पत्रांक ३१०
श्री १७११ श्रावण वद्य ७
पो छ २३ जिल्काद सन तिसैन श्रावण.
सेवेसी केसो महादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना. तार छ २१ जिल्काद परियेंत सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामींनी आज्ञापत्र पाठविलें तेथें आज्ञा कीं, रा। काकोबा वैद्य कोपरगांवीं पाठविले आहेत. त्यास काल दोनप्रहरीं पावले. श्रीमंत बाबासाहेब यांजला उतार पडला आहे. ओषधही घेत असतात. व श्रीमंत आपासाहेब यांचा मळेयांतून येत समई खाचेंत पाय गेला. तों लचक पोटांत बसली आहे. दुखतो. श्रीमंतास चांगला उतार पडत आला आहे. पेठ येवलें येथें सरकारचा जकातीचा अंमल व साइराचा आहे. त्यास होळकराकडील तुळाजी तावरा, पागा होळकराकडील घेऊन आले आहेत, त्यास पेठेंत कटकट होऊन लढाईचा प्रसंग मांडिला आहे. गांवांतील उदमी सावकार गांवांतून जाणार, मोकासीही सिबंदी ठेवीत आहेत. त्यास, पेशजीं करारमदार पुणियांतच होऊन आला असतां, आतां तुळाजी तावरे यांणी पागा व शिबंदी आणून सरकारचा अमल उठवावा असें आहे. त्यास, मामलेदारही सिबंदी ठेऊन कजिया करतील. परंतु, येथें सरकारची फौज असतां, लढाईचा प्रसंग नसावा. याजकरितां सेवेसी वर्तमान लिहिलें असे. मामलेदाराची कुमक करावयाची आशा जाहलियास, आज्ञेप्रमाणें वर्तणूक करीन. मध्येंच करावें, तरी आज्ञा नाहीं. याजकरितां सेवेसी विनंतिपत्र पाठविलें असे. तरी, स्वामीनीं आज्ञा करून पाठविलेंयासी आज्ञेप्रमाणें करितों. त्यांनीं निकडच केली तरी येथूनही कांहीं देतो. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.