प्रस्तावना
त्या सर्व लढायांत कान्होजी आंग्र्यांच्या कारकीर्दीत १७२६ त जी लढाई सुरू झाली व जी चालूं असतां ब्रह्मेंद्रस्वामीची कोंकणातून उचलबांगडी झाली ती विशेष प्रख्यात आहे. ही लढाई १७२६ त सुरूं होऊन, १७३३ च्या फेब्रुवारींत तर ऐन रंगात येत चालली होतीं. सात वर्षे सारखे लढून सिद्दी रसूल पादाक्रांत होण्याचीं चिन्हें बिलकुल दिसेनात. कान्होजी आंग्रे, सेखोजी आंग्रे, संभाजी आंग्रे, बकाजी नाईक महाडीक, श्रीपतराव प्रतिनिधि, जिवाजी खंडेराव चिटणीस, यशवंतराव महादेवं, पिलाजी जाधवराव, वगैरे अनेक दुय्यम प्रतीच्या माणसांनी सिद्दयाची रग जिरविण्याची वेळोवेळ खटपट केली. परंतु एकाचें मत दुस-याला पसंत नसल्यामुळें, ह्यांपैकीं एकालाहि म्हणण्यासारखें यश कधीच आलें नाहीं सिद्दी सात, सिद्दी अंबर, सिद्दी संबूल, सिद्दी याकूब, सिद्दी बिलाल, सिद्दी मसूद वगैरे जंजिरेकर सिद्दयांच्या स्नेह्मांनीं व सुभेदारांनीं मराठ्यांचे बहुतेक प्रयत्न निष्फळ करून टाकिले व कोंकणांतील हिंदू लोकांना भ्रष्ट करण्याचा तडाका चालविला. सात वर्षे लढून ह्या लहान माणसांच्या हातून कार्यसिद्धि लवकर होण्याचीं चिन्हें दिसत नाहीत असें पाहून शाहूराजानें बाजीराव बल्लाळाला १७३३ च्या प्रारंभी जंजि-यावरील मोहीम हातीं घेण्याचा हुकूम केला. बाजीरावाच्या सद्दीचा जोर विशेष म्हणा किंवा जंजिरेकर हबशाचे दैव फिरलें म्हणा, जंजि-यावर स्वारी करण्याचा बाजीरावाला हुकूम होण्याला व सिद्दी रसूल याकूदखान मरण्याला एकच गांठ पडली. सिद्दी रसूल याकूदखान पिढीजाद मालक असल्यामुळें व सिद्दी सात, अंबर, संबूल, याकूब वगैरे सुभेदार त्यानेंच नेमिले असल्यामुळें त्याच्या हयातींत ह्या सरदारांत परस्पर उघडपणे विरोध करण्यास कोणीहि धजला नाहीं. सिद्दी रसूल संपल्यावर मात्र, परस्परविरोधास उघडपणें बाहेर येण्यास जागा झाली. सिद्दी रसूल याच्या सरदारांपैकी, गुहाघर येथील बाटलेला पाटील याकूबखान ऊर्फ शेखजीं याचें व सिद्दी रसूल याचें पूर्वीपासूनच चित्त शुद्ध नव्हतें (खंड ४ था, पेशव्यांची बखर, पृष्ठ ३९). सिद्दी रसूलाच्या मृत्यूनंतर, शेखजीची द्रोहबुद्धि विकास पावून, त्याचें व बाकीच्या सरदारांचें वाकडें आलें. सिद्दी रसूलाचा वडील मुलगा सिद्दी अबदल्ला शेखजीच्या बाजूचा होता, ही गोष्ट इतर सरदारांस न आवडून, त्यांनी बाजीराव राजपुरीला येण्याच्या दिवशींच सिद्दी अबदल्ला यास ठार केलें (काव्येतिहाससंग्रह, पत्र १६६). सिद्दी रसूल याचा दुसरा एक मुलगा आपल्या बापाच्या प्रेताचे दफन करण्यास फेब्रुवारींत जंजि-यातून दंडाराजपुरीस आला होता तो आपल्या वडील भावाची ती दुवार्ता ऐकून राजपुरीसच राहिला. ह्या मुलाला म्हणजे अबदुल रहिमान याला यशवंतराव महादेव यांणीं वश करून ठेविला होता. हें वर्तमान शेखजीस कळतांच तोहीं अबदुल रहिमानास येऊन मिळालां. पंतप्रतिनिधि यांनी शेखजीस अगोदर फितविले होतेंच. तशांत खाशांपैकीं एक मुलगा आपल्या पक्षाला मिळालेला पाहून शेखजीला जास्तच हुरूप आला व त्यानें बाजीरावास हरएक प्रकारची मदत करण्याचा पत्कर घेतला. इकडे जंजि-यांतील सरदारांनीं सिद्दी रसुलाच्या सिद्दी हसन नावाच्या मुलास गादीवर बसविलें, व मराठ्यांशी टक्कर देण्याची तयारी केली. येणेंप्रमाणें हबसाणांतील हबशांत दोन परस्परविरुद्ध तट उत्पन्न झाल्यामुळें बाजीरावाचें काम बरेंच सोपें झालें.