पत्रांक ३०४
श्री. १७१० भाद्रपद शुद्ध १०
सेवेसी महिपतराव कृष्ण सां नमस्कार विज्ञापना ता। छ ९ जिल्हेजपर्यंत आपले कृपेंकरून वर्तमान यथास्थित असें. विशेष. बहुत दिवस पत्र येऊन सांभाल होत नाहीं. तरी ऐसें नसावे. सर्वदा पत्रीं परामर्श करीत असले पाहिजे. दर्शनास बहुत दिवस जाहाले. प्रस्तुत श्रीची आज्ञाही जाहल्यांतच आहे. यास्तव दर्शनाचा बेत आहे. परंतु श्रीयोगेश्वरी कुळस्वामिणी आहे. तिचेंही दर्शन जन्मांत जाहालें नाहीं. याजकरितां तेथें जाऊन, तेथून जवळच श्रीवैद्यनाथ व श्रीनागनाथ दर्शन करून, सिंहस्थप्रयुक्त गंगास्नान करूं. चरण सन्निध यावें, हें मानस आहे. यास्तव विनंति लिहिली आहे. त्या प्रांतीं वणजा-यांचा वगैरे उपद्रव बहुत, याजमुळें एकटें जाण्याची सोय नाहीं, यास्तव शंभर राऊत आल्यास जाणें घडेल, हें जाणोन विनंति लिहिली आहे. तर कृपा करून स्वार पाठवावयाची आज्ञा जाहली पाहिजे. दीड दोन महिन्याचें काम आहे. यांत जसी मर्जी असेल तसे करीन. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असावा. हे विज्ञापना.