[ ४८५ ]
श्री.
पौ। छ १४ रमजान.
पु॥ राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसीः--
उपरि. दिल्लीहून पातशांनी श्रीमंतास व सरदारास खिलत व बहुमान राजे देवदत्त यांजपासी देऊन पाठविले ते रीतीप्रमाणें सरदारसहित श्रीमंती घेऊन डेरियास आले. पातशाही तोफखाना आणावयाची आज्ञा श्रीमंती केली. त्यास, येथून तेथें लिहावें, अर्ज करावा, तो वकील पदरचा करितात, ऐसें अंताजीपंती सांगावें. तेणेकरून काम होणेस दिरंग पडावी. अंताजीपंताचे सांगितल्यावरी हा मजकूर व्हावासा नाहीं; परंतु अंताजीपंत सखारामपंताचे व्याही; सखारामपंत श्रीमंताचे दिवाण; श्रीमंत बज्यास्वामीच. असा प्रकार तेथें दर्शवून, अंताजीपंत बोलतील तें आमचे बोलणें समजावें; ऐसें सखारामपंतीं त्यांचे निदर्शनास आणून दिल्हें. यामुळें यारीतीनें होते. याजकारितां ते असतां आह्मांस आज्ञा न करावी. त्याजवरून त्यांणी अंताजीपंतास आणविले. आह्मांसहि आणावयाची आज्ञा केली. तेव्हां आज्ञेप्रमाणें पुरुषोत्तम माहादेव राजे देवदत्त यांस भेटावयास शहराजवळ गेले. अंताजीपंत मागें राहिले. यांणी जाऊन तोफखानियांत तयारी करून परवानगी लाविली. तो अंताजीपंत मागती माघारे गेले. हें पाहावें तो + + + ना राहावितील किंवा आपणच घेऊन आलों, हे ऐष द्यावयास सिद्ध होतील. असो. सेवकास स्वामिसेवा करणें तीर्थरूपांनी जीवच स्वामीसेवेवरी खर्च केला आहे व आह्मांसहि स्वामीच्या कल्याणावाचून दुसरें करणें नाहीं. हे निष्ठाच स्वामीचे चित्तांत येऊन सेवकाचा मजुरा दिसेल. अन्यथा दुसरियानें सांगावें ऐसे नाही. सर्व निदर्शनास येईल. ह्मणोन विस्तारें लिहिलें तें कळले. ऐसियास, तुमचे वडिलानें स्वामीकार्य करून या पदवीस आले. व तुह्मीं त्याच गोष्टीवर चित्तापासून राहोन, उमदी कामें उत्तम प्रकारें करून, चिरंजीवाची मर्जी राखोन राहिल्यानें सर्व प्रकारें तुमचे ठायीं दुसरा कार्यविचार नाहीं. तरी कळतच आहे. जाणिजे. छ.२७ रजब. बहुत काय लिहिणें ?
( लेखनसीमा. )