[२५२] श्री. १९ डिसेंबर १७३२.
श्रीमत् तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल कृतानेक साष्टांग दंडवत = प्र॥ विनंति उपरि येथील कुशल श्री कृपाकटाक्षवीक्षणें वर्धिष्णु पौष शुध्द द्वितीया रविवासरपर्यंत यथास्थित असे विशेष. स्वामीनीं कृपा करून सदयत्वें पत्रिका प्रेषिली ते उत्तमसमयीं प्रविष्ट होऊन संतोषवाप्ती जाहाली. याच न्यायें सर्वदा आशीर्वादपत्र प्रेषण करून अपत्यांचा सांभाळ केला पाहिजे. यानंतर स्वामी आज्ञापत्रीं आज्ञा केली कीं राज्याच्या कार्याकरितां तूर्त येता येत नाहीं, व धावडशीचें तळें एक सिद्ध जाहालें, दुसरियास काम चालीस लाविलें आहे व तळयाचे कामास दोघे पाथरवट पाठवणें व दुलई पाठविली ते बाजीरायांनी मागितली त्यास दिली, दुसरी दुलई व सकलाद लाखी व रजई पिवळे दमासाची व नारायण तेल व आक्रोड, बदाम याजप्रमाणे पाठवून देणें ह्मणोन. ऐशास स्वामीचे भेटीस बहुत दिवस जाहाले. स्वामीचे पाय पाहावे, होईल ते सेवा करावी, तीर्थरूपांमागे सूक्तासूक्त वर्तणूक आजीपर्यंत करून आसमंताद्भागीक यांस नियमावरी ठेविले आहेत हेंही निवेदन करावें व पुढें कोणे स्थितीनें वर्तावें हे बुध्दि पुसावी, स्वामी आज्ञा करितील तेणेंप्रमाणें वर्तणूक करावी, या हेतूस्तव स्वामीच्या आगमनाचा योग घडावा ह्मणोन लिहिलें. त्याची आज्ञा या प्रकारीची जाली ! बरें ! आमचा उदित काल प्राप्त होईल तेव्हां स्वामीचे चित्तीं येईल. आह्मास दर्शनाचा लाभ घडेल. धावडशीचें तळें एक सिध्द जाहालें. तैसेंच दुसरेंही सिध्द होतच आहे ! सकलाद उंच मिळाली नाहीं. जें सिध्द होतें, ते सेवेसी पाठविली आहे. उपरी सुरतेहून आणविली आहे. आल्यावरी पाठवितों. रजई व दुलईची आज्ञा त्यावरून हरदू सनगें पाठविली असेत.
रजई पिवळी दमासाची अस्तर लाल ताफ्तेयांचे आंत कापूर घालून फीत हिरवें याप्रों। सिध्द करून पा। असे. |
दुलई किनखापी लाल अस्तर पिवळा ताका चिनाई फरेवान हिरवी याप्रों। सिध्द करून पा। असे. |
एकूण दोन दागिने पाठविले असेत. स्वामीनीं स्वीकार करून अंगीकार केल्याचें उत्तर पाठविलें पाहिजे. अक्रोड, बदाम संग्रही नाहीं. बदाम होते त्यापैकीं अदमण कार्यास येईल, न ये ह्मणोन थोडे पाठविले ते पावलेच असेल. कार्याचे असिले तरी आज्ञा करावी, आणिखी पाठऊन देतो. वरकड सुवर्णदुर्गाकडून पाठविला तो प्रविष्ट जालाच असेल. मजला स्वामीच्या पायाविना दुसरे दैवत आहे ऐसें नाहीं. स्वामी सर्वज्ञ आहेत. म्यां काय लिहावें ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.