Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

प्रस्तावना 

१७३४ च्या जुलैच्या सुमाराला संभाजी आंग्र्यावर आभाळ कोसळतें की काय अशी स्थिति झाली म्हणून लेखांक ३४० त लक्ष्मीबाई आंग्रे लिहिते त्यावरून मानाजीने संभाजीवर बरेच काहूर आणिलें होतें हें स्पष्ट आहे. मानाजी पळून गेल्यावर संभाजी विजयदुर्गाकडे निघून गेला. इतक्यांत मानाजीने हल्ला करून कुलाबा काबीज केला. हे वर्तमान ऐकतांच संभाजी आपल्या सर्व आरमारासह कुलाब्यावर धांवून आला (खंड ४, पेशव्यांची बखर, पृ. ४१). ते समयीं मानाजी आंग्रे यानें बाजीरावास कुमक करण्याविषयीं निकडीचीं पत्रें पाठविलीं. संभाजीचा स्वभाव त-हेवाईक पडल्यामुळे तो बाजीरावास, ब्रह्मेंद्रस्वामीस व शाहूराजास अत्यंत अप्रिय झालेला होता. आपल्या पश्चात् अंजनवेल वगैरे ठाणीं सर करण्याचे काम संभाजीच्या हातून झाले नाहीं ह्यामुळे बाजीरावाचा राग संभाजीवर होता. १७३४ च्या पावसाळ्यात ब्रह्मेंद्रस्वामी कोंकणात गेला असतां त्याची पासोडी, बंदूक व निशाण संभाजीनें थट्टेनें किंवा अपमान करण्याच्या हेतूनें हिसकावून घेतल्यामुळें स्वामीचाही क्रोध संभाजीवर विशेष झाला होता (पा. ब्र. च. ले. ३१३) व मानाजीशीं भांडून थळची चौबुजीं शामळाच्या हातीं जाऊ दिल्याबद्दल शाहूराजाची इतराजी त्याजवर झाली होती (काव्येतिहाससंग्रह, ले. ११९). शिवाय, संभाजी व मानाजी ह्या दोघांमधील वैमनस्य वाढवून आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न इंग्रेज व फिरंगी ह्यांनीं चालविलाच होता. संभाजीच्या आरमाराचें भय इंग्रेजांना इतके कांहीं झाले होतें कीं, आंग्र्यांच्या कुलांत गृहकलह वाढवून, त्याची शक्ति कमी करण्याचाच उपाय इंग्रेजांना योजणे भाग पडलें. अंजनवेल व गोवळकोट हे दोन किल्ले शामळाचे घ्यावयाचे राहिले होते. शामळाला इंग्रेजाची पाण्यातून मदत होत असल्याकारणानें व संभाजी व मानाजी ह्यांच्यांतील वैमनस्य वाढत चालल्याकारणानें, अंजनवेल व गोवळकोट एका सबंध वर्षांतहि मराठ्यांच्या हातीं पडलीं नाहींत तशांत थळची चौबुजींही शामळांनी मध्येच पटकाविलीं. ही अशी पिच्छेहाट होत आहे असें पाहून, मानाजीच्या विनवणीवरून व वस्तुस्थितीच्या निकडीवरून बाजीराव १७३५ त कोंकणांत उतरला. बाजीराव येण्याच्या पूर्वी १७३५ च्या जानेवारींत अंजनवेल मराठ्यांच्या ताब्यांत आली. १७३४ च्या प्रारंभी उदाजी पवारानें सिद्दी अंबर अफवानी ह्याचा पराभव व शिरच्छेद रायगडाखालीं वाडीपाचाड येथें केला (पा. ब्र. च. ले. २७८) ह्या पलीकडे १७३४ च्या सबंध सालांत मराठ्यांच्या हातून विशेष कांहींएक झालें नाही. संभाजीचें व मानाजीचें वाकडें असल्यामुळें व मानाजीच्या हातांतील आरमाराचा उपयोग इंग्रेज व फिरंगी ह्यांना बंद करण्याकडे होत नसल्यामुळें, अंजनवेल मराठ्यांच्या ताब्यांत हा वेळपर्यंत आली नाहीं. बाजीराव आपल्या साहाय्यास येणार असें कळल्याबरोबर मानाजीनें अंजनवेल घेण्याची खटपट केली व त्यांत वर सांगितल्याप्रमाणें त्यास यश आलें. इतक्यांत १७३५ च्या फेब्रुवारींत बाजीराव कोंकणांत येऊन पोहोंचला. बाजीराव १७३५ च्या फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत कोंकणांत होता. तेवढ्या अवधींत राजमाची, कुलाबा, खांदेरी, कोहाळ वगैरे किल्ले मानाजीच्या हस्तें घेववून बाजीरावानें संभाजीचा अगदीं पाणउतारा करून सोडला व मानाजीशीं तह करून राजमाची वगैरे ठाणीं सरकारांत घेतली. मानाजीस वजारतमाब असा किताब देऊन व संभाजीस सरखेलीचें पद कायम करून ह्या दोघां भावांमधील तंटा बाजीरावानें मिटविल्यासारखें केलें. मानाजीला कुलाब्याचें ठाणें देऊन व संभाजीस विजयदुर्गास स्थापून कोंकणांत स्वस्थता उत्पन्न करण्याचा प्रयत्न बाजीरावानें केला. मानाजी व संभाजी यांमधील हा तह अलीबागेजवळील नवदरें या ठिकाणी झाला (शकावली, पृ. ७२). मानाजीला प्रोत्साहन देण्यास व संभाजीची रग जिरविण्यास ब्रह्मेंद्रस्वामीच कारण झाला. “कुलाब्यास जाऊन, तेथील बंदोबस्त वरकडही जे कार्य होणें असेल तें होईल.” हे वाक्य पारसनिसांनी छापिलेल्या ब्रह्मेंद्रस्वामीच्या १३० व्या पत्रांत आहे. वरकड कार्य म्हणजे संभाजीची खोड मोडण्याचें कार्य. पारसनीस यांनी ह्या १३० व्या पत्राची तारीख १३ जानेवारी १७३७ दिली आहे. खरी तारीख ५ फेब्रुवारी १७३५ आहे.

