प्रस्तावना
९ १७३२ तील ह्या कोंकणातील मोहिमेच्या वृत्तांतावरून, प्रतिनिधीच्या हातून शामळास तंबी पोहोंचणें शक्य नाही, हें शाहूमहाराजास पक्कें कळून चुकलें. सेखोजी आंग्रे व बकाजी नाईक महाडीक यांचें व प्रतिनिधीचे सौरस्य नसल्यामुळे त्यांच्याहि हातून तें काम होऊन येईल अशी शाहूंची खात्री नव्हतीं. ती गोवळकोटची मसलत फसल्यामुळें, प्रतिनिधीच्याच कर्तृत्वशून्यतेचा तेवढा अंदाज शाहूस करतां आला असें नाही, तर आंग्र्यांच्या संबंधींहि त्यांच्या मनांत विकल्प आले. राजाच्या मनांत आंग्र्यासंबंधीं विकल्प यावा हाच ब्रह्मेंद्रस्वामीचा हेतू होता. अप्रत्यक्ष रीतीनें हा हेतु साध्य होत असतां सेखोजीच्या मनांत बाजीरावाच्या विरुद्ध भावना उत्पन्न करण्याचा स्वामीनें प्रयत्न केला. तळेगावकर दाभाडे व सेखोजी आंग्रे यांचा शरीरसंबंध पूर्वापरचा होता. १७३१ च्या एप्रिलांत त्रिंबकराव दाभाड्यास बाजीरावानें लढाईंत मारलें असता, स्वामीनें ती बातमी ताबडतोब सेखोजीस कळविली व “मारत्याची सर्व पृथ्वी आहे” म्हणून एक दुःखप्रदर्शक व निंदात्मक वाक्य जाता जाता सहज पत्रात नमून करून ठेविलें (खंड ३ लेखांक २४९). आपण लिहिलेलें वाक्य वाचून सेखोजीच्या मनांत काय भावना होते व बाजीरावाविषयीं तो काय उद्गार काढतो हें काढून घेण्याचा स्वामीचा विचार होता. “स्वामींनीं जो प्रकार लिहिला तो उचितच! त्रिंबकराउ निधन पावले हे गोष्टी भावी अर्थानुरूप जाहली!” अशा अर्थाचें पत्र सेखोजीनें स्वामीस लिहिले. झाला प्रकार तो केवळ निंद्य होय, विरुद्ध बाजूच्या सर्व सरदारांना जमीनदोस्त करण्याचा बाजीरावाचा विचार आहे, हा ध्वनि सेखोजीच्या ह्मा लिहिण्यापासून व्यक्त होतो. सेखोजीनें असेंच लिहावें, असा स्वामीचा मनोदय होता. येणेंप्रमाणें हें लिहिणें बाजीरावास दाखवून त्याच्या मनांत सेखोजीच्याविषयी विकल्प आणण्याची स्वामीची मसलत पूर्णपणें तडीस गेली. सेखोजीचे आपल्याविषयीं खरें मत काय आहे, हे स्वामीच्या द्वारां कळून आल्यामुळें, बाजीरावानें आंग्र्यांशीं अत्यंत कुटिलपणाचें वर्तन ठेविलें. १७३२ च्या जानेवारींत भेट झाली तेव्हां वरकांती पूर्ण सौरस्य ठेवून, बाजीरावानें सेखोजीस प्रतिनिधीच्या विरुद्ध वागण्याची सल्ला दिली. ही सल्ला अमलांत आणिल्यामुळें शाहूराजाच्या मनांत सेखोजीविषयी विकल्प कसा आला हें मागें नमूद केलेंच आहे. ह्या अशा कपट नाटकानें सेखोजींविषयीं शाहूच्या व बाजीरावाच्या मनांत विकल्प उत्पन्न केल्यावर सेखोजीला छळण्याचे स्वामीने निराळेच खासगी उपाय योजिले. (१) दत्ताजी कनोजा म्हणून सेखोजीच्या अप्रीतींतील एक माणूस होता. त्याला पुन्हां नोकरीवर ठेवावयास सेखोजीस हुकूम केला व संभाजीस दत्ताजी कनोजाचा कड घेण्यास सांगितलें. (२) असोले येथील देशमुखी कृष्णंभट देसाई म्हणून स्वामींच्या प्रीतींतील मनुष्य होता त्यास देण्यास सागितली. (पा. ब्र. च. ले. ३२८; खंड ३, लेखांक २५४) व संभाजीस कृष्णंभटाचा पक्ष उचलण्याचा आग्रह केला (खंड ३, लेखांक २६५). (३) शंकरभट उपाध्या मुरूडकर ह्याची महाजनकी बापू बागलास द्यावी असा स्वामीनें हट्ट धरिला (पा. ब्रा. च. ले. ३२८). (४) गोठणें येथील खाजणांतील शेतास इस्तावा वीस वर्षे माफ करावा म्हणून गैरशिस्त मागणी केलीं. (खंड ३, लेखांक २५७) स्वामीच्या ह्या गैरशिस्त आग्रहाच्या मागण्या सेखोजीनें एकोनएक नाकारिल्या. ह्याचें वैषम्य वाटून आपलें कर्ज ताबडतोब फेडावें असा सेखोजीच्या पाठीमागें स्वामीनें लकडा लाविला (खंड ३, लेखांक २९४ वगैरे) व मागचीं सर्व उष्टींखरकटीं काढून सेखोजीस शिव्याशाप, मुबलक पाठवून दिले. स्वामीच्या शिव्याशापाचें सेखोजीला व त्याच्या आईला अत्यंत भय वाटत असे. परंतु शाहुराजापाशीं व बाजीरावापाशीं चुगल्या करून परमहंस कोणत्या संकटांत आपल्याला पाडतात त्याचें भय त्यांना अतोनात वाटे. राजा आपला बहुत सन्मान करतो (खंड ३ लेखांक २५२) व बाजीराव आपला शब्द केवळ झेलीत असतो (पा. ब्र. च. ले. ३१०), वगैरे स्वतःच्या बढाईचा प्रकार लिहून सेखोजीला भिवविण्याची ही स्वामीला खोड असे. सारांश आपलें कर्ज दिलें नाहीं, हत्तीमुळें कोंकण त्याग करावा लागला, आपल्या आज्ञा सेखोजी मानीत नाहीं, वगैरे नानाप्रकारचे डाव मनांत धरून स्वामीनें सेखोजीचे मन पराकाष्ठेचें अस्वस्थ करून सोडलें