प्रस्तावना
पिलाजी जाधवरावानें मात्र गेल्याबरोबर कोहज किल्ला सर केला (शकावली पृ. ६४) श्रीनिवासरावास मदत करण्यास सेखोजी आंग्र्यांला शाहूराजाची आज्ञा होती; परंतु श्रीनिवासरावाचा स्वभाव त-हेवाईक पडल्यामुळें सेखोजीचें व त्याचें पटेना १७३० व १७३१ अशी सबंध दोन साले कोंकणात राहून प्रतिनिधींच्या हातून शामळाचें पारिपत्य जेव्हां यत्किंचितहि होईना तेव्हा सेखोजी व संभाजी आंग्र्यांस शाहूने साता-यास बोलाविलें. साता-यास जाण्याच्या पूर्वी सेखोजीची व बाजीरावाची गांठ १७३२ च्या जानेवारीत कुलाब्यास पडली(खंड ३, लेखांक २४४ व शकावली, पृ. ६३). ह्या मुलाखतींत बाजीरावाचें व सेखोजीचें पूर्ण सौरस्य झालें. अर्थात् श्रीनिवासराव प्रतिनिधीच्या विरुद्ध वागण्याची, निदान त्याला मदत न करण्याचा सल्ला बाजीरावाकडून सेखोजीस मिळाला. १७३१ त दाभाड्याचा डभईंस पराभव केल्यापासून प्रतिनिधीचा पक्ष साता-यास दुर्बळ होत चालला होता. तो सेखोजीच्या व बाजीरावाच्या ह्या १७३२ तील भेटीनें अगर्दीच पगूं झाला. १७३२ च्या मार्चात श्रीनिवासरावाने अंजनवेलीस मोर्चे लाविले (खंड ३, लेखांक ३०५). त्याच्या साहाय्यास सेखोजीने बकाजी नाईक महाडीक यास पाठविले (किता). बकाजी नायकाचे व सिद्दीसाताचें चिपळूणाजवळ मोठ्या कडाक्याचें युद्ध झालें. बकाजीनें सिद्दीसाताला कुल मारून काढून किल्ल्यांत घालवून दिलें. सिद्दीसाताची अशी तारांबळ केल्यावर, बकाजी नायकाच्या मनांत गोवळकोटास मीर्चे देऊन ती जागा एकदम घ्यावी असें होतें इतक्यांत पंतप्रतिनिधीची स्वारी गोवळकोटासन्निध येऊन पोहोंचली. गोवळकोटास येऊन पोहोंचण्याच्या अगोदर प्रतिनिधीची व सिद्दीसाताची काशी बंदरावर मुलाखत झाली (खंड ३, लेखांक ३३०). बकाजी नायकाकडून पराभव पावल्यावर, सिद्दीसातानें प्रतिनिधीची काशी बंदरावरहि मुलाखत घेतली. तींत त्यानें असें बोलणें घातलें कीं, आंग्र्यांस तुम्ही येथून घालवा, म्हणजे लढाईची गोष्ट सोडून देऊन, शाहू राजाच्या भेटीस मी साता-यास येतों व आपल्या म्हणण्याप्रमाणें सर्व कांही करून देतों. सिद्दीसाताच्या ह्या थापांना भुलून, प्रतिनिधीनें बकाजी नायकाशीं असें बोलणे लाविले कीं तुम्हीं आम्हीं मिळून गोवळकोट घेऊ. परंतु हे बोलणे बकाजीस मान्य होईना. प्रतिनिधीचे युद्धकौशल्य कितपत आहे हें बकाजीस पूर्ण कळलें होतें. बकाजीच्या साहाय्यानें गोवळकोट घ्यावा व म्यां प्रतिनिधींने लढून गोवळकोट घेतला अशी सर्वत्र ख्याती व्हावी, असा प्रतिनिधीचा बेत होता. तो अर्थातच बकाजीस मान्य झाला नाही. व तो प्रतिनिधीस सोडून कुलाब्यास सेखोजीपाशीं परत आला. बकाजी निघोन गेल्याबरोबर, सिद्दीसातानें आपलें खरें स्वरूप प्रकट केलें. साता-यास येण्याच्या ज्या नरम गोष्टीं तो आतापर्यंत बोलत होता त्या त्यानें अजिबात सोडून दिल्या व प्रतिनिधीशी दोन चार तुंबळ युद्धें घेतलीं. त्यांत प्रतिनिधी केवळ हैराण झाला. पुढे पावसाळा सुरू झाल्यामुळें गोवळकोट घेण्याचे काम पुढील सालावर टाकून देणें भाग पडलें.