प्रस्तावना 

११ १७३३ च्या डिसेंबरांत अबदुल रहिमान याची जंजि-यांत यद्यपि स्थापना झाली, तत्रापि सिद्दी अंबर, सिद्दी संबूल, व सिद्दी सात ह्या मंडळीनीं अंजनवेल, गोवळकोट वगैरे ठाणीं लढविण्याचा उपक्रम सोडिला नाहीं. हा कालपर्यंत जंजिरा म्हणजे मराठ्यांना मोठें दुरधिगम्य स्थल वाटत असें. तो भ्रम मोडण्याचें महत्कृत्य करून, मोहिमेचे बाकीचें सटरफटर काम बाजीरावानें पूर्वीप्रमाणें इतर सरदारांच्या अंगावर टाकून दिलें व साता-यास जातांना चेऊलास १७३४ च्या ४ जानेवारीस आंग्र्यांची स्थापना केलीं (रोजनिशी, रकाना १४२). १७३३ च्या सप्टेंबरातं उंदेरीस इंग्रजांशीं लढत असतां सेखोजी आंग्रे एकाएकी मृत्यू पावला (रोजनिशी, रकाना ६१). सेखोजी आंग्र्यांनंतर संभाजी आंग्र्याला सरखेलीचें पद प्राप्त झालें. सेखोजी जिवंत असताना, संभाजीला सेखोजीच्या विरुद्ध जाण्याचा उपदेश करून व त्याची नाना प्रकारें मनधरणीं करून ब्रह्मेंद्रस्वामीनें सेखोजीर्चे पारडें फारसें जड़ होऊ दिले नाहीं. सेखोजी वारल्यानंतर-सेखोजी आपल्या अभिश्रापानें वारला असें स्वामी वारंवार म्हणत असे (पा ब्र. च. पृ. ३०२)- संभाजी आपल्या धोरणानें चालेल अशी स्वामीला आशा होती. परंतु स्वामीची ही आशा लवकरच खोटीं ठरली. ब्रह्मेंद्राने सेखोजीकडून अंतप्रभूला काढून कृष्णंभटाला देशमुखी, वारंवार दपटशा व अभिश्राप देऊन एकदाची कशी तरी देवविली होती. हा देशमुखीचा कागद अमलांत येणार इतक्यात सेखोजी आंग्रे वारला तेव्हा सेखोजीनें दिलेला हुकूम अमलांत आणण्यास स्वामीनें संभाजीला पत्र लिहिलें. संभाजीनें या पत्राचा सत्कार निराळ्याच प्रकारानें केला. कान्होजीनें अंतप्रभूस देशमुखी दिली होती, ती सेखोजीनें स्वामीच्या आग्रहास्तव कृष्णंभटास दिली, परंतु खरें पाहिलें तर, अंतप्रभूची देशमुखी खरी, तेव्हां कान्होजीनें दिलेला निकाल अमलांत आणावा व सेखोजीचा निकाल रद्द करावा असा आपला हेतू आहे, असें संभाजीनें स्वामीस उत्तर पाठविलें (खंड ३, ले २९०). शेवटीं स्वामीचा कोप अगदीं उतास जातो असा प्रसंग बेतल्यावर कृष्णंभटास निम्मी देशमुखी मोठ्या मिनतवारीनें मिळाली (खंड ३, ले. ३४०). “संभूने जयसिंगाचा शिक्का लटका केला, तरी देव त्याला बघून घेईल,” असे उद्गार ब्रह्मेंद्रानें यावेळीं काढिले आहेत (पा. ब्र. च. पृ. ३०३). बाजीराव साता-यास निघून गेल्यावर, संभाजीनें अंजनवेलोस मोर्चे लाविले (रोजनिशी, रकाना ६२). अंजनवेलीस मोर्चे लावण्याच्या कामांत बहुत दिवस जाणार हें ओळखून, संभाजीनें कुलाब्यास घरची व्यवस्था पाहण्यास आपले भाऊ धोंडजी व मानाजी यास ठेवून दिले. धोंडजीकडे प्रांताची व्यवस्था पाहण्याचें काम नेमून दिलें व मानाजीस कुलाब्याच्या आरमाराचा अधिकार सांगितला (काव्येतिहाससंग्रह, ले. ११९). ही व्यवस्था चार सहा महिने चालली नाहीं तों संभाजी आंग्रे व मानाजी आंग्रे ह्यांच्यांत तेढ उत्पन्न झाली. कारभारसंबंधे नानाप्रकारचे आरोप ठेवून, संभाजीने धोंडजीस कुलाब्याच्या बाहेर काढून दिलें व मानाजीस दुरुक्तीचें भाषण करून जीवन्मुक्त करण्याचा विचार केला. मानाजी आंग्रे ब्रह्मेंद्रस्वामीच्या व बाजीरायाच्या वतीचा आहे, तो आपल्याविरुद्ध राजकारण करतो, अशा प्रकारचे संशय संभाजीच्या पोटांत येऊ लागल्यामुळें, संभाजीचें वर्तन हें असें एक प्रकारचें झालें होतें. कुलाब्यांत राहून आपला जीव सुरक्षित नाहीं, हें जाणून मानाजी रेवदंड्यास फिरंण्याग्यांच्या आश्रयाला गेला व तेथेंच कांही दिवस स्वस्थ राहिला.

