[२९९] श्री. ११ जानेवारी १७४५
श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति. सेवक तुळाजी आंगरे सरखेल कृतानेक दंडवत विनंति पौष वदि पंचमी भृगुवार पर्यंत स्वामींचे आशीर्वादें वर्तमान कुशल असे. विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन अक्षरश: स्वामींची वचनें श्रवण होऊन संतोष जाहला. वडिली निष्ठापूर्वक भक्तीनें स्वामीचा प्रसाद संपादून घेतला; आणि कितेक महत्कार्ये करून दिग्विजयी यशकीर्ति संपादिली; तदनुरूप निष्ठा धरिल्यास सर्व कार्ये मनोरथ संपूर्ण होतील; सध्या अंजनवेलीचा कार्यभाग सिद्धीस अविलंबेच जाईल. ह्मणून कितेक विस्तारें स्वामींनी आशीर्वादपत्रीं लेख केला. त्यावरून बहुत संतोष जाहला. ऐशास, वडिलीं निष्ठापूर्वक महानुभावाचे चरणी भक्तियोग संपादिला, त्याप्रमाणेंच महतांची सेवा करून, आशीर्वाद व कृपाप्रसाद मस्तकीं घेऊन, वडिलांनीं जोडिली यशकीर्तीची अभिवृद्धि करावी, हेंच मानस आहे. तदनुसार थोडी बहुत वर्तणूक होणें ते होत आहे. प्रस्तुत श्रीमत् महाराज स्वामींचे आज्ञेप्रमाणें अंजनवेलीचे मसलतेचा अंगेज करून शामळाचें स्थळ चौगीर्द वेढून जेर केलें आहे. सफलता होणें तें स्वामीचे कृपेंकरून लौकरच होईल. स्वामींनी कळसपाक, तिखट व शेला, तीळशर्करा प्रसाद पाठविला तो मस्तकीं ठेऊन आनंद जाहला. सदैव आशीर्वादपत्र पाठवून अपत्यांचा परामर्ष करीत असलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा असों दिली पाहिजे. हे विनंति.