[३०३] श्री. १८ डिसेंबर १७४९.
राजश्री जगंनाथ गोसावी यांसी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित तुळाजी आंगरे सरखेल राम राम उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें प्रविष्ट जाहले. लिहिला अर्थ कळों आला. तूर्त स्वारीची गडबड आहे, तरी तुह्मी लिहिल्याचे सविस्तर अर्थ मनास आणून मागाहून विचार करणें तो केला जाईल. आपले समाधान असों देणें. सरकारी कापड खरेदी करावयास पैठणास मादसेट पिलणकर रवाना केला होता. तेथून कापड आणून तुह्मांपाशी ठेविलें आहे. मादसेटीस सातारा कांहीं गुंता पडला आहे, याकरितां तुह्मांस लिहिलें आहे. तरी गोवेळदुर्गास सनद सादर आहे. पन्नास माणसे वेठे जातील त्यांजबरोबर दोघे तुह्मी माहीत घाटामाथापावेतों देऊन कापड वाजी न होतां सुरक्षित गोविंदगडास येई तें केलें पाहिजे. तुह्मी इकडील ममतेचे आहां याकरितां लिहिले आहे. तरी कापड येई तें करणें. येविसीं सविस्तर सांगता कळों येईल. बहुत काय लिहिणें. रा छ ८ माहे मोहरम. हे विनंति.