प्रस्तावना 

सिद्दी संबूल व सिद्दी अंबर अफलानी हे दोघे खुद्द जंजि-यात होते. अंजनवेल, उंदेरी, विजयगड, गोवळकोट, मंडणगड व रायगड वगैरे सर्व गड कडेकोट तयारी करून मराठ्यांशीं सामना देण्यास सिद्ध झाले. शेखजीने बाजीरावास जंजि-यांत प्रवेश करण्यास खोकरीची वाट दाखविली. एवढें एक काम केल्यावर, पुढें चार महिने कोणतेंही काम आपल्या हातून होणार नाहीं असा शेखजीनें मध्येच बहाणा केला. हा बहाणा स्वतःचे महत्त्व वाढविण्याच्या इच्छेने केलेला असो, अगर प्रतिनिधि वगैरेच्या चिथावणीवरून केलेला असो, बाजीरावानें हाती घेतलेलें काम तडक चालविलें. १७३३ च्या २५ मे ला मंडणगड सर झाला. याच महिन्यांत बिरवाडी, अष्टमी, अश्राधार, आंतोणे, नागाठणें, तळें, घोसाळें, निजामपूर वगैरे महालांतही अंमल बसला. श्रीपतराव प्रतिनिधीने १७३३ च्या ८ जूनास रायगड किल्ला घेतला. येणेप्रमाणें हबशाचें एक एक ठाणें सर होत होत, १७३३ च्या २२ आगस्टास, जंजिरा व अंजनवेल ह्याखेरीज बहुतेक सर्व ठाणीं बाजीरावाच्या ताब्यांत आलीं (रोजनिशी, रकाना ५९) जंजि-यांतील हबशांपैकीं सिद्दी रहीण यानें खुद्द बाजीरावाशीं जंजि-याच्या बाहेर येऊन सामाना केला; परंतु त्यातच तो ठार झाला (शकावली, पृष्ठ ६८) बाजीरावानें खुषकीवरून मोर्चे लावून जंजि-यावर तोफाचा मार चालविला व मानाजीनें समुद्रांतून बरीच मारगिरी केली. जंजि-यांतील हबशास सुरतेच्या सिद्दी मसुदाकडून व मुंबईच्या इंग्रजांकडून मदत मिळत होती, तीहि ह्याच सुमारास बंद झाली. ही बाहेरची मदत बंद झाल्याबरोबर सिद्दी अंबर, सिद्दी संबूल वगैरे जंजि-यांतील हबशीं अंजनवेल, गोवळकट वगैरे ठिकाणी पळून गेले व जंजिरा अबदुल रहिमान ह्याच्या तर्फेने बाजीरावाच्या ताब्यांत आला. अबदुल रहिमान ह्याला ५।। महालांचा वसूल देण्याचा व त्याच्याकडून रायगड, तुळे, घोसाळे, अवचितगड आणि बीरवाडी हे केल्ले मराठ्यांनी घेण्याचा संकेत ठरला. १७३३ च्या डिसेंबरांत ही अशी व्यवस्था करून बाजीराव साता-यास परत आला. 'सिद्दी अबदुल रहिमान हा तह करणप्यास सिद्ध झाला, जंजिरा हस्तगत झाला नाहीं' वगैरे वाक्यांचा प्रयोग राजश्री पारसनीस यांनीं ब्रहोंद्र स्वामीच्या चरित्रांत केला आहे. त्यावरून अबदुल रहिमान हा बाजीरावाचे म्हणणें हा वेळपर्यंत मान्य करीत नव्हता असा मतलब रा. पारसनीस यांच्या लिहिण्यांत दिसून येतो. परंतु तो मतलब गैरसमजुतीचा आहे. अबदुल रहिमान हा बाजीरावाच्या बाजूला पहिल्यापासूनच होता व त्याच्याशी जर्विस म्हणतो त्याप्रमाणें १७३३ च्या फेब्रुवारींत, १७३३ च्या डिसेंबरांत व १७३६ त झालेल्या तहाचीं कलमें आधींच करार करून ठेविलेलीं होतीं. १७३३ च्या ६ फेब्रुवारीस अबदुल रहिमान ह्याच्याशीं तह झाला असें जर्विस म्हणतो तें रा. पारसनीस यांस संशयात्मक दिसतें, परंतु हा संशय निर्मूल आहे, हें वरील हकीकतीवरून स्पष्ट आहे. रा. पारसनीस यांनी ह्या जंजिरेप्रकरणाची जी हकीकत दिली आहे ती बहुतेक चुकलेली आहे, व ती हकीकत देतांना जीं पत्रें त्यांनीं 'ग्रथमालें' तून नमूद केलीं आहेत तींही अयोग्य स्थलीं केलीं आहेत. कालाचें पौर्वांपर्य ध्यानांत धरून हकीकत लिहिली तरच ती बरोबर येते ही गोष्ट विसरून ह्या प्रकरणाची एक बखर त्यांनीं तयार केली आहे. उदाहरणार्थ, प्रतिनिधि व सिद्दी सात ह्याची भेट काशी बंदरावर १७३२ च्या २८ एप्रिलास झाली होती ती १७३० त झाली असे रा. पारसनीस समजतात. शेखजीला १७३० त फोडिलें असें रा. पारसनीस लिहितात; परंतु तशी गोष्ट नसून हा मनुष्य १७३३ त मराठ्यांना वश झाला. हबशी प्रकरण १७३० पासून १७३६ पर्यंत चाललें होतें असें चरित्रकारांचे म्हणणें आहे. खरें पाहिलें तर हे प्रकरण १७२६ पासूनच सुरू झालें होतें. बाजीराव १७३५ त कोंकणात उतरला, १७३३ त गोवळकोटास प्रतिनिधीचा पराभव झाला, वगैरे भाकड हकीकत ग्रांट डफनें आपल्या बखरीं दिली आहे, ती चुकली आहे, हें आतापर्यंत दिलेल्या वर्णनावरून उघड आहे. कान्होजीला पांच मुलगे होते वगैरे हकीकत ग्रांट डफ व पारसनीस देतात, परंतु तींतही बिलकुल तात्पर्य नाहीं.

प्रस्तावना 

त्या सर्व लढायांत कान्होजी आंग्र्यांच्या कारकीर्दीत १७२६ त जी लढाई सुरू झाली व जी चालूं असतां ब्रह्मेंद्रस्वामीची कोंकणातून उचलबांगडी झाली ती विशेष प्रख्यात आहे. ही लढाई १७२६ त सुरूं होऊन, १७३३ च्या फेब्रुवारींत तर ऐन रंगात येत चालली होतीं. सात वर्षे सारखे लढून सिद्दी रसूल पादाक्रांत होण्याचीं चिन्हें बिलकुल दिसेनात. कान्होजी आंग्रे, सेखोजी आंग्रे, संभाजी आंग्रे, बकाजी नाईक महाडीक, श्रीपतराव प्रतिनिधि, जिवाजी खंडेराव चिटणीस, यशवंतराव महादेवं, पिलाजी जाधवराव, वगैरे अनेक दुय्यम प्रतीच्या माणसांनी सिद्दयाची रग जिरविण्याची वेळोवेळ खटपट केली. परंतु एकाचें मत दुस-याला पसंत नसल्यामुळें, ह्यांपैकीं एकालाहि म्हणण्यासारखें यश कधीच आलें नाहीं सिद्दी सात, सिद्दी अंबर, सिद्दी संबूल, सिद्दी याकूब, सिद्दी बिलाल, सिद्दी मसूद वगैरे जंजिरेकर सिद्दयांच्या स्नेह्मांनीं व सुभेदारांनीं मराठ्यांचे बहुतेक प्रयत्न निष्फळ करून टाकिले व कोंकणांतील हिंदू लोकांना भ्रष्ट करण्याचा तडाका चालविला. सात वर्षे लढून ह्या लहान माणसांच्या हातून कार्यसिद्धि लवकर होण्याचीं चिन्हें दिसत नाहीत असें पाहून शाहूराजानें बाजीराव बल्लाळाला १७३३ च्या प्रारंभी जंजि-यावरील मोहीम हातीं घेण्याचा हुकूम केला. बाजीरावाच्या सद्दीचा जोर विशेष म्हणा किंवा जंजिरेकर हबशाचे दैव फिरलें म्हणा, जंजि-यावर स्वारी करण्याचा बाजीरावाला हुकूम होण्याला व सिद्दी रसूल याकूदखान मरण्याला एकच गांठ पडली. सिद्दी रसूल याकूदखान पिढीजाद मालक असल्यामुळें व सिद्दी सात, अंबर, संबूल, याकूब वगैरे सुभेदार त्यानेंच नेमिले असल्यामुळें त्याच्या हयातींत ह्या सरदारांत परस्पर उघडपणे विरोध करण्यास कोणीहि धजला नाहीं. सिद्दी रसूल संपल्यावर मात्र, परस्परविरोधास उघडपणें बाहेर येण्यास जागा झाली. सिद्दी रसूल याच्या सरदारांपैकी, गुहाघर येथील बाटलेला पाटील याकूबखान ऊर्फ शेखजीं याचें व सिद्दी रसूल याचें पूर्वीपासूनच चित्त शुद्ध नव्हतें (खंड ४ था, पेशव्यांची बखर, पृष्ठ ३९). सिद्दी रसूलाच्या मृत्यूनंतर, शेखजीची द्रोहबुद्धि विकास पावून, त्याचें व बाकीच्या सरदारांचें वाकडें आलें. सिद्दी रसूलाचा वडील मुलगा सिद्दी अबदल्ला शेखजीच्या बाजूचा होता, ही गोष्ट इतर सरदारांस न आवडून, त्यांनी बाजीराव राजपुरीला येण्याच्या दिवशींच सिद्दी अबदल्ला यास ठार केलें (काव्येतिहाससंग्रह, पत्र १६६). सिद्दी रसूल याचा दुसरा एक मुलगा आपल्या बापाच्या प्रेताचे दफन करण्यास फेब्रुवारींत जंजि-यातून दंडाराजपुरीस आला होता तो आपल्या वडील भावाची ती दुवार्ता ऐकून राजपुरीसच राहिला. ह्या मुलाला म्हणजे अबदुल रहिमान याला यशवंतराव महादेव यांणीं वश करून ठेविला होता. हें वर्तमान शेखजीस कळतांच तोहीं अबदुल रहिमानास येऊन मिळालां. पंतप्रतिनिधि यांनी शेखजीस अगोदर फितविले होतेंच. तशांत खाशांपैकीं एक मुलगा आपल्या पक्षाला मिळालेला पाहून शेखजीला जास्तच हुरूप आला व त्यानें बाजीरावास हरएक प्रकारची मदत करण्याचा पत्कर घेतला. इकडे जंजि-यांतील सरदारांनीं सिद्दी रसुलाच्या सिद्दी हसन नावाच्या मुलास गादीवर बसविलें, व मराठ्यांशी टक्कर देण्याची तयारी केली. येणेंप्रमाणें हबसाणांतील हबशांत दोन परस्परविरुद्ध तट उत्पन्न झाल्यामुळें बाजीरावाचें काम बरेंच सोपें झालें.

