[३००] श्री. १ जून १७४६
श्रीमत् तीर्थस्वरूप राजश्री परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्ये तुळाजी आंगरे कृतानेक विज्ञापना तागाईत ज्येष्ठ बहुल नवमी रविवासरपर्यंत वडिलांचे आशीर्वादें सुखरूप असों. विशेष. धोंड बराबरी पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन लेखनार्थश्रवणें अपूर्व भासले. कि निमित्य की, आपण नारोजी बराबरी आज्ञा केली, त्याप्रमाणे सर्व सिद्धता करून आठा रोजी उगाड पडली ह्मणजे रवानगी वडिलांचे सेवेसी करावी. याप्रमाणे नारोजीजवळ विज्ञापना लिहून व किरकोळ किमखाप, मखमल वगैरे जिन्नस देऊन त्याची रवानगी करीत असतां बेवकुबी करून निघाला. ते समयी सेवकाने कितेक सांगणें ते सांगत असतां अमर्यादा करून गेला. परंतु अपत्याने वडिलांकडे पहावें लागलें. त्या लहान माणसाने क्षुल्लक गोष्टी चटोरपणाच्या मनस्वी सांगोन, वडिलांचे चित्तांत विपर्यास आणून, आह्मास पत्रलेख वडिलांनी करून, दुरुक्ती नानाप्रकारच्या बकवादाच्या लिहून पाठवाव्या आणि शब्द ठेऊन विरुद्धतेस कारण करावें, हें बावा ! तुमचे थोरपणास व वडिलपणास उचित की काय? तथापि आह्माजवळ जे सेवेसी अंतर जरी पडिलें असतें तरी असो. लहान माणसांचें सांगणीवरून इतका क्रोधास आवेश आणून बरे वाईट उच्चार करून लौकिकास कारण करावें ? बावा ! आपण तो सर्वज्ञ, ईश्वरस्वरूपी असोन अपत्यांची अमर्यादा जाहाली किंवा मर्यादेनेच वर्तणूक करून गेले, याचा विचार तरी बरा विवेकें करून पाहावा होता. तो अर्थ एकीकडेच ठेऊन अविवेकच चित्तांत आणून विशदेकरून लिहीता व सांगोन पाठविता, तरी आमचा यत्न काय आहे ? आह्मास आपण वडील हे समजून एकनिष्ठपणे सेवेसी तत्पर राहोन वडिलांचे चरणाचें स्मरण त्रिकाल करून असो, ऐसी आमची कायावाङ्मनसा अंतरशुध्द निष्ठा एकचित्तेकरून असली तरी आपण वडिलपणें दुरुक्ती लिहितात, त्या कल्याणयुक्त होतील, हा दृढनिश्चय करून पत्रे येतात ती मस्तकी ठेऊन आहो. हा आपले चित्ताचा करार असल्यास दुरुक्तीची चिंता काय आहे ? कर्जाचा अर्थ लिहीला. तरी कर्ज, बावा ! तुमचे घ्यावे हे आह्मास काय कळे कीं आज पावेतो विपर्यास व विभक्त ऐसे आह्मी समजलो नव्हतो. सर्व दौलत मनसबा आहे हा बावाचेच आशिर्वादाचा आहे तेथे दुसरा विचार काय आहे ? कर्जाचा नियत लिहावा ऐसे काय आहे ? हे दौलत आहे, ही आपली जे असेल ते आपले होते येऊन घेऊन जावे ऐसा आमचा हेत व याप्रमाणे वर्तणूक करीत असतां विशादार्य मानीजेता. अतेव ऋणानुबंधास येईना, त्यास आमचा यत्न नाही ! बरे! याउपरि वडिलांनी विवेक करून अपत्यास शब्द ठेवावा ऐसे नाही. आणि बुध्दीवाद उपदेश करावा. आह्मास तो वडिलांचे पायांवांचून दुसरा अवलंब नाही. आपण वडील आहांत. जैसी आह्मांस आज्ञा करून वर्तवितील तैसी वर्तणूक करून सेवेसी तत्पर असो. वडिलांचे सेवेसी बहुत लिहावे, तरी आपण सर्वज्ञ आहात. कृपा लोभ असो दिल्हा पाहिजे. हे विज्ञापना. *हे विनंति.