[ ४८४ ]
श्रीनरहरी.
पौ। छ १३ जमादिलाखर.
तीर्थस्वरूप राजश्री दादा व तथा आपा व बाबा वडिलांचे सेवेसी :-
आपत्य बजाबानें चरणावर मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना ता। छ १ सफर मु॥ नजिक हरिद्वार येथें असो. विशेष. वडिलांकडून बहूत. दिवस आशीर्वाद पत्र येऊन सांभाळ होत नाहीं. तस्मात् , आमचेच दैव विपरीत आले ! इकडील वर्तमान तरः तीर्थरूपजीस पाणिपतच्या गावावर गोळी लागून आश्विन वा। १० स देवाज्ञा जाली. तीर्थस्वरूप माईंनीं सहगमन केलें. एक मातोश्रींनी पूर्वीच वनांत टाकलें. तिर्थरूपास नऊ महिने झाले. सरकारांतून पैसा एक मिळत नाहीं. उठोन यावें तर, मामलतीमुळें वगैरे साता आठा हजारांचा पेच आहे. तिकडे आल्यावर वारणार नाही. इकडे धनी कोणी नाहीं. मुलुक ठीक नाही. सर्वांस घेऊन थोरल्या लष्करांत जावे, तर सावकार जाऊं देत नाहींत, आण येथें भक्षावयास मिळत नाही. सर्वास टाकून एकटेंच जावें तर, मुलकाचा भरंवसा नाहीं. घटकेंत आह्मीच हुकुम कारितों, आण मागती त्यांच्याच पायां पडावें लागतें. मुलकाची चाल याप्रों।. सर्वांस टाकल्यानंतर यांची आशा सोडावाशी होती. ऐशा पेंचात बहुत आहोंत. प्रस्तुत ती॥ राजश्री बाळाभाऊ गबंधे याप्रांती कामकाजामुळें आले. त्यांचे गळां पडून तूर्त मुलेंमाणसें त्यांजवळ ठेवून, पुढें यावेसें आहे. इकडील खर्च भारी ; पैसा पुरवठ्या येत नाहीं. भाऊकडे एक माहाल मात्र आहे; त्याजकडेहि विशेष कामकाज नाहीं ; तेहि पेंचांतच आहेत. घोडीं, उंट, चिजवस्त मोडून दोन अडीच हजार वारले. आतां जवळ वस्त अथवा घोडी मिळोन ऐवज शंभराचादेखील नाही. सरकारांतून ४० रुपये महालमजकुरी लावून देत जाणे, परंतु प्रस्तुत तहशलीचे दिवस नाहींत. दरमाहेचा दरमाहा मिळणें कठिणच आहे. परंतु मागावयास जागा जाली. दरमाहा दिढाशांचा खर्च पदरी आहे. ईश्वर काय करील तें पाहावें. ईश्वरें इकडे वनांत आणून टाकिलें. मागती सर्वांची भेट होणें कठिण आहे. त्याची इच्छा मात्र नकळे. कुसाजीचा दारकू आह्मांजवळच आहे. खुशाल आहे. बहूत काय लिहिणें ? हे विज्ञापना. सर्व मंडळींस शिरसाष्टांग नमस्कार प्रविष्ट करावा. दाजीबा तासगावी आहेत ह्मणून ऐकिलें. त्यांची काय सोह आहे हें लिहावें. हे विज्ञप्ति.