प्रस्तावना 

१० इतक्यांत १७३२ चा पावसाळा संपून कोकणांतील मोहीम करण्याचे दिवस बरेच लोटले. शाहूमहाराजांना तर शामळाचें पारपत्य करण्याची बेसुमार उत्कंठा लागून राहिली. केवळ आंग्र्यांच्या किंवा प्रतिनिधीच्या हातून ही कामगिरी उलगडून येईल असा रंग दिसेना. तेव्हां शाहूनें बाजीरावाला व फतेसिंग भोसल्याला कोंकणच्या मोहिमेवर जाण्यास आज्ञा केली. ते १७३३ च्या एप्रिलांत कोंकणांत उतरले. बाजीराव बल्लाळ कोंकणांत उतरल्याबरोबर तीन वर्षे खितपत पडलेल्या ह्या मोहिमेच्या मंदगतीस आळा पडून, शत्रूला तंबी पोंहोचविण्याचे काम जारीनें सुरू झालें. रायगड, मंडणगड, विजयगड, गोवळकोट, अंजनवेल, उंदेरी व जंजिरा अशीं मोठमोठी बिकट स्थळें शामळाच्या हातांत होतीं (काव्येतिहाससंग्रह, पत्रे, यादी वगैरे १६६). त्या सर्वांवर एकदम हल्ला करण्याचा बाजीरावाने बेत केला. उंदेरीवर व इंग्रजांवर सेखोजी आंग्र्यांस पाठविलें (रोजनिशी, रकाना ६१). बाणकोट व मंडणगड ह्यांच्यावर बकाजी नाइकास धाडिलें (पा. ब्र. च. ले. २०३) प्रतिनिधित्व आनंदराव सोमवंशी ह्यांच्याकडे अंजनवेलीची कामगिरी सोंपविली (रोजनिशी, रकाने ५९ व ६०) व स्वतः बाजीराव व फत्तेसिंग शामळाच्या जंजि-याला शह देऊन बसले (रोजनिशी, रकाना ५९) ह्यावेळी जंजि-याच्या आंतील खानजाद्यांची स्थिति फारच विचित्र झाली होती. बाजीराव कोंकणांत उतरण्याच्यापूर्वी जंजि-याचा मुख्य सिद्दी रसूल याकूदखान १७३३ च्या फेब्रुवारींत मरण पावला होता. सिद्दी रसूल याकूबखान याचे पूर्वज, अहमदनगर येथील निजामशाही पातशहांच्या वेळेस आफ्रिकाखंडांतील इजिप्त देशाच्या आग्येयांस सोमाली लोकांचा देश आहे तेथून अरबी समुद्रांतून कोंकणच्या किना-यावर आले व कालान्तरानें दंडाराजपुरीजवळील जंजि-याचे अधिपति झाले. हे जंजि-याचे अधिकारी इजिप्त देशाच्या जवळून आले म्हणून त्यांस हबशी अशी संज्ञा प्राप्त झाली, ते आफ्रिकेंतून आले म्हणून त्यांस सिद्दी असे नांव मिळाले, व त्यांचा मूळ देश सोमाली लँड, अथवा सामल किंवा शामळ देश असल्यामुळे त्यास शामळ ह्या नांवानें मराठे लोक ओळखूं लागले. येणेंप्रमाणें हबशी, सिद्दी व शामळ ह्या तीन नांवांनीं ते दर्यावर्दी लोक कोंकणांत नांवाजले गेले. अहमदनगरची पातशाही अस्तंगत झाल्यावर जंजिरेकर सिद्दी दिल्ली येथील चकत्यांच्या पातशाहीचे मांडलिक बनले व औरंगजेबाच्या कारकीर्दीत सिद्दी रसूल ह्याचा पूर्वज सिद्दी कासीम यास याकूदखान हा किताब मिळाला. १७०६ त सिद्दी कासीम याकूदखान मरण पावल्यावर त्याच्या पश्चात् सिद्दी रसूल याकूदखान गादीवर आला. ह्या सिद्दी रसूलानें १७३३ च्या फेब्रुवारीपर्यंत राज्य केलें. ह्याच्या कारकीर्दीत मराठ्यांशीं हमेशा लढाया चालूच होत्या.

