[३०१] श्री. २४ सप्टंबर १७४८.
राजश्री जगंनाथ चिमणाजी गोसांवी यांसी.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित तुळाजी आंगरे सरखेल रामराम उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष तुह्मीं पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन लिहिला अर्थ साद्यंत अवगत जाहला. व श्रीमत् परमहंस समाधीस्त यांचे नांवचें पत्र पाठविलें. प्रविष्ट जाहलें. प्रसादिक तिवट पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. वरकड श्रीचे कामाचा तपशील लिहिला. अवगत जाहला. इमारतीचें काम सिध्दीस जाणें तें श्रीइच्छेनें जाईल. तांदळाचे दस्तकाविसी लिहिलें. त्यावरून तांदूळ जावयाचें दस्तक दिलें असे. जाणीजे र॥. छ ११ माहे सवाल. बहुत काय लिहिणें. लेखनसीमा