[ ४७९ ]
श्री.
पौ। छ २६ माहे जिल्हेज.
राजश्रियाविराजित राजश्री यादोपंत स्वामी गोसावी यांसीः--
सेवक बापूजी माहादेव व पुरुषोत्तम माहादेव साष्टांग नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल छ २६ जिल्काद जाणून तुह्मीं आपलें कुशल हरघडी लिहीत असलें पाहिजे. विशेष. रा। अंताजी माणकेश्वर याच्या हवाल्याचे रुपये लाख देणें. त्याची वरात राजश्री जनार्दन बाजीराव याची एका महिन्याच्या वाईद्याची केली आहे. त्यासी रा। धोंडाजी नाईकांनी पत्र रघुनाथ नाईकास लिहिलें आहे. व आह्मींही रघुनाथ नाईकास पत्र लिहिलें आहे. त्यासी प्रमाण करून लाखा रुपयांची तजवीज करून देणें. मागून रा। बाळाजी शामराज याजकडोन ५०००० पन्नास हजाराची रु॥ हुंडी येईल ते तुह्माकडे पाठवून देतों. परंतु हरतजवीज करोन वरातदारास रुपये पावून त्याची रजावंती होय तें करणें. जे गोष्टींत लौकिक न होय तें करणें. तुह्मी खातरजमेनें काम करीत जाणें. भरंवसा तुमचा आहे. आह्मीं तुमच्या भरंवशावर बेफिकीर आहों. भेट होय तो सुदिन. हे विनंति.