प्रस्तावना 

९ १७३२ तील ह्या कोंकणातील मोहिमेच्या वृत्तांतावरून, प्रतिनिधीच्या हातून शामळास तंबी पोहोंचणें शक्य नाही, हें शाहूमहाराजास पक्कें कळून चुकलें. सेखोजी आंग्रे व बकाजी नाईक महाडीक यांचें व प्रतिनिधीचे सौरस्य नसल्यामुळे त्यांच्याहि हातून तें काम होऊन येईल अशी शाहूंची खात्री नव्हतीं. ती गोवळकोटची मसलत फसल्यामुळें, प्रतिनिधीच्याच कर्तृत्वशून्यतेचा तेवढा अंदाज शाहूस करतां आला असें नाही, तर आंग्र्यांच्या संबंधींहि त्यांच्या मनांत विकल्प आले. राजाच्या मनांत आंग्र्यासंबंधीं विकल्प यावा हाच ब्रह्मेंद्रस्वामीचा हेतू होता. अप्रत्यक्ष रीतीनें हा हेतु साध्य होत असतां सेखोजीच्या मनांत बाजीरावाच्या विरुद्ध भावना उत्पन्न करण्याचा स्वामीनें प्रयत्न केला. तळेगावकर दाभाडे व सेखोजी आंग्रे यांचा शरीरसंबंध पूर्वापरचा होता. १७३१ च्या एप्रिलांत त्रिंबकराव दाभाड्यास बाजीरावानें लढाईंत मारलें असता, स्वामीनें ती बातमी ताबडतोब सेखोजीस कळविली व “मारत्याची सर्व पृथ्वी आहे” म्हणून एक दुःखप्रदर्शक व निंदात्मक वाक्य जाता जाता सहज पत्रात नमून करून ठेविलें (खंड ३ लेखांक २४९). आपण लिहिलेलें वाक्य वाचून सेखोजीच्या मनांत काय भावना होते व बाजीरावाविषयीं तो काय उद्गार काढतो हें काढून घेण्याचा स्वामीचा विचार होता. “स्वामींनीं जो प्रकार लिहिला तो उचितच! त्रिंबकराउ निधन पावले हे गोष्टी भावी अर्थानुरूप जाहली!” अशा अर्थाचें पत्र सेखोजीनें स्वामीस लिहिले. झाला प्रकार तो केवळ निंद्य होय, विरुद्ध बाजूच्या सर्व सरदारांना जमीनदोस्त करण्याचा बाजीरावाचा विचार आहे, हा ध्वनि सेखोजीच्या ह्मा लिहिण्यापासून व्यक्त होतो. सेखोजीनें असेंच लिहावें, असा स्वामीचा मनोदय होता. येणेंप्रमाणें हें लिहिणें बाजीरावास दाखवून त्याच्या मनांत सेखोजीच्याविषयी विकल्प आणण्याची स्वामीची मसलत पूर्णपणें तडीस गेली. सेखोजीचे आपल्याविषयीं खरें मत काय आहे, हे स्वामीच्या द्वारां कळून आल्यामुळें, बाजीरावानें आंग्र्यांशीं अत्यंत कुटिलपणाचें वर्तन ठेविलें. १७३२ च्या जानेवारींत भेट झाली तेव्हां वरकांती पूर्ण सौरस्य ठेवून, बाजीरावानें सेखोजीस प्रतिनिधीच्या विरुद्ध वागण्याची सल्ला दिली. ही सल्ला अमलांत आणिल्यामुळें शाहूराजाच्या मनांत सेखोजीविषयी विकल्प कसा आला हें मागें नमूद केलेंच आहे. ह्या अशा कपट नाटकानें सेखोजींविषयीं शाहूच्या व बाजीरावाच्या मनांत विकल्प उत्पन्न केल्यावर सेखोजीला छळण्याचे स्वामीने निराळेच खासगी उपाय योजिले. (१) दत्ताजी कनोजा म्हणून सेखोजीच्या अप्रीतींतील एक माणूस होता. त्याला पुन्हां नोकरीवर ठेवावयास सेखोजीस हुकूम केला व संभाजीस दत्ताजी कनोजाचा कड घेण्यास सांगितलें. (२) असोले येथील देशमुखी कृष्णंभट देसाई म्हणून स्वामींच्या प्रीतींतील मनुष्य होता त्यास देण्यास सागितली. (पा. ब्र. च. ले. ३२८; खंड ३, लेखांक २५४) व संभाजीस कृष्णंभटाचा पक्ष उचलण्याचा आग्रह केला (खंड ३, लेखांक २६५). (३) शंकरभट उपाध्या मुरूडकर ह्याची महाजनकी बापू बागलास द्यावी असा स्वामीनें हट्ट धरिला (पा. ब्रा. च. ले. ३२८). (४) गोठणें येथील खाजणांतील शेतास इस्तावा वीस वर्षे माफ करावा म्हणून गैरशिस्त मागणी केलीं. (खंड ३, लेखांक २५७) स्वामीच्या ह्या गैरशिस्त आग्रहाच्या मागण्या सेखोजीनें एकोनएक नाकारिल्या. ह्याचें वैषम्य वाटून आपलें कर्ज ताबडतोब फेडावें असा सेखोजीच्या पाठीमागें स्वामीनें लकडा लाविला (खंड ३, लेखांक २९४ वगैरे) व मागचीं सर्व उष्टींखरकटीं काढून सेखोजीस शिव्याशाप, मुबलक पाठवून दिले. स्वामीच्या शिव्याशापाचें सेखोजीला व त्याच्या आईला अत्यंत भय वाटत असे. परंतु शाहुराजापाशीं व बाजीरावापाशीं चुगल्या करून परमहंस कोणत्या संकटांत आपल्याला पाडतात त्याचें भय त्यांना अतोनात वाटे. राजा आपला बहुत सन्मान करतो (खंड ३ लेखांक २५२) व बाजीराव आपला शब्द केवळ झेलीत असतो (पा. ब्र. च. ले. ३१०), वगैरे स्वतःच्या बढाईचा प्रकार लिहून सेखोजीला भिवविण्याची ही स्वामीला खोड असे. सारांश आपलें कर्ज दिलें नाहीं, हत्तीमुळें कोंकण त्याग करावा लागला, आपल्या आज्ञा सेखोजी मानीत नाहीं, वगैरे नानाप्रकारचे डाव मनांत धरून स्वामीनें सेखोजीचे मन पराकाष्ठेचें अस्वस्थ करून सोडलें

