[३०५] श्री. २१ जुलै १७३२.
श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मथुराबाईनें चरणावर मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार दंडवत विनंति उपरि येथील कुशल त॥ श्रावण शुध्द दशमी गुरुवारपर्यंत स्वामीचे अशीर्वादेकरून यथास्थित असे. विशेष. बहुत दिवस आशीर्वादपत्र येऊन परामृष घेत नाहीं. तेणेंकरून चित्त सापेक्ष असे. तर सर्वदां पत्र पाठवून सांभाळ करणार आपण समर्थ आहेत. मागें आपण पत्र पाठविलें तेथें आज्ञा कीं, र॥ बकाजी नाईक याची रवानगी अंजनवेल गोवळकोटचे मसलतीस केली आहां; त्यास, हनमंताचा गौरव रघुनामें करून त्याचे हातें लंका घेतली, त्याप्रमाणें बकाजी नायकाचा गौरव करून, कैकांस देणें देऊन, दोनी स्थळें सत्वर घेतलीं तर बरें वाटत नाहीं तरी, हळूहळू खाली समाधीस येऊं. ह्मणोन आज्ञा केली. त्यास, याप्रमाणेंच आपला हेत होता कीं, दोनीं स्थळें स्वराज्यांत जाहलीं ह्मणजे स्वामीचें आगमन श्रीस्थळी होईल. ह्मणजे मोठीशी सुकीर्त होईल. यास्तव, राजश्री बकाजीनाईक याबराबर जमावाची बळकटी करून, सर्वांचें समाधान करून, रवानगी केली होती. त्यास, श्रीस्थळीं शत्रू येऊन, गल्ला घेऊन गेला. तेथें आह्मांकडील लोकांही बरीशी शर्थ करून गनीम मारून काढला. पुढील प्रसंग तरी, नश्रूड, दगेखोर, श्रीचें स्थळ टाकून पुढें गेलियासी जागियासी दगा करील, याकरितां संनिधचेच स्थळास पायबंद देऊन, स्थळ घ्यावें, ह्याअर्थें चिपळुणास बकाजी नाईक जमावानिशीं राहिले. आणि जयगडीं भांडी आणावयासीं विनोजी घाटगे शंभर माणसें देऊन रवाना केले. तों तिकडे राजश्री रघुनाथजीही बावाजी ह्मसके याजबराबर जमाव देऊन किल्ले विजयगडास मोर्चे दिल्हे. सा सात रोज किल्ला भांडला. त्यास, आशाढ शुध्द पंचमी भृगुवारीं स्थल हस्तगत केलें. पुढे तेथील जमाव व भांडी आणून, गोवळकोटावर मार देऊन, हस्तगत जाहालियावरी अंजनवेलचा मनसबा उभारावा ऐशी योजणूक केली असतां, जयगडीहून भांडें रवाना केलें तें माखजनास आलें. तों चिपळुणीं बकाजीनाईकाजवळ एकदोन युध्दें तुंबळ हबशियानें दिली. त्यानंतर चिपळूणचा जमाव फुटला आहे तों गांठावें ऐसा विचार करून, शिद्दी साद खुद्द आपण जमाव विजयगडचा सुटून आला. तो व अंजनवेल, गोवळकोट तिहीं जागांचा जमाव भारी करून आषाढ शुध्द सप्तमीस रविवारी प्रात:काळीं चालोन घेतलें. हजार दीड हजार जमाव त्याचा जाहाला. आह्मांकडील तीनशें माणोस होतें, व राजश्री बाबूराव आह्मांकडे सामील जाहाले.