[२५४] श्री. २९ जानेवारी १७३३.
श्रीमत्सकल तीर्थस्वरूप परमहंस बावा स्वामी वडिलांचे सेवेसी.
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरी येथील कुशल ता। माघ बहुल दशमी इंदुवासरपर्यंत स्वामीचे कृपेनें असे. विशेष. स्वामीनीं आशीर्वादपत्र पाठविलें ते प्रविष्ट होऊन सविस्तर कळों आलें. मौजे असोलें देवी तपें राजापूर येथील खोती व कुलकर्ण पुरात न कृष्णंभट देसाई तपें मजकूर यांचे असतां खोतीचा कजिया बिचारे आपापल्यांत करितात. परंतु पुरातन कृष्णंभटाचा गांव आहे व त्याप्रमाणें आपली पत्रेंही आहेत. त्याप्रमाणें करार करून याजकडे चालवावा, ह्मणोन आज्ञा केली. ऐशास मो। मजकूरचे खोत बिचारे प्रस्तुत खोती चालवीत आहेत. परंतु त्यांची त्यांजमध्यें वाटेयाचे मनसुफी लागली आहे ते अद्याप निवडली नाहीं, तों कृष्णंभटाची खोती ह्मणून स्वामीनीं लि॥ तरी कृष्णंभटाजवळ सनदापत्रें काय असतील ती घेऊन येथें आला ह्मणजे पंचाइतीवर मनसुफी टाकून ज्याची खोती खरी होईल त्यास पत्र करून देऊन कळलें पाहिजे. कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.