Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३१२
श्री १७३३ माघ वद्य ८
आज स्वारी राजश्री त्रिंबकजी पाटील डेंगळे ता। वाटेदार नि।। वो राजश्री सिद्धेश्वर दीक्षित ठकार, जमीन मौजे कोंढीय, प्रांत कराड, सुईसन्ने अशर मयातैन व अलफ. ठकार याचे वसुला ऐवजी रुपये १५ पंधरा वो राजश्री शिवराम दीक्षित ठकार यास खेडचे मुबादला द्यावयाबद्दल देखत रोखा घेऊन सातारा येणें. या कामास लोक दिमत हुजरात पा।, यांस मसाला रु।। १ येक आदा करणें जाणिजे. छ २१ मोहरम.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३११
श्री १७११ आश्विन शुद्ध ४
श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः-
विनंति सेवक बाळाजी महादेव चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कर विज्ञापना, ता। छ २ मोहरमपर्यंत स्वामीचें कृपावलोकनें तालुके सिवनेरचें व सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. सरकारचे आज्ञापत्र छ २४ जिलकादचें छ १ मोहरमी सादर जालें. तेथें आज्ञा कीं, हणमंता बिन चापाजी पाटील टिलेकर मोकदम मौजे कुलसेत तर्फ हवेली प्रांत जुन्नर यानें हुजूर विदित केलें कीं, मौजे मजकुरीं पाटिलकीचीं सेतें माझीं आहेत त्यास, रघु डोक्या व संतु डोक्या व त्रिंबक डोक्या, मौजे मजकूर, हे तिघे जण आपलीं सेतें असें बोलून आपल्यासीं कज्या करून सेतास खलेल करितात व मौजे मजकुरीं आपली जागा आहे त्या जाग्यावर डोके घर बांधूं लागले. ते समई त्यास द्वाही दिल्ही असतां जबरदस्तीनें माझे जाग्यावर घर बांधले. याजकरितां डोके यास हुजुर आणून मनास आणावयाची आज्ञा जाली पाहिजे. ह्मणोन, त्याजवरून, हें पत्र तुह्मांस सादर केलें असे. तरी येविसीचें वर्तमान मनास आणावें लागतें. सबब, डोके तीन असामी हुजूर आणविले आहेत. त्यास व तुह्मी आपले कडील कारकून माहीतगार व बाजी कानदेव यांसी हुजुर पाठवून देणें. ह्मणोन त्याजवरून डोके असामी तीन यासी पाठविले आहेत. परंतु हणमंत पाटील याजपासीं डोके घरठाणेयाचा व सेताचा कजिया सांगतात. त्यास, हरदूजणाचें वर्तमान मनास आणून फडशा करावयासी जमीदार व भोवरगांवचे गोत असावे. ते मौजे मजकुरीं जाऊन सेतें व घरठाणा पाहून फडशा करितील. यास्तव, हणमंता पाटील यासी आज्ञा होऊन मजकडे आला ह्मणजे जमीनदार व भोवरगांवचे गोत जमा करून, त्यांचे विचारें ठरेल त्याप्रमाणें फडशा पाडीन. वरकड, डोक्यांस तिही असामी मिळोन तीस रुपये मसाला जाला आहे. त्यास कुळंब्यावर तिही सालाची आफती पडली, याजमुळें अन्न खावयासी नाहीं. उपासी मरतात. ढालाईतांनी बहुत निकड केली. परंतु त्याजपासीं पैसा निर्माण न होये. तेव्हां तीस रुपये मी दिल्हे आहेत. त्यास, मसाला माफ होऊन ढालाईतांनीं सदहूं तीस रुपये घेतले आहेत ते माघारे द्यावयाची आज्ञा जाली पाहिजे. तुलमसेत हा गांव स्वामीनीं कृपाळू होऊन मजला इनाम करून दिल्हा आहे. परंतु टिळेकराचा काच रात्रंदिवस सोसवत नाहीं. येविसीची विनंति पूर्वी स्वामीपासीं समक्ष केली आहे. वरकड, मौजेमजकुरीं एक मूल डोकेयाचें. तेथील पाटीलकी वगैरे अधिकार त्याचे होते. परंतु प्रसंगानुरूप पाटीलकी मोंगलांनी घेतली आणि त्यांणी सरकारांत दिल्ही. याचा पाल्हाळ पाहतां बहुतच आहे, तो पत्रीं कोठवर ल्याहावा ? प्रस्तुत, टिळेकर * सरकारची खिजमतगार ममतेचा. त्याजपासीं या कुळंब्यांनीं भांडोन परिणाम लागणें, हे समजलेंच आहे. यास्तव, हणमंत टिळेकरास मीही येथून आणायवासी पाठविलें आहे. तो स्वामीची आज्ञा घ्यावयास येईल. त्यास आज्ञा होऊन, येथें येई तें करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३१०
श्री १७११ श्रावण वद्य ७
पो छ २३ जिल्काद सन तिसैन श्रावण.
