पत्रांक ३०९
श्री १७११ श्रावण वद्य २
सा। नमस्कार विज्ञापना ता। छ १ जिलकाद गुरुवार प्रहर दिवस पावेतों स्वामीचे कृपावलोकनेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. राजश्री अलिबाहार बाबाकडून सरकारच्या लखोट्याची थैली मेणकापडी एक आली. येतांच डाकेबरावर सेवेसी रवानगी केली असे. थैली पोहचल्यानंतरी सरकारचे लखोटे जे असतील ते सबनीस हुजूर प्रविष्ट करतील. मारवाडांत राज्याचे घरीं फितोर व सांप्रत वाटाडे सिकस्त जाले. ह्मणोन राजश्री बावाच्या फौजा मारवाडांत गेल्या. जैपूरवालाही सरंजाम सिद्ध करीत आहे. याप्रो जैपूराहून पत्रें आलीं त्यावरून विनविलें असे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.