पत्रांक ३०३.
श्रीगणपती. १७१० श्रावण वद्य ५.
अज स्वारी राजश्री परशराम रामचंद्र ता। मोकदम, मौजे चिकुर्डे, का। कोडोली, प्रा। पनाळा. सु।। तिसा. समानीन मया व अलफ, रा। बळवंतराव जिवाजी देशपांडे प्रा।–मा। याणीं विदित केलें की, नारायण आनंदराव देशपांडे प्रा। म।। हे आमचे भाऊबंद, आम्हास वतनाचा वांटा देत नाहींत, येविसी पेशजी श्रीमंत कैलासवासी नानासाहेब यांच्या वेळेस कैलासवासी हरी दामोदर याजकडे पंचाईत नेमून दिल्ही. तेथें निवाडा करून मशारनिलेनीं पत्रें दिल्हीं. पुढें हुजूर फडशा व्हावा, त्यास श्रीमंत नानासाहेब कैलासवासी जाले. पुढें दंगेच होत गेले. अलीकडे आपणापासीं येऊन पांच सात वर्षे वतनाचा विभाग ठेवावा म्हणोन विचारीत आलों. तेव्हां उभयतांनीं फिरून वादास जावें असें ठरलें. थलपत्रही लि।।. परंतु, नारायण आनंदराव वादास जावयासी निघत नाहींत. यास्तव, कृपा करून आमचा विभाग देवावा म्हणोन. त्याजवरून पाहतां, हे भाऊबंद खरे असोन, यांस विभाग देत नाहींत. श्रीमंत कैलासवासी नानासाहेब याणीं हरी दामोदर यांजकडे पंचाइतीस लाऊन दिल्हे. तेथें निवाडा जाला आहे. परंतु विभाग देत नाहींत. यास्तव हाली मौजे मा। येथील देशपांडपणाचा इनाम व हक्क वगैरे कानूबाब पेशजीपासून चालत असेल त्याप्रमाणें बळवंतराव जिवाजी याजकडे चालविणें जाणिजे. छ. १९ जिल्काद.