सेवेसी केसो महादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना. तार छ २१ जिल्काद परियेंत सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामींनी आज्ञापत्र पाठविलें तेथें आज्ञा कीं, रा। काकोबा वैद्य कोपरगांवीं पाठविले आहेत. त्यास काल दोनप्रहरीं पावले. श्रीमंत बाबासाहेब यांजला उतार पडला आहे. ओषधही घेत असतात. व श्रीमंत आपासाहेब यांचा मळेयांतून येत समई खाचेंत पाय गेला. तों लचक पोटांत बसली आहे. दुखतो. श्रीमंतास चांगला उतार पडत आला आहे. पेठ येवलें येथें सरकारचा जकातीचा अंमल व साइराचा आहे. त्यास होळकराकडील तुळाजी तावरा, पागा होळकराकडील घेऊन आले आहेत, त्यास पेठेंत कटकट होऊन लढाईचा प्रसंग मांडिला आहे. गांवांतील उदमी सावकार गांवांतून जाणार, मोकासीही सिबंदी ठेवीत आहेत. त्यास, पेशजीं करारमदार पुणियांतच होऊन आला असतां, आतां तुळाजी तावरे यांणी पागा व शिबंदी आणून सरकारचा अमल उठवावा असें आहे. त्यास, मामलेदारही सिबंदी ठेऊन कजिया करतील. परंतु, येथें सरकारची फौज असतां, लढाईचा प्रसंग नसावा. याजकरितां सेवेसी वर्तमान लिहिलें असे. मामलेदाराची कुमक करावयाची आशा जाहलियास, आज्ञेप्रमाणें वर्तणूक करीन. मध्येंच करावें, तरी आज्ञा नाहीं. याजकरितां सेवेसी विनंतिपत्र पाठविलें असे. तरी, स्वामीनीं आज्ञा करून पाठविलेंयासी आज्ञेप्रमाणें करितों. त्यांनीं निकडच केली तरी येथूनही कांहीं देतो. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३०९
श्री १७११ श्रावण वद्य २
सा। नमस्कार विज्ञापना ता। छ १ जिलकाद गुरुवार प्रहर दिवस पावेतों स्वामीचे कृपावलोकनेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. राजश्री अलिबाहार बाबाकडून सरकारच्या लखोट्याची थैली मेणकापडी एक आली. येतांच डाकेबरावर सेवेसी रवानगी केली असे. थैली पोहचल्यानंतरी सरकारचे लखोटे जे असतील ते सबनीस हुजूर प्रविष्ट करतील. मारवाडांत राज्याचे घरीं फितोर व सांप्रत वाटाडे सिकस्त जाले. ह्मणोन राजश्री बावाच्या फौजा मारवाडांत गेल्या. जैपूरवालाही सरंजाम सिद्ध करीत आहे. याप्रो जैपूराहून पत्रें आलीं त्यावरून विनविलें असे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३०८
श्री. १७११ वैशाख शुद्ध १
