[२५६] श्री.
पुरवणी श्रीमत् सकल तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी.
विनंति राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांणी स्वामीकडे सकलाद र॥ करावयास दिल्ही ते हल्लीं पाठविली असे. प्रविष्ट जाहल्यानंतर पावल्याचें उत्तर राजश्री रायाचे नावें पाठविलें पाहिजे. बहुत काय लिहूं ? कृपा असो दीजे हे विनंति.
[२५७] श्री.
पुरवणी श्रीमत् सकलतीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी.
विनंति उपरी गोठणें येथील खाजणास आमचा कौल कशास पाहिजे ह्मणोन अलाहिदा पत्रीं लिहिलें आहे. याचा अर्थ स्वामीच्या चित्तांत एक प्रकार येईल. तरी वरकड जागा खाड्याच मोडून शेतें बांधतात, त्यास तीन सालें माफ पुढें इस्तावा याप्रमाणें शिरस्ता असतां स्वामीनीं वीस सालें माफ पुढें इस्तावा दर बिघा पांच मण व दाहिजा माफ याप्रमाणे कौल द्यावा ह्मणोन आज्ञापिलें; परंतु वस्तुता स्वामीनीं हा अर्थ पुर्ता चित्तांत आणिला नसेल. हा संशय निर्माण जाहाला, यास्तव स्वामीस लिहिलें असें. तरी याचें उत्तर पाठवावें ह्मणजे कौलही देऊन सध्यां शिरस्त्याशिवाय बेशिरस्ता चित्तांत आल्यावरून कौल दिल्हा नसे. बहुत काय लिहिणें? हे विनंति.