जाऊन राहिला ! मोठा हरामजादा ! रा॥ शिवराम देवजी आपणाकडील गृहस्थ आले. त्यांणीही वर्तमान सांगितले. त्यावरून चौधरीकडे भलें माणूस पाठविलें. आह्मीं त्यास लिहिलें की, उखास तिळमात्र न करणें, राजश्री दादाचे रुपये तुह्माकडे आहेत त्याची मात्र वाट करून देणें; आह्मीं उठून जाऊं; वरकड आमचा गुंता नाही. कदाचित् पुढें जाऊन मुकाम करा ह्मणाल तर पुढें जाऊन मुकाम करूं; तुह्मांसी दुसरा विचार नाही. ह्मणून कितेक विचारें लिहिलें. भलें माणूस पाठविलें त्यांणींहि उत्तम प्रकारें सांगितलें. परंतु हृदयांत खाऊन राहिला. पैशाची वाटही करून येईना; आणि गढी सोडून बाहिरहि येईना. आह्मीं कजिया करावा तर गावगनाची खराबी होईल. वजिराकडील आठ नव लाख रुपये त्याजकडे यावे. त्यांचे वसूलास जगतनारायण आहे. अद्यापि दोन लाख रुपये पावले नाहींत. आह्मीं च्यार रोज राहून त्यासी कजिया करावा, तर त्यांचा विचार ऐसा पाहिला जे, निमित्य मात्र परगणा खराब केलियाचें आह्मावर द्यावें. यास्तव, आह्मीं कूच करून पुढें येऊन राहिलें आहों. मागती त्याजकडे भला माणूस पाठवितों. कदाचित् तो आपणांस कांहीं लिहील तर, चित्तास न आणावें. आपल्या कार्यास तिळमात्र अंतर करणार नाही. मोठा हरामजादा ! बेइमान ! आह्मांसी रदबदली केली की, मी रुपये देणें ते मुद्दल दिल्हे. त्यास, आह्मी त्याजला साफ सांगितले की, तुमचे हातीची टिपणें आहेत त्यांप्रमाणें रुपये उत्तम प्रकारें घेऊन; तूं आमचे काबूत आहेस; सभोंवते आह्मी आहों. त्यास ते आपणांस लिहितील की, उजाड केला तर मार्गाने आलों; दोन मुकाम केले; ताकीददार होवून उत्तम प्रकारे ताकीद केली. त्यास, रुपये त्यांजकडे आहेत. त्याची फिकीर नाहीं. रुपये घेऊन. आमचें नांव आइकतांच इटावेयाहून पळून गेला. त्यास, तुर्त त्याची वजिराची तहशील मध्यें आह्मीं राहिलियानें त्याजला बाहाना होईल. याजकरितां महुयावर आलों. त्यास, आह्मीं शिवरामपंतांस पष्ट सांगितले कीं, रुपये देतील तर घेऊन येणें, न देत तर तुह्मीं उठोंन येणें. आह्मांसी तो सलुख न करी. रुपये दादाचे न देतां त्याचा अमल चालोन. त्यास शिवरामपंत उठोन आले नाहीं. त्याजकडे माणूस पाठविलें आहे. रुपये त्यांणीं दिल्हे तर उत्तम जालें. नाहींतर, शिवरामपंतास उठून आणून, रुपये उत्तम प्रकारें त्याजपासून घेऊन. फिकीर नाहीं. तूर्त तो पळाला. आणि परगणेयांत फिसात करावी तर निमित्त आह्मांवर देणार. त्याजला रुपये वजिरास देणें नाहीं. त्याणे परगणेयाची तहशील खाऊन सुखरूप बसला. असो. तुह्मीं सांगाल, सनद पाठवाल, तरी दोनी परगणेयाची कच्ची तहशील करून, रुपये ठिकाणीं लावून देऊन. बरें ! जे तुह्मीं सांगाल, लिहाल तें करून. तुमचें लिहिलेशिवाय करणें नाहीं. आह्मीं आपले असो. सदैव पत्रीं सांभाळ करावा. दिल्लीस गेलियावर साद्यंत लिहावें. कनवजेस स्वार पाठविले. तेथील फिकीर न करावी. बहुत काय लिहिणें ! कृपालोभ असो दीजे. हे विनंति.
रा॥ त्रिंबकपंतांस साष्टांग नमस्कार. सोभ असो दीजे. हे विनंति.
रा॥ पुरुषोत्तमपंतबाजींस साष्टांग नमस्कार. लि॥ परिसीजे. कृपालोभ असो दीजे. हे विनंति.