प्रस्तावना
११ १७३३ च्या डिसेंबरांत अबदुल रहिमान याची जंजि-यांत यद्यपि स्थापना झाली, तत्रापि सिद्दी अंबर, सिद्दी संबूल, व सिद्दी सात ह्या मंडळीनीं अंजनवेल, गोवळकोट वगैरे ठाणीं लढविण्याचा उपक्रम सोडिला नाहीं. हा कालपर्यंत जंजिरा म्हणजे मराठ्यांना मोठें दुरधिगम्य स्थल वाटत असें. तो भ्रम मोडण्याचें महत्कृत्य करून, मोहिमेचे बाकीचें सटरफटर काम बाजीरावानें पूर्वीप्रमाणें इतर सरदारांच्या अंगावर टाकून दिलें व साता-यास जातांना चेऊलास १७३४ च्या ४ जानेवारीस आंग्र्यांची स्थापना केलीं (रोजनिशी, रकाना १४२). १७३३ च्या सप्टेंबरातं उंदेरीस इंग्रजांशीं लढत असतां सेखोजी आंग्रे एकाएकी मृत्यू पावला (रोजनिशी, रकाना ६१). सेखोजी आंग्र्यांनंतर संभाजी आंग्र्याला सरखेलीचें पद प्राप्त झालें. सेखोजी जिवंत असताना, संभाजीला सेखोजीच्या विरुद्ध जाण्याचा उपदेश करून व त्याची नाना प्रकारें मनधरणीं करून ब्रह्मेंद्रस्वामीनें सेखोजीर्चे पारडें फारसें जड़ होऊ दिले नाहीं. सेखोजी वारल्यानंतर-सेखोजी आपल्या अभिश्रापानें वारला असें स्वामी वारंवार म्हणत असे (पा ब्र. च. पृ. ३०२)- संभाजी आपल्या धोरणानें चालेल अशी स्वामीला आशा होती. परंतु स्वामीची ही आशा लवकरच खोटीं ठरली. ब्रह्मेंद्राने सेखोजीकडून अंतप्रभूला काढून कृष्णंभटाला देशमुखी, वारंवार दपटशा व अभिश्राप देऊन एकदाची कशी तरी देवविली होती. हा देशमुखीचा कागद अमलांत येणार इतक्यात सेखोजी आंग्रे वारला तेव्हा सेखोजीनें दिलेला हुकूम अमलांत आणण्यास स्वामीनें संभाजीला पत्र लिहिलें. संभाजीनें या पत्राचा सत्कार निराळ्याच प्रकारानें केला. कान्होजीनें अंतप्रभूस देशमुखी दिली होती, ती सेखोजीनें स्वामीच्या आग्रहास्तव कृष्णंभटास दिली, परंतु खरें पाहिलें तर, अंतप्रभूची देशमुखी खरी, तेव्हां कान्होजीनें दिलेला निकाल अमलांत आणावा व सेखोजीचा निकाल रद्द करावा असा आपला हेतू आहे, असें संभाजीनें स्वामीस उत्तर पाठविलें (खंड ३, ले २९०). शेवटीं स्वामीचा कोप अगदीं उतास जातो असा प्रसंग बेतल्यावर कृष्णंभटास निम्मी देशमुखी मोठ्या मिनतवारीनें मिळाली (खंड ३, ले. ३४०). “संभूने जयसिंगाचा शिक्का लटका केला, तरी देव त्याला बघून घेईल,” असे उद्गार ब्रह्मेंद्रानें यावेळीं काढिले आहेत (पा. ब्र. च. पृ. ३०३). बाजीराव साता-यास निघून गेल्यावर, संभाजीनें अंजनवेलोस मोर्चे लाविले (रोजनिशी, रकाना ६२). अंजनवेलीस मोर्चे लावण्याच्या कामांत बहुत दिवस जाणार हें ओळखून, संभाजीनें कुलाब्यास घरची व्यवस्था पाहण्यास आपले भाऊ धोंडजी व मानाजी यास ठेवून दिले. धोंडजीकडे प्रांताची व्यवस्था पाहण्याचें काम नेमून दिलें व मानाजीस कुलाब्याच्या आरमाराचा अधिकार सांगितला (काव्येतिहाससंग्रह, ले. ११९). ही व्यवस्था चार सहा महिने चालली नाहीं तों संभाजी आंग्रे व मानाजी आंग्रे ह्यांच्यांत तेढ उत्पन्न झाली. कारभारसंबंधे नानाप्रकारचे आरोप ठेवून, संभाजीने धोंडजीस कुलाब्याच्या बाहेर काढून दिलें व मानाजीस दुरुक्तीचें भाषण करून जीवन्मुक्त करण्याचा विचार केला. मानाजी आंग्रे ब्रह्मेंद्रस्वामीच्या व बाजीरायाच्या वतीचा आहे, तो आपल्याविरुद्ध राजकारण करतो, अशा प्रकारचे संशय संभाजीच्या पोटांत येऊ लागल्यामुळें, संभाजीचें वर्तन हें असें एक प्रकारचें झालें होतें. कुलाब्यांत राहून आपला जीव सुरक्षित नाहीं, हें जाणून मानाजी रेवदंड्यास फिरंण्याग्यांच्या आश्रयाला गेला व तेथेंच कांही दिवस स्वस्थ राहिला.