पत्रांक ३११
श्री १७११ आश्विन शुद्ध ४
श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः-
विनंति सेवक बाळाजी महादेव चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कर विज्ञापना, ता। छ २ मोहरमपर्यंत स्वामीचें कृपावलोकनें तालुके सिवनेरचें व सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. सरकारचे आज्ञापत्र छ २४ जिलकादचें छ १ मोहरमी सादर जालें. तेथें आज्ञा कीं, हणमंता बिन चापाजी पाटील टिलेकर मोकदम मौजे कुलसेत तर्फ हवेली प्रांत जुन्नर यानें हुजूर विदित केलें कीं, मौजे मजकुरीं पाटिलकीचीं सेतें माझीं आहेत त्यास, रघु डोक्या व संतु डोक्या व त्रिंबक डोक्या, मौजे मजकूर, हे तिघे जण आपलीं सेतें असें बोलून आपल्यासीं कज्या करून सेतास खलेल करितात व मौजे मजकुरीं आपली जागा आहे त्या जाग्यावर डोके घर बांधूं लागले. ते समई त्यास द्वाही दिल्ही असतां जबरदस्तीनें माझे जाग्यावर घर बांधले. याजकरितां डोके यास हुजुर आणून मनास आणावयाची आज्ञा जाली पाहिजे. ह्मणोन, त्याजवरून, हें पत्र तुह्मांस सादर केलें असे. तरी येविसीचें वर्तमान मनास आणावें लागतें. सबब, डोके तीन असामी हुजूर आणविले आहेत. त्यास व तुह्मी आपले कडील कारकून माहीतगार व बाजी कानदेव यांसी हुजुर पाठवून देणें. ह्मणोन त्याजवरून डोके असामी तीन यासी पाठविले आहेत. परंतु हणमंत पाटील याजपासीं डोके घरठाणेयाचा व सेताचा कजिया सांगतात. त्यास, हरदूजणाचें वर्तमान मनास आणून फडशा करावयासी जमीदार व भोवरगांवचे गोत असावे. ते मौजे मजकुरीं जाऊन सेतें व घरठाणा पाहून फडशा करितील. यास्तव, हणमंता पाटील यासी आज्ञा होऊन मजकडे आला ह्मणजे जमीनदार व भोवरगांवचे गोत जमा करून, त्यांचे विचारें ठरेल त्याप्रमाणें फडशा पाडीन. वरकड, डोक्यांस तिही असामी मिळोन तीस रुपये मसाला जाला आहे. त्यास कुळंब्यावर तिही सालाची आफती पडली, याजमुळें अन्न खावयासी नाहीं. उपासी मरतात. ढालाईतांनी बहुत निकड केली. परंतु त्याजपासीं पैसा निर्माण न होये. तेव्हां तीस रुपये मी दिल्हे आहेत. त्यास, मसाला माफ होऊन ढालाईतांनीं सदहूं तीस रुपये घेतले आहेत ते माघारे द्यावयाची आज्ञा जाली पाहिजे. तुलमसेत हा गांव स्वामीनीं कृपाळू होऊन मजला इनाम करून दिल्हा आहे. परंतु टिळेकराचा काच रात्रंदिवस सोसवत नाहीं. येविसीची विनंति पूर्वी स्वामीपासीं समक्ष केली आहे. वरकड, मौजेमजकुरीं एक मूल डोकेयाचें. तेथील पाटीलकी वगैरे अधिकार त्याचे होते. परंतु प्रसंगानुरूप पाटीलकी मोंगलांनी घेतली आणि त्यांणी सरकारांत दिल्ही. याचा पाल्हाळ पाहतां बहुतच आहे, तो पत्रीं कोठवर ल्याहावा ? प्रस्तुत, टिळेकर * सरकारची खिजमतगार ममतेचा. त्याजपासीं या कुळंब्यांनीं भांडोन परिणाम लागणें, हे समजलेंच आहे. यास्तव, हणमंत टिळेकरास मीही येथून आणायवासी पाठविलें आहे. तो स्वामीची आज्ञा घ्यावयास येईल. त्यास आज्ञा होऊन, येथें येई तें करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.