[३२६] श्रीभार्गवराम. ६ एप्रिल १७२९.
श्रीमत्भृगुनंदनस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज सौभाग्यादिसंपन्न संतुबाई कृतानेक विज्ञापना विनंति उपरि येथील कुशल चैत्र वदि एकादशी रविवार पावेतों स्वामीचे कृपादृष्टिकरून यथास्थित असें. विशेष. कुलाबाहून गलबतें आलीं. त्यांजवरी स्वामीकडेस रवाना करवावयासी कागद लखोटा व जिन्नस आला.
येणेंप्रमाणे सुभानजी सोनकर याजबराबरी श्रीस्थळी र॥ केलें असें. हेमगर्भ दोनतोळे वे॥ गोपाळ जोशी अभ्यंकर यांजपासून घेऊन स्वामीकडेस रवाना करणें, ह्मणून आज्ञा जाहाली. ऐशास, गलबतें आलीं ती अगोदर गोपाळ जोशी पायमार्गे कुलाबास गेले. येथे असते ह्मणजे हेमगर्भ त्याजपासून ऊन रवाना करितों. गलबतें कुलाबास जातील त्याजवरी हेमगर्भ स्वामीकडेस रवाना जाहाला नाहीं, ह्मणून लिहून पाठवितों. तेथून आला ह्मणजे रवाना करूं. विशेष, पूर्वी स्वामीची आज्ञा कीं, धावडशीस धर्मशाळेस कांही वांसे इस्ताद पाहिजेत. कोइनेवर रवाना करणें ह्मणून आज्ञा जाहाली होती त्यावरून हुजूर कुलाबास लिहून पाठविलें तेथून उत्तर आलें नाहीं याकरितां स्वामीचे सेवेसी अंतर पडिलें. आह्मी आज्ञाधारक, आज्ञेप्र॥ वर्तणूक करावी, हे स्वामीस विदितच आहे. सेवेसी श्रुत होय. सदैव परामर्श करावयासी स्वामी समर्थ आहे. कृपा पूर्ण केली पाहिजे. हे विज्ञापना.