पत्रांक ३०८
श्री. १७११ वैशाख शुद्ध १
सेवेसी रघुनाथ हरी कृतानेक सा नमस्कार विनंती येथील कुशल ता। वैशाख शु।। १ पावेतों स्वामीच्या कृपेंकरून यथास्थित असे. विशेष. सांप्रत, कृपापत्र येऊन सांभाळ होत नाहीं. तरी पत्र लिहावयाची आज्ञा केली पाहिजे. इकडील वर्तमान सालमलकुरी आफत पडली, त्यांत माघमासी गारा पडल्या, तेणेंकरून कांहींच आस्त राहिली नाहीं. गोसावी चाकर आहेत, यांची तनखा चढली आहे. पैशास ठिकाण नाहीं. यामुळें दूर करावयाचा विचार योजिला, तों दतियेकरांनीं गोसावी दूर होतात हें समजोन गीर्द झासी येथील मौजे भागोरगांव मारिला, माणसें जखमी केलीं, घरें जाळलीं, गुंरे वगैरे लुटून नेलीं, आणि आणखी उपद्रव करावयाच्या उद्योगास लागले. जमा जाला सा गोसावी मागती ठेवणें प्राप्त जालें. गोसावी यांस दरमहा रोजमरा पाहिजे. पैशास ठिकाण नाहीं. पैसा पेंच पडला आहे. रबींत अगदींच ठिकाण राहिलें नाहीं. मवास भारी याचें पारपत्य होतें तरी पैसा मिळता व सरकारची जागा सुटती. परंतु तो योग घडत नाहीं. मवासाचें दैव बलवत्तर यामुळें सरदारांस इच्छा होत नाहीं. आल्या दिवसापासून सरदारांस विनंति करितों. सांप्रत राजश्री आलिबहादर आले आहेत. त्यांजकडे विनंति करावयास कारकून पाठविले आहेत. ऐशास कृपा करून पाटीलबावास व अलिबहादर यांस ताकीदपत्रें पाठवावयाची आज्ञा करावी. मेहनेत विनंति करून पाहों. वरकड सरदारांकडील वर्तमान उभयतां सरदार मथुरेस आहेत. फौजा पुढें रवाना केल्या. मुलतानाकडे जाण्याचा मनसब आहे. घडेल तें पहावें. गुलामकादर याणें दिल्लीत बेकैद बहुत केली. त्याचे पारपत्यास आलीबहादर दिल्लीस गेले, तों गुलामकादर तेथून पलोन जाऊ लागला. त्याच्यामागें जाऊन, त्यास हस्तगत करून, मथुरेस आणून, शरीर छिन्नभिन्न करून, मारून टाकिला. मोटामल्ल ज्याच्या विद्यमानें ग्वालेर लुटली होती, तोही फितुरांत आढळला. ह्मणून त्यासही मारून टाकिलें. सांप्रत त्या प्रांती स्वस्थ आहे. वरकड सविस्तर राजश्री बाजी जगन्नाथ व अंताजी विश्वनाथ यांस लिहिले आहे. सेवेसी श्रुत करितील. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ कीजे हे विनंति.