सेवेसी रघुनाथ हरी कृतानेक सा नमस्कार विनंती येथील कुशल ता। वैशाख शु।। १ पावेतों स्वामीच्या कृपेंकरून यथास्थित असे. विशेष. सांप्रत, कृपापत्र येऊन सांभाळ होत नाहीं. तरी पत्र लिहावयाची आज्ञा केली पाहिजे. इकडील वर्तमान सालमलकुरी आफत पडली, त्यांत माघमासी गारा पडल्या, तेणेंकरून कांहींच आस्त राहिली नाहीं. गोसावी चाकर आहेत, यांची तनखा चढली आहे. पैशास ठिकाण नाहीं. यामुळें दूर करावयाचा विचार योजिला, तों दतियेकरांनीं गोसावी दूर होतात हें समजोन गीर्द झासी येथील मौजे भागोरगांव मारिला, माणसें जखमी केलीं, घरें जाळलीं, गुंरे वगैरे लुटून नेलीं, आणि आणखी उपद्रव करावयाच्या उद्योगास लागले. जमा जाला सा गोसावी मागती ठेवणें प्राप्त जालें. गोसावी यांस दरमहा रोजमरा पाहिजे. पैशास ठिकाण नाहीं. पैसा पेंच पडला आहे. रबींत अगदींच ठिकाण राहिलें नाहीं. मवास भारी याचें पारपत्य होतें तरी पैसा मिळता व सरकारची जागा सुटती. परंतु तो योग घडत नाहीं. मवासाचें दैव बलवत्तर यामुळें सरदारांस इच्छा होत नाहीं. आल्या दिवसापासून सरदारांस विनंति करितों. सांप्रत राजश्री आलिबहादर आले आहेत. त्यांजकडे विनंति करावयास कारकून पाठविले आहेत. ऐशास कृपा करून पाटीलबावास व अलिबहादर यांस ताकीदपत्रें पाठवावयाची आज्ञा करावी. मेहनेत विनंति करून पाहों. वरकड सरदारांकडील वर्तमान उभयतां सरदार मथुरेस आहेत. फौजा पुढें रवाना केल्या. मुलतानाकडे जाण्याचा मनसब आहे. घडेल तें पहावें. गुलामकादर याणें दिल्लीत बेकैद बहुत केली. त्याचे पारपत्यास आलीबहादर दिल्लीस गेले, तों गुलामकादर तेथून पलोन जाऊ लागला. त्याच्यामागें जाऊन, त्यास हस्तगत करून, मथुरेस आणून, शरीर छिन्नभिन्न करून, मारून टाकिला. मोटामल्ल ज्याच्या विद्यमानें ग्वालेर लुटली होती, तोही फितुरांत आढळला. ह्मणून त्यासही मारून टाकिलें. सांप्रत त्या प्रांती स्वस्थ आहे. वरकड सविस्तर राजश्री बाजी जगन्नाथ व अंताजी विश्वनाथ यांस लिहिले आहे. सेवेसी श्रुत करितील. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३०७.
श्री १७१०.
जाबता गुन्हेगारी तोतयासंबंधी बाबत मराठे वगैरे सरदार-लोक-तालुके रत्नागिरी नि।। राजश्री महिपतराव कृष्ण. सु।। तिसा समानीन मया व अलफ. पेशजी सन सीत-सबैनांत तोतया जाहला होता. त्याजकडे लोक सरदारी करून चाकरीस राहिले होते. त्यांपैकीं कांहीं असामींचे फडशे गुन्हेगारीचे पेशजी होऊन, बाकी राहिले आहेत. त्यांजपासून गुन्हेगारी घ्यावयाविसी हुजूरची आज्ञा जाहली. त्याजवरून तोतयाकडे सरदार लोक चाकर राहिले होते, त्यांचा मजकूर सुभा मनास आणून, जिवा-मवाफक गुन्हेगारी करार केली ते रु।।.