प्रस्तावना 

पिलाजी जाधवरावानें मात्र गेल्याबरोबर कोहज किल्ला सर केला (शकावली पृ. ६४) श्रीनिवासरावास मदत करण्यास सेखोजी आंग्र्यांला शाहूराजाची आज्ञा होती; परंतु श्रीनिवासरावाचा स्वभाव त-हेवाईक पडल्यामुळें सेखोजीचें व त्याचें पटेना १७३० व १७३१ अशी सबंध दोन साले कोंकणात राहून प्रतिनिधींच्या हातून शामळाचें पारिपत्य जेव्हां यत्किंचितहि होईना तेव्हा सेखोजी व संभाजी आंग्र्यांस शाहूने साता-यास बोलाविलें. साता-यास जाण्याच्या पूर्वी सेखोजीची व बाजीरावाची गांठ १७३२ च्या जानेवारीत कुलाब्यास पडली(खंड ३, लेखांक २४४ व शकावली, पृ. ६३). ह्या मुलाखतींत बाजीरावाचें व सेखोजीचें पूर्ण सौरस्य झालें. अर्थात् श्रीनिवासराव प्रतिनिधीच्या विरुद्ध वागण्याची, निदान त्याला मदत न करण्याचा सल्ला बाजीरावाकडून सेखोजीस मिळाला. १७३१ त दाभाड्याचा डभईंस पराभव केल्यापासून प्रतिनिधीचा पक्ष साता-यास दुर्बळ होत चालला होता. तो सेखोजीच्या व बाजीरावाच्या ह्या १७३२ तील भेटीनें अगर्दीच पगूं झाला. १७३२ च्या मार्चात श्रीनिवासरावाने अंजनवेलीस मोर्चे लाविले (खंड ३, लेखांक ३०५). त्याच्या साहाय्यास सेखोजीने बकाजी नाईक महाडीक यास पाठविले (किता). बकाजी नायकाचे व सिद्दीसाताचें चिपळूणाजवळ मोठ्या कडाक्याचें युद्ध झालें. बकाजीनें सिद्दीसाताला कुल मारून काढून किल्ल्यांत घालवून दिलें. सिद्दीसाताची अशी तारांबळ केल्यावर, बकाजी नायकाच्या मनांत गोवळकोटास मीर्चे देऊन ती जागा एकदम घ्यावी असें होतें इतक्यांत पंतप्रतिनिधीची स्वारी गोवळकोटासन्निध येऊन पोहोंचली. गोवळकोटास येऊन पोहोंचण्याच्या अगोदर प्रतिनिधीची व सिद्दीसाताची काशी बंदरावर मुलाखत झाली (खंड ३, लेखांक ३३०). बकाजी नायकाकडून पराभव पावल्यावर, सिद्दीसातानें प्रतिनिधीची काशी बंदरावरहि मुलाखत घेतली. तींत त्यानें असें बोलणें घातलें कीं, आंग्र्यांस तुम्ही येथून घालवा, म्हणजे लढाईची गोष्ट सोडून देऊन, शाहू राजाच्या भेटीस मी साता-यास येतों व आपल्या म्हणण्याप्रमाणें सर्व कांही करून देतों. सिद्दीसाताच्या ह्या थापांना भुलून, प्रतिनिधीनें बकाजी नायकाशीं असें बोलणे लाविले कीं तुम्हीं आम्हीं मिळून गोवळकोट घेऊ. परंतु हे बोलणे बकाजीस मान्य होईना. प्रतिनिधीचे युद्धकौशल्य कितपत आहे हें बकाजीस पूर्ण कळलें होतें. बकाजीच्या साहाय्यानें गोवळकोट घ्यावा व म्यां प्रतिनिधींने लढून गोवळकोट घेतला अशी सर्वत्र ख्याती व्हावी, असा प्रतिनिधीचा बेत होता. तो अर्थातच बकाजीस मान्य झाला नाही. व तो प्रतिनिधीस सोडून कुलाब्यास सेखोजीपाशीं परत आला. बकाजी निघोन गेल्याबरोबर, सिद्दीसातानें आपलें खरें स्वरूप प्रकट केलें. साता-यास येण्याच्या ज्या नरम गोष्टीं तो आतापर्यंत बोलत होता त्या त्यानें अजिबात सोडून दिल्या व प्रतिनिधीशी दोन चार तुंबळ युद्धें घेतलीं. त्यांत प्रतिनिधी केवळ हैराण झाला. पुढे पावसाळा सुरू झाल्यामुळें गोवळकोट घेण्याचे काम पुढील सालावर टाकून देणें भाग पडलें.

प्रस्तावना 

कनोजा ब्रह्मेंद्रस्वामीकडे फिर्याद घेऊन गेला. तेव्हा ब्रह्मेंद्रानें त्याला संभाजी आंग्र्यांकडे शिफारसपत्र देऊन पाठविले, “आणि तुमच्या कामाकरिता ह्याचा घात झाला, तेव्हां तुम्हीं ह्यास अवश्यमेव आश्रय दिला पाहिजे.” अशी निक्षून संभाजीस आज्ञा केली. संभाजीनें ही आज्ञा शिरसा मानिली असती, परंतु लौकिकात केवळ गौण दिसेल ह्या भीतीने ती मानण्याचें त्यानें मोठ्या दिलगिरीनें नाकारिलें (लेखांक २६६). शिवाय ह्यावेळी ह्या दोघां भावांचा समेट होण्याचा संभव होता. तेव्हा ब्रह्मेंद्राची आज्ञा एकदम अमलांत आणणें संभाजीस किंचित कठिणच पडलें. असो. पुढें लवकरच संभाजीची व सखोजीची तडजोड झाली. ह्या दोघां भावांमधील भांडण काहीं वेळ स्तब्ध झालें, व ब्रह्मेंद्रस्वामीचा हा डावपेच त्यावेळेपुरता तसाच पडून राहिला.

८ सातारकर छत्रपतींचा कोंकणपट्टींत आंग्र्यांच्या हस्ते जो अंमल चालत असे, त्याविरुद्ध १७३० च्या सुमारास पांच चार राष्ट्रें खटपट करीत असत. मुंबईकर इंग्रज, राजपुरीकर शामळाला मदत करीत असत. चेऊलवर फिरंगी रिकाम्या फुशारकीनें हिंदू लोकांना त्रास देत. कोल्हापूरकर छत्रपति मात्सर्यानें दक्षिण कोंकणांत ढवळाढवळ करीत. वाडीकर सावंत कोणीकडे कांहीं तरी मेहनत करीत, व राजपुरीकर शामळ त्वेषानें मराठ्यांशीं लढत असत. खरें पाहिलें, तर राजपुरीकर शामळ दिल्लीच्या पातशाहाचे पुरातन सेवक होत. दिल्लीचा पातशाहा तर मराठ्यांच्या कचाटींत पूर्णपणे येत चालला होता. अशा वेळी मराठ्याशीं सख्य करून त्यानें आपली सुरक्षितता कायम ठेवावयाची हा शहाणपणाचा मार्ग होता. परंतु मुसलमान लोकांच्या अगीं दिसून येणारा जो आडदांड हेकटपणा त्याने हट्टास पेटून राजपुरीकर शामळ मराठ्यांस, १७२६ पासून अथवा त्याच्याहि पूर्वी बरीच वर्षे, एकसारखा त्रास देत होता, त्याला मुंबईकर इंग्रज आणि चेऊल व वसई येथील फिरंगी मदत करीत असत. मुंबईकर इंग्रजांचा मुंबईच्या बेटाखेरीज इतरत्र अंमल नसल्यामुळे, त्यांना पाण्यावर गाठून तंबी देण्याखेरीज इतर उपाय नव्हता. हा उपाय आंग्र्यांनीं उत्तम त-हेने चालविला होता. ह्या त्रिकूटांतील शिल्लक राहिलेले जे शामळ व फिरंगी त्यांची मात्र कोंकण किना-यावर बरीच मालमत्ता असे. अर्धे चेऊल शहर व साष्टी बेट फिरंग्यांकडे होतें. शामळाकडे तर उत्तर कोंकणांतील बरेच परगणे होते. ह्या परगण्याशेजारील जो मराठ्यांचा प्रांत त्याची व्यवस्था श्रीनिवासराव प्रतिनिधीकडे असे. तेव्हां शामळाशीं लढण्याचा मक्ता त्याजकडेस शाहूमहाराजांनीं सोंपविला, व फिरंग्यांवर मोहीम करण्यास पिलाजी जाधवराव यांस सांगितलें. पिलाजी जाधवराव व श्रीनिवासराव प्रतिनिधी साता-यास बाजीरावाविरुद्ध मसलत करीत असत, तेव्हां त्यांचा रोग साता-याहून उखडून काढण्यास ही कामगिरी सांगण्याची शक्कल बाजीरावाने शोधून काढिली. १७२९ च्या जूनांत गद्देकोट येथें पिलाजी जाधवराव याची सरदारी बाजीरावाने तगीर केली होती. तेव्हांपासून १७३० च्या मेपर्यंत पिलाजी घरींच बसून होता. त्यास १७३० च्या मेंत कोळवणांत फिरंग्यांवर पाठविलें (शकावली पृष्ठ ५९) व त्याच सुमारास श्रीनिवासरावास कुलाबा-रत्नागिरीकडे रवाना केलें. लढाईचा सराव नसल्यामुळे, श्रीनिवासराव कोंकणात केवळ माशा मारीत बसला (खंड ३, लेखांक २४९).

