[३२७] श्रीभार्गवराम. १ जुलै १७२९.
श्रीमत् भृगुनंदनस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति. चरणरज सौभाग्यादिसंपन्न संतुबाई कृतानेक विज्ञापना. विनंति येथील कुशल आषाढ वदि द्वितीया भौमवासर पावेतों स्वामीचे कृपादृष्टि करून यथास्थित असे. विशेष. स्वामीनें आशीर्वादपत्रें रसाळगडचे मुक्कामीहून व श्रीस्थळी पावलियावरी तेथून आज्ञापत्रें पाठविली तीं उत्तम समयीं प्रविष्ट होऊन दर्शनातुल्य संतोष जाहला. स्वामीनें आज्ञा केली त्याचें उत्तर व येथील वृत्त:
राजश्री खाशास शरीरीं सावकाश वाटत नव्हतें. वेथा बहुतच कठीण होती. परंतु श्रीकृपेने व स्वामीचे आशीर्वादेंकरून प्रस्तुत आरोग्य वाटों लागलें आहे. कुलाबाहून ब्राह्मण छ १० जिल्हेंजी गुरुवारी आला. बराबरी पत्रें आली. वेथेस उतार पडोन आरोग्यता होऊं लागली असें स्वामीस कळावें ह्मणून लि॥आहे. श्रुत होय. स्वामी धावडशीहून समाधीस श्रीस्थळास येणें जाहेलें हें वृत्त तर कुलाबास लिहून पाठविलें. आंबे यंदा उत्तम आह्मांकडे आले नाहीत. तुह्मांस केनिल आंबे उत्तम अगर गोवेयांचे आले असिले तर कांही आंबे अगर नासके आंबेयांच्या कोया रुजवणीस पाठवणें ह्मणून आज्ञा. ऐशास, येथें उत्तम आंबे यंदा आले नाहींत. असते तरी स्वामीस रवाना करावयासी अंतर न पडतें. श्रुत होय. श्रुत शेवेशी होय हे विज्ञापना. |
सुंब वजन ![]() करणें ह्मणून आज्ञा जाहाली. त्याजवरून दोन मण सुंब रवाना केला असे. सेखडे दागिने ४८. हेमगर्भ तोळे दोन पाठवणें ह्मणून कुलाबाहून आज्ञा जाहाली होती. तो हेमगर्भ पाठवून देणें ह्मणून आज्ञा जाहाली. त्यासी वे॥ गोपाल जोशी यांजवळून हेमगर्भ दोन तोळे घेऊन स्वामी कडेस रवाना करणें ह्मणून आज्ञा जाहाली. ऐशास, ते कुलाबास गेले ते तेथेंच आहेत. हेमगर्भ स्वामी कडेस रवाना जाहला नाहीं; ह्मणून कुलाबास लिहून पाठविलें होतें. हेमगर्भ येथें संग्रही नाहीं; असता तरी पाठवितों. श्रीची वस्त्रें आहेत त्यांसी जतन करणें ह्मणून आज्ञा जाहली. ऐशास, वस्त्रांची निगा करवीत असो. श्रुत होय. |