४२४६ तोतयाचे वेळेस नव्या सरदा-या करून, बरोबर लोक घेऊन, चाकरीस तोतयाकडेस राहिले होते, सा। रु।।.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३०६
श्री लक्ष्मीकांत. १७१० आश्विन शुद्ध ५.
राजश्री बाळाजीपंतनाना गोसावी यांसी:-
सकलगुणालंकरणअखंडतलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रो रघोजी भोसले सेनासाहेवसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असलें पाहिजे. विशेष. राजश्री पंतप्रधान यांचे भेटीचे उद्देशें नागपुराहून सुमुहूर्ते छ १७ जिल्हेजीं डेरेदाखल जाहलों, आणि तेथून दरमजल मुर्तजापुरीं येऊन मुकाम केला असे. अतःपर लांब लांब मजली करून अविलंबें येत असों. भेट होईल तो सुदिन असे. तेथें ती।। आबा याचें राज्यकारण आढळलें. म्हणोन सूचना व्हावी, याअर्थी राजश्री पंतप्रधान यांणीं राजश्री बाबूराव विश्वनाथ यांसीं पाठविलें. त्यास, तें पत्र येथें पाहून वजिन्नस तीर्थरुपाकडे पाठविलें आहे. त्याचा बंदोबस्त सर्व घडून येईल. रा। छ ५ माहे मोहरम. बहुत काय लिहिणे ? लोभ असों दिजे. हे विनंती. मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३०५
पौ। छ २९ सफर तिसैन
मार्गशीर्ष. श्री १७१० भाद्रपद वद्य ७
श्रीमंत पंतप्रधान स्वामीचे शेवेसीः--
विनंति सेवक रघुनाथ हरी कृतानेक सा। नमस्कार, विज्ञापना. येथील वर्तमान ता। भा। वा। ७ पो स्वामीचे कृपेंकरून सेवकांचे वर्तमान यथास्थित असे. विशेष, छ २६ रमजानचें आज्ञापत्र सादर जालें तें छ १७ जिल्हेज पावलें. पत्रीं आज्ञा कीं, ता। झाशी येथील मामलत तुह्मांकडे. त्यास, मामलतीप्रों सरकारांत रसद येत नाहीं व हिंसेब कचा पका साल होतांच आकारून सरकारांत समजाऊन वरचेवर फडशे करून घ्यावे, तेही गोष्ट तुह्मांकडून होत नाहीं. मामलतीवर दुसरे गृहस्थ जाजती बोलतात. याजकरितां सालमजकुरची रसद तुह्मीं दोन लक्ष रु।। भरणा करणें आणि कचा हिशोब सन तिसासमानीन पावेतों सरकारांत समजाऊन फडशा करून घेणें. या प्रमाणें होत असल्यास उत्तम आहे. नाहीं तरी, दुसरे मामलेदार बोलतात त्यास मामलत सांगून, घालमेल करावी लागेल. येविसीचें उत्तर सत्वर पाठवणें, ह्मणोन आज्ञा. ऐसीयासी, येथील सविस्तर वर्तमान व अजमास लिहोन राजश्री बाजी जगन्नाथ व अंताजी विश्वनाथ यांजकडे पाठविला आहे. सेवेसी श्रुत करितील. आम्हीं सरकारचे शिलकी सेवक. सरकारांत किफायत होत असतां नुकसानीची विनंति आम्हांकडून करवणार नाहीं. येथील वैवाट मनास आणून आज्ञा जाली पाहिजे. येथें तालुक्याची जमा थोडी खर्च भारी. याजमुळें किल्यांचे व स्वारसिबंदीसाहुकारांचे पेचांत आहों. दुसरें गृहस्थ जाजती बोलतात येविसी सेवकांनी विनंती कोणती करावी. सरकार मर्जी असेल त्याअन्वयें आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. सेवकास आज्ञा होईल त्या आज्ञेस ऊजूर नाही. हिसेब तयार जाले ते हुजूर दफ्तरांत पोहोंचलेच आहेत. अलीकडील सालें तयार जालीं तीं विजयादशमी जालियानंतर रवानगी करितों. राहिले हिशेबही निकडीनें तयार करऊन लवकरच हुजूर पावतील. आम्ही अशक्त याजमुळें हिशेब सरकारांत देऊन मागील फडशा करावा, हेच इच्छा आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३०४