प्रस्तावना 

तेथे सिद्दीसात याणें स्वामीच्या गावांत अतोनात उपद्रव चालविला होता (पा. ब्र. च. पृ. २७). तो सहन न होऊन स्वामीनें आपली चीजवस्तू व कारकून मंडळी देशावर पाठवून दिली. आपण स्वतः पुढें काहीं महिन्यांनी घांटावर आला. १७२८ च्या पावसाळ्यात समाधीस कोंकणात जाऊन पुन्हा स्वामी लवकरच देशावर आला. १७२९ च्या जूनांतही स्वामी कोंकणात गेला होता. त्यावेळी स्वामीची व कान्होजीची शेवटची गांठ पडली. १७२६ त ज्या पालगडाखालीं हबशाशीं युद्ध सुरूं झालें, तो पालगड १७२९ त मरतां मरतां कान्होजीस प्राप्त झाला (पा. ब्र. ले. ३२८). हा किल्ला कान्होजीस आपल्या आशीरवादानें मिळाला अशी ब्रह्मेंद्रानें आपली समजूत करून घेतलीं. आशीरवादाव्यतिरित वाचिक मदतीखेरीज किल्ला मिळवून देण्याच्या कामीं इतर कोणतीहि मदत स्वामीनें केल्याचें दिसत नाहीं. उलट शाहू महाराज व बाजीराव पेशवे ह्यांच्या मनांत आंग्र्याविषयीं विकल्प भरवून देण्याची मात्र खटपट परमहंसांनी केली होती हें स्पष्ट आहे. १७२९ तील जूनांत ब्रह्मेंद्राची व कान्होजीची जी भेट झाली, तींत स्वामीच्या कर्जाचा हवाला कान्होजीनें जयसिंग, आंग्र्यावर म्हणजे सेखोजी आंग्र्यावर दिला (खंड ३, लेखांक २९४). सेखोजी आंग्रे, हा सरदार आपल्या बाष्पाप्रमाणेच शूर असून कर्तृत्चाची आवडहि त्याच्या अंगीं सामान्य नव्हती. भारदस्तपणा व शालीनता हे दोन गुण सेखोजीच्या ठायीं विशेष होते. सेखोजीचा सख्खा भाऊ सभाजी हा जातीचा हूड असून, वडिलांशीं भक्तिहीन, बरोबरीच्यांशीं तुसड व कनिष्ठांशीं मगरूर रहाण्यांत त्याला विशेष गोडी वाटत असे. कान्होजीच्या मरणोत्तर सेखोजीस सरखेली मिळाली. ह्याचें वैषम्य वाटून संभाजी रुसून सुवर्णदुर्गास निघून गेला. ही बातमी ब्रह्मेंद्रास कळल्याबरोबर त्याने आपल्या कपटनाटकास सुरुवात केली. दोघांचेहि गोमटें व्हावें, चांगलें व्हावे, अशी आपली इच्छा आहे, असें सेखोजीस लिहून, संभाजीच्या मनांत सेखोजींविषयीं वाकडे भरविण्याचा स्वामीने प्रयत्न केला. १७२९ च्या जुलईत कान्होजी वारल्यावर, मोगलांशी व शामळाशीं लढाई सुरू असता, कोल्हापूरच्या संभाजीवर शाहूनें १७२९ च्या हिवाळ्यांत स्वारी केली व सेखोजींस पन्हाळ्याखाली (शाहूमहाराजाची रोजनिशी, रकाना ४२) आणि संभाजीस विशालगडाखाली चौक्या बसविण्यास सांगितले. (रोजनिशी, रकाना, ४७). महाराजांचा हुकूम दोघांनीही अंमलांत आणिला. परंतु शाहूराजाचा हुकूम अंमलांत आणतांना, सेखोजी व संभाजी हे दोघे बंधू एकजुटीने न वागतां विभक्तपणें आपापली कामगिरी बजावीत आहेत. असे ब्रह्मेंद्रासारख्या बारीक पहाणा-यांच्या दृष्टोत्पत्तांस आलें. सेखोजीला सरखेल हा किताब होता, ह्यांचे वैषम्य वाटून संभाजीने आपल्या नावाचा एक नवीन शिका काढिला. अंतस्थ व बहिस्थ शत्रूंना जिंकून आपला उत्तरोत्तर उत्कर्ष होत जाणार अशा अर्थाचा हा शिका होता. नवीन शिका काढण्याची ही बुद्धि संभाजीला ब्रह्मेंद्रस्वामीचे हस्तक दत्ताजी कनोजे व बकाजी नाईक ह्यांनी सुचविली असावी असा अंदाज आहे. वडील भाऊ, सेखोजी मराठ्यांच्या सर्व आरमाराचा अधिपति असतांना संभाजी आपल्याला आरमाराचा सरसुभेदार म्हणवूं लागला व कुलाब्याच्या दक्षिणेस सुवर्णदुर्गास मुख्य ठाणें करून राहण्यांत त्याला विशेष अभिमान वाटला (खंड ३, लेखांक २६७). १७३१ च्या फेब्रुवारींत संभाजी महाराज कोल्हापूरकर व शाहूमहाराज सातारकर ह्यांची क-हाडाजवळ जखीणवाडीस मुलाखत होऊन तह झाल्यावर, सेखोजीस व संभाजीस छत्रपतीनीं साता-यास बोलाविलें (रोजनिशी १४१). ह्या दोघा भावांमधील वैमनस्य मोडून टाकावें, असा ह्या बोलावण्यांत छत्रपतींचा हेतु होता. परंतु बंधुविरोधाचा इतका कांही कळस झाला होता कीं सेखोजीस व संभाजीस एकदम साता-यास येणे अशक्य झालें. संभाजी तह होण्याच्या सुमाराला १७३१ त व सेखोजी १७३२ च्या मार्चात परस्परे सातान्यास गेले. (रोजनिशी १४० व लेखांक २५२). दोघे बंधु एकदम साता-यास न जाण्याचें कारण ब्रह्मेंद्रस्वामीच होता. दत्ताजी कनोजे नामेंकरून कोणी मनुष्य ब्रह्मेंद्रस्वामीच्या प्रीतीतील होता. बेकायदा आगळीक केल्यावरून व संभाजीच्या तर्फे सेखोजीविरुद्ध फितूर केल्यावरून, सेखोजीने त्या दत्ताजी कनोजास नोकरीवरून दूर केलें.

प्रस्तावना 

७ हे हlत्तीचें प्रकरण १७२७ च्या फेब्रुवारींत घडलें. स्वामी १७२८ च्या मार्चात धावडशीस जो आला तो बहुतेक कायमचा आला ह्यापूर्वी बरींच वर्षे स्वामी धावडशीस येऊनजाऊन होता. १७१७ च्या जानेवारींत व १७१६ च्या हिवाळ्यात स्वामी देशावर होता (पा ब्र लेखांक ११४). १७२१ पासून १७२५ पर्यंत बहुतेक प्रत्येक वर्षी स्वामी देशावर येत असे (खंड ३, लेखांक १७, १८) लिंब येथील विहिरीचे काम १७२१ पासून १७२५ पर्यंत चालले असतांना विरुबाईनें ब्रह्मेंद्रापाशीं पाथरवटांची मागणी केलेली आहे. १७१६ त देशावर आल्यावर बाळाजी विश्वनाथानें ब्रह्मेंद्रास पिंपरी हें गाव इनाम दिलें. ब्रह्मेद्र स्वामीच्या बखरींत पिंपरी हे गांव बाळाजी विश्वनाथानें ब्रह्मेंद्रास सन सीत अशरीनांत दिले म्हणनू जें म्हटले आहे, (ब्र. ब. पृ. १३) तें चूक आहे. सीत अशरीन ह्या अक्षरांबद्दल सीत अशर अशी अक्षरे हवीं आहेत. सीत अशर सालांत म्हणजे १७१६ च्या हिवाळ्यांत ब्रह्मेंद्र क्रघांटीं आला होता. हे पारसनीसकृत ब्रह्मेंद्र स्वामीच्या पत्रव्यवहारांतील लेखांक ११४ त टीप ह्यावरून उघड आहे. येसशेट सोनाराने ४१ मोहरांची पारख सबा अशरच्या १८ जमादिलाखरीं म्हणजे १७१७ च्या एप्रिलात केली. ह्या ४१ मोहरांचा हवाला बाजीरावानें वाडीच्या म्हणजे नरसोबाच्या वाडीच्या मुक्कामी बाळाजी विश्वनाथापासून घेतला . बाळाजी विश्वनाथ त्यावेळीं कोल्हापूरकरांच्या विरुद्ध त्या प्रांतीं लढत होता. तेथे ब्रह्मेद्राची व त्याची गांठ पडून ब्रह्मेंद्रानें आपली भिक्षा वाडीस बाळाजी विश्वनाथाच्या स्वाधीन केली. ११४ पत्राच्या टीपेंत रा. पारसनीस सबा अशारीन ज्यास म्हणतात, तें खरोखर सबा अशर साल होय. तसेंच सीत अशरीनांतील ताकीदपत्रांवरून पिंपरी हें गाव त्याच समयास स्वामींस मिळालें, अशी पारसनीसाची समजूत आहे. (पा. ब्र. च. पृ. १८). परंतु ती सर्वस्वी चुकीची आहे. शिवाय सीत अशरीनचा २९ मोहरम व राजशक ५२ ची भाद्रपद बहुल १३ पारसनीस म्हणतात त्याप्रमाणें इ. सन १७२६ त पडत नसून १७२५ च्या २८ सप्टंबर व २६ ऑगस्ट ह्या तारखांस प्रत्येकीं पडते बाळाजी विश्वनाथाकडून पिंपरी गाव मिळाल्यानंतर १७२१ त शाहूनें स्वामीस धावडशी गांव इनाम दिले. तेथें असतांना विरुबाईनें ब्रह्मेंद्रापाशीं पाथरवट मागितले (खंड ३, लेखांक १७, १८). १७२८ च्या मार्चात धावडशीस आल्यावर स्वामीनें आपलीं दुःखें शाहूमहाराजांस सांगितलीं. शिवाय स्वामीच्या सकटांचा वृत्तांत बाजीरावास परस्परें कळलाच होता. (पा. ब्र. च. पृ. ३०) आपल्या परमपूज्य गुरूचीं गा-हार्णी ऐकून त्यांचा परिहार करण्याची इच्छा दोघांची होती. परंतु कान्होजी जिवंत असे तोपर्यंत आंग्र्याला तंबी पोहोचण्याचा सभव फारच थोडा होता. स्वामीचा छल आंग्र्याने इतका दुरून, अप्रत्यक्ष रीतीने व चतुराईनें केला होता कीं, त्याला राजरोस रीतीनें नांवे ठेवण्यास बिलकुल जागा नव्हतीं. स्वामीजवळ परवाना नसल्यामुळें हत्ती अडकावून ठेवणें लढाईच्या नियमांना सर्वस्वीं अनुसरूनच होतें. आपला हत्ती आंग्र्यानें अडविला म्हणून स्वामीच्या देवालयाची व गांवाची राखरांगोळी करणें मात्र हबशाला केव्हांहि शोभण्यासारखे नव्हतें. हिंदूंच्या धर्माची व त्यांच्या धर्मगुरूचीं अशी मानखंडणा शाहू महाराजासारख्या राजाला व बाजीरावासारख्या लढवय्याला बिलकूल खपण्यासारखी नव्हती. तेव्हा हबशाशी लढाई करून गोब्राह्मणांचा प्रतिपाल करण्यास शाहूला व बाजीरावांला ही सबब उत्तम सांपडली. अर्थात १७२६ त जें युद्ध सुरूं झालें होतें, तें १७२८ त शाहूनें तसेंच चालूं ठेविलें. इकडे ब्रह्मेंद्रस्वामी १७२८ च्या पावसाळ्यांत समाधिप्रीत्यर्थ कोंकणात उतरला.