प्रस्तावना
१० इतक्यांत १७३२ चा पावसाळा संपून कोकणांतील मोहीम करण्याचे दिवस बरेच लोटले. शाहूमहाराजांना तर शामळाचें पारपत्य करण्याची बेसुमार उत्कंठा लागून राहिली. केवळ आंग्र्यांच्या किंवा प्रतिनिधीच्या हातून ही कामगिरी उलगडून येईल असा रंग दिसेना. तेव्हां शाहूनें बाजीरावाला व फतेसिंग भोसल्याला कोंकणच्या मोहिमेवर जाण्यास आज्ञा केली. ते १७३३ च्या एप्रिलांत कोंकणांत उतरले. बाजीराव बल्लाळ कोंकणांत उतरल्याबरोबर तीन वर्षे खितपत पडलेल्या ह्या मोहिमेच्या मंदगतीस आळा पडून, शत्रूला तंबी पोंहोचविण्याचे काम जारीनें सुरू झालें. रायगड, मंडणगड, विजयगड, गोवळकोट, अंजनवेल, उंदेरी व जंजिरा अशीं मोठमोठी बिकट स्थळें शामळाच्या हातांत होतीं (काव्येतिहाससंग्रह, पत्रे, यादी वगैरे १६६). त्या सर्वांवर एकदम हल्ला करण्याचा बाजीरावाने बेत केला. उंदेरीवर व इंग्रजांवर सेखोजी आंग्र्यांस पाठविलें (रोजनिशी, रकाना ६१). बाणकोट व मंडणगड ह्यांच्यावर बकाजी नाइकास धाडिलें (पा. ब्र. च. ले. २०३) प्रतिनिधित्व आनंदराव सोमवंशी ह्यांच्याकडे अंजनवेलीची कामगिरी सोंपविली (रोजनिशी, रकाने ५९ व ६०) व स्वतः बाजीराव व फत्तेसिंग शामळाच्या जंजि-याला शह देऊन बसले (रोजनिशी, रकाना ५९) ह्यावेळी जंजि-याच्या आंतील खानजाद्यांची स्थिति फारच विचित्र झाली होती. बाजीराव कोंकणांत उतरण्याच्यापूर्वी जंजि-याचा मुख्य सिद्दी रसूल याकूदखान १७३३ च्या फेब्रुवारींत मरण पावला होता. सिद्दी रसूल याकूबखान याचे पूर्वज, अहमदनगर येथील निजामशाही पातशहांच्या वेळेस आफ्रिकाखंडांतील इजिप्त देशाच्या आग्येयांस सोमाली लोकांचा देश आहे तेथून अरबी समुद्रांतून कोंकणच्या किना-यावर आले व कालान्तरानें दंडाराजपुरीजवळील जंजि-याचे अधिपति झाले. हे जंजि-याचे अधिकारी इजिप्त देशाच्या जवळून आले म्हणून त्यांस हबशी अशी संज्ञा प्राप्त झाली, ते आफ्रिकेंतून आले म्हणून त्यांस सिद्दी असे नांव मिळाले, व त्यांचा मूळ देश सोमाली लँड, अथवा सामल किंवा शामळ देश असल्यामुळे त्यास शामळ ह्या नांवानें मराठे लोक ओळखूं लागले. येणेंप्रमाणें हबशी, सिद्दी व शामळ ह्या तीन नांवांनीं ते दर्यावर्दी लोक कोंकणांत नांवाजले गेले. अहमदनगरची पातशाही अस्तंगत झाल्यावर जंजिरेकर सिद्दी दिल्ली येथील चकत्यांच्या पातशाहीचे मांडलिक बनले व औरंगजेबाच्या कारकीर्दीत सिद्दी रसूल ह्याचा पूर्वज सिद्दी कासीम यास याकूदखान हा किताब मिळाला. १७०६ त सिद्दी कासीम याकूदखान मरण पावल्यावर त्याच्या पश्चात् सिद्दी रसूल याकूदखान गादीवर आला. ह्या सिद्दी रसूलानें १७३३ च्या फेब्रुवारीपर्यंत राज्य केलें. ह्याच्या कारकीर्दीत मराठ्यांशीं हमेशा लढाया चालूच होत्या.