श्री. १७१० भाद्रपद शुद्ध १०
सेवेसी महिपतराव कृष्ण सां नमस्कार विज्ञापना ता। छ ९ जिल्हेजपर्यंत आपले कृपेंकरून वर्तमान यथास्थित असें. विशेष. बहुत दिवस पत्र येऊन सांभाल होत नाहीं. तरी ऐसें नसावे. सर्वदा पत्रीं परामर्श करीत असले पाहिजे. दर्शनास बहुत दिवस जाहाले. प्रस्तुत श्रीची आज्ञाही जाहल्यांतच आहे. यास्तव दर्शनाचा बेत आहे. परंतु श्रीयोगेश्वरी कुळस्वामिणी आहे. तिचेंही दर्शन जन्मांत जाहालें नाहीं. याजकरितां तेथें जाऊन, तेथून जवळच श्रीवैद्यनाथ व श्रीनागनाथ दर्शन करून, सिंहस्थप्रयुक्त गंगास्नान करूं. चरण सन्निध यावें, हें मानस आहे. यास्तव विनंति लिहिली आहे. त्या प्रांतीं वणजा-यांचा वगैरे उपद्रव बहुत, याजमुळें एकटें जाण्याची सोय नाहीं, यास्तव शंभर राऊत आल्यास जाणें घडेल, हें जाणोन विनंति लिहिली आहे. तर कृपा करून स्वार पाठवावयाची आज्ञा जाहली पाहिजे. दीड दोन महिन्याचें काम आहे. यांत जसी मर्जी असेल तसे करीन. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असावा. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३०३.
श्रीगणपती. १७१० श्रावण वद्य ५.
अज स्वारी राजश्री परशराम रामचंद्र ता। मोकदम, मौजे चिकुर्डे, का। कोडोली, प्रा। पनाळा. सु।। तिसा. समानीन मया व अलफ, रा। बळवंतराव जिवाजी देशपांडे प्रा।–मा। याणीं विदित केलें की, नारायण आनंदराव देशपांडे प्रा। म।। हे आमचे भाऊबंद, आम्हास वतनाचा वांटा देत नाहींत, येविसी पेशजी श्रीमंत कैलासवासी नानासाहेब यांच्या वेळेस कैलासवासी हरी दामोदर याजकडे पंचाईत नेमून दिल्ही. तेथें निवाडा करून मशारनिलेनीं पत्रें दिल्हीं. पुढें हुजूर फडशा व्हावा, त्यास श्रीमंत नानासाहेब कैलासवासी जाले. पुढें दंगेच होत गेले. अलीकडे आपणापासीं येऊन पांच सात वर्षे वतनाचा विभाग ठेवावा म्हणोन विचारीत आलों. तेव्हां उभयतांनीं फिरून वादास जावें असें ठरलें. थलपत्रही लि।।. परंतु, नारायण आनंदराव वादास जावयासी निघत नाहींत. यास्तव, कृपा करून आमचा विभाग देवावा म्हणोन. त्याजवरून पाहतां, हे भाऊबंद खरे असोन, यांस विभाग देत नाहींत. श्रीमंत कैलासवासी नानासाहेब याणीं हरी दामोदर यांजकडे पंचाइतीस लाऊन दिल्हे. तेथें निवाडा जाला आहे. परंतु विभाग देत नाहींत. यास्तव हाली मौजे मा। येथील देशपांडपणाचा इनाम व हक्क वगैरे कानूबाब पेशजीपासून चालत असेल त्याप्रमाणें बळवंतराव जिवाजी याजकडे चालविणें जाणिजे. छ. १९